सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण खूप कमी आहे. या भूमीला थोर विभूतींचा वारसा लाभला आहे. वैचारिक जडणघडणीमुळे मातृशक्तीचा सन्मान करायचा हा तुमचा विचार आहे. तो तुम्ही प्रत्यक्षात अंमलात आणता म्हणून या भागात बालविवाह प्रकार कमी आहेत, स्त्रीभ्रूणहत्या विषय नाही म्हणून हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित असा जिल्हा आहे. मातृशक्तीची सुरक्षितता हा जिल्हा जोपासतो याबाबत मला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
वेंगुर्ला येथे बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात आयोजित महिला मार्गदर्शन आढावा बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य भारती हेगडे, पक्ष निरीक्षक डॉ. दाभोलकर, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश गवस, एम.के.गावडे, संदीप राणे, उदय भोसले, आर.के.सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सौ. चाकणकर पुढे म्हणाल्या की, एकमेकांना समजून घेणे ही या भागाची खासियत आहे. सर्वांना बरोबर घेऊन आमची संघटना काम करत आहे आणि करणार आहोत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेच्या माध्यमातून आपण काम करतो. ज्या पक्षाचा विचार आपल्याला पटतो त्या पक्षाशी आपण जोडले जातो. पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संघटना महिलांसाठी काम करते. दादांसोबत आपण पहिल्या दिवसांपासून आहोत त्यांचा विचार लोकांना पटला म्हणूनच विधानसभेमध्ये आपल्या पक्षाचे ४१ आमदार निवडून आले. आमच्या महिला भगिनी आमदार अदिती तटकरे मंत्री झाल्या यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. यावेळी पक्ष संघटनेतर्फे नियुक्ती केलेल्या पदाधिका-यांना रूपाली चाकणकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.