संकल्प नव्या वर्षाचा

भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर…

     नवीन पहाट घेऊन येणा­या या नव्या वर्षात नवे संकल्प केले जातात. नवा जोश, नवा उत्साह, नवी स्वप्न उराशी बाळगून नवीन वर्षात मार्गक्रमण करत असताना आठवणीच्या शिदोरीसह चांगल्या – वाईट घटनांपासून बोध घेत नव्या आव्हानांना सामोरे जाण्याचा संकल्प जगण्याला निश्चितच उभारी देईल.

      तसे पाहिल्यास आपण दरवर्षीच नवीन संकल्प करत असतो. नव्या वर्षाची चाहूल लागताच हे संकल्प मनात रूंजी घालू लागतात. नव्या दमाच्या कैफात अनेक नवीन संकल्प केले जातात. त्यातील काही पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात. अपूर्ण राहिलेल्या संकल्पाचे फारसे मनावर न घेता संकल्प अर्धवट सोडायाची जणू सवय झाल्याप्रमाणे आपण नव्या संकल्पांच्या विचारात मग्न होतो. आपण केलेले संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी अखेर आपणच पुढाकार घ्यायला हवा. २०२५ सालचा नवीन संकल्प करताना चांगले वागण्याचा, आपल्या वाईट सवयी शोधून काढून त्या सोडण्याचा, कोणास न दुखावण्याचा, एखादे सामाजिक कार्य करण्याचा, नवीन काहीतरी शिकण्याचा, नवीन विचार आत्मसात करण्याचा, ज्ञानी माणसांच्या सहवासात राहण्याचा, बुरसट जुन्या रूढीतून बाहेर पडण्याचा, जातीयतेचा विचार मनात न येऊ देण्याचा, स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतःच घेण्याचा असे अनेक संकल्प आपण करू शकतो की ज्यामध्ये सातत्य राहील.

   नवीन वर्ष विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच माहिती आणि प्रसारणाचेही असणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात आपली ओळख बनविण्यासाठी या क्षेत्रात काम करणा­यांनाही नवीन संकल्प करण्याची गरज आहे. आजच्या प्रसारमाध्यमावर सोशल मीडियाचा प्रभाव आहे. डिजिटल दुनियेत पत्रकारांचे नाणे खणखणीत असायला हवे. सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असता तर अफवा व फेक न्यूजमुळे तो बदनाम होतं आहे. त्यामुळे पत्रकारांची भूमिका अधिक महत्त्वाची बनते. पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूज देऊन समाजात सनसनाटी पसरवण्याच्या मागे न धावता सकारात्मक बदल घडवून आणणा­या पत्रकारितेचा संकल्प केल्यास त्याचे अनुकूल परिणाम निश्चितच निघतील.

       माहिती तंत्रज्ञानाबरोबरच नवीन अवकाश व्यापणा­या ‘ए आय‘ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने आपले जीवन अधिक सुखकारक होणार आहे. मात्र याच्या किती आहारी जायचे, त्याचा दैनंदिन जीवनात किती वापर करू द्यायचा. स्वतःला, स्वतः मिळविलेल्या पैशांना सुरक्षित कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण तंत्रस्नेही असणा­या प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. ‘ए.आय.‘मुळे बेरोजगारी वाढेल, सातत्याने करावे लागणारे काम ‘ए.आय.‘ तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज करता येईल. त्यामुळे कित्येकांच्या नोक­या जातील अशी भीती ब­याच जणांच्या मनात आहे. परंतु या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार काही नोक­या गेल्या तरी नवीन कौशल्य आत्मसात केल्यास कित्येक नव्या नोक­याही या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणार आहेत. यासाठी नवीन कौशल्य शिकण्याची तयारी दाखवली पाहिजे.

    पालकांसाठी नवीन वर्ष अधिक आव्हानात्मक असणार आहे. कुटुंब सुखी होण्यासाठी चाललेली धडपड योग्यच आहे, पण सुख नेमके कशाला म्हणायचे याचाही विचार व्हायला हवा. आपल्या मुलांचे लाड पुरविताना त्यांच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात. मुलांना महागड्या वस्तू घेऊन दिल्या, कशाचीही कमी पडू दिली नाही म्हणजे आपले पालकत्व संपणार नाही. मुलांना चांगल्या संस्कारांची आणि मायेची, प्रेमाची गरज आहे. आपल्या मुलांकडे आपले कटाक्षाने लक्ष असणे गरजेचे आहे. त्यांना स्वातंत्र्य देणे वाईट नाही , पण ती चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत हेही पाहणे गरजेचे आहे. नवीन वर्षात नवीन संकल्प करताना पालकांनी बक्कळ पैसा मिळवून कुटुंब सुखी करण्याचे स्वप्न बघतानाच, आपले कुटुंब सुसंस्कृत कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

     २०२५ सालात प्रवेश करताना प्रत्येकाने आपल्या भूतकाळाचा थोडा विचार करायला हवा. आपल्याकडून झालेल्या चुकांचा हिशोब आपण आपल्या मनाशी घालायला हवा. येणारे नवीन वर्ष प्रत्येकासाठी वेगळे असणार आहे प्रत्येकांना नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल. आपण माणूस माणून जगत असताना आपल्यातील माणुसकी हरवत नाही ना याची दक्षता प्रत्येकाला क्षणाक्षणाला घ्यावी लागणार आहे. कारण हे स्पर्धेचं आणि अतिशय वेगवान युग आहे. इथे मागे वळून पहायला कोणालाही वेळ नाही. इतरांना मागे सारून पुढे जाण्याची ही जीवघेणी स्पर्धा माणुसकीवरच घाला घालणारी आहे. प्रगती निश्चित करावी. स्पर्धा जिंकणे कधीही चांगलेच, पण हे सर्व करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि माणुसकी सोडून चालणार नाही.

 

Leave a Reply

Close Menu