राजकीय गुंडांच्या माजाशी कसे लढायचे?    

         संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येबाबत राज्यात हळहळ व्यक्त होताना आता छत्तीसगडमध्ये एका धाडशी संवेदनशील पत्रकार मुकेश चांद्रकर यांची हत्या झाली. एक राजकीय सरपंच होता तर दुसरा पत्रकार. दोघांची राज्य वेगळी होती. हा फरक असला तरी विलक्षण साम्य म्हणजे ठेकेदारी, खंडणी, अवैध मार्गाने मिळणारा पैसा याविरोधात लढताना पैशाचा माज असलेल्या धनिक गुंडांनी त्यांना संपवले आहे. दोघांच्याही हत्या अतिशय क्रूर पद्धतीने झाल्या आहेत. संतोषचे डोळे जाळण्यापर्यंत हे क्रौर्य गेले तर मुकेशचा खून करताना लिव्हर, मेंदूचे तुकडे करून सेप्टिकमध्ये त्याला पुरले होते. दोन्ही घटनेतील क्रौर्य बघता त्यांचा हेतू त्यांना मारणे हा होताच. पण त्याहीपेक्षा अशाप्रकारे लढाई करणा­यात भीती तयार करणे हा होता.

    हत्येने निर्माण केलेले प्रश्न खूप गंभीर आहेत. दोघांच्या मृत्युतील एक समान भाग हा आहे की, दोन्ही हत्या मोठ्या प्रकल्पाशी जोडलेल्या होत्या. हे जास्त अस्वस्थ करणारे आहे. संतोष देशमुख हा पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागण्यात अडथळा होता आणि छत्तीसगडमध्ये १२० कोटीच्या रस्त्याचे ठेकेदारीतील भ्रष्टाचार मुकेशने बाहेर काढला आणि ठेकेदाराची चौकशी लागली होती. यातून दोघांच्या हत्या झाल्या.

    दोन्हीकडील मारेकरी हे राजकीय संबंधातील आहेत. आपले काहीही होणार नाही हा दोघांचा आत्मविश्वास या राजकीय पाठिंब्याने आला आहे हे जास्त वेदनादायक आहे. राजकारणी संपत्ती ठेकेदार आणि त्यांनी पाळलेले गुंड यांच्याशी कसे लढायचे हे आता खरे आव्हान आहे. पंकजा मुंडे यांचा एक  व्हिडिओ फिरतोय. त्या एका कार्यक्रमात म्हणतात, धनंजय मुंडे यांचे पानही ज्यांच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिक कराड आणि लोक टाळ्या वाजवतात.‘ नेत्यांचे अस्तित्व जर अशा गुंड आणि ठेकेदार खंडणीखोर यांच्यावर अवलंबून असेल तर सामान्य कार्यकर्ते, पत्रकार यांनी कसे लढायचे? संतोष आणि मुकेश दोघेही अतिशय गरीब परिस्थितीत जगलेले होते. या करोडोंच्या भ्रष्टाचाराशी लढताना बिचारे हरले. नैतिकतेने गुंड शक्तीशी लढता येते हे वाक्य आज केविलवाणे झाले आहे.

    सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पातील भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून २००४ साली इंजिनियर सत्येंद्र दुबे यांची हत्या झाली होती. तेव्हा मी सत्येंद्र दुबेला अनावृत्त पत्र लिहिले होते. त्यात मी लिहिले होते की, या देशातील सत्तेचा लाल दिवा पेटायला रस्ते भ्रष्टाचारातील डांबराचे इंधन लागते. या अनैतिक संपत्तीवरच आज राजकारण उभे आहे. २० वर्षानंतर ही मगरमिठी अधिकच घट्ट होते आहे. निवडणूक खर्च वाढत चालले आहेत. ते जमा करण्यासाठी नेत्यांनी ठेकेदार पोसायचे. खंडणीसाठी गुंड ठेवायचे. त्या पैशातून राजकारण निवडणुका करायच्या. हे सर्व राज्यातील वास्तव आहे.

    ग्रामीण भागातील राजकारण आज ठेकेदार आणि शहरी भागातील राजकारण आज रियल इस्टेट आणि बिल्डर यांच्या हातात गेले आहे.त्यातून निर्माण होणारा काळा पैसा आणि त्याचे वाहक असलेले गुंड हा आजच्या राजकारणाचा पाया झाला आहे. या वास्तव असलेल्या गुंडशाहीने आजपर्यंत अडथळा असलेल्या सतीश शेट्टी सारख्या अनेक शेकडो माहिती अधिकार कार्यकर्ते आजपर्यंत मारले गेलेत आणि कितीतरी पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. इतका क्रूर आणि वाईट शेवट झाल्यावर सामान्य माणसे कशाला भ्रष्टाचार विरोधात लढतील?

    दिवसेंदिवस विकास म्हणजे कोट्यावधीचे प्रकल्प अशी राजनीती झाली आहे. प्रत्येक विभागात अनेक कामे काढायची त्यातील ठेके आपल्या कार्यकर्त्यांना द्यायचे आणि त्यातील कमिशनवर राजकारण करायचे, गुंड पोसायचे अशा आजच्या राजकारणाचे संतोष आणि मुकेश बळी आहेत.

   आरोपी सापडले, शिक्षा होतील पण राजकारणाचा पाया झालेला हा विविध प्रकल्पातील काळा पैसा हेच खरे आव्हान आहे. त्याच्याशी आणि त्यातून निर्माण होणा­या गुंडशाहीशी कसे लढायचे?

    सामाजिक चळवळी क्षीण होताना दिवसेंदिवस या लढाया अधिक बिकट होणार आहेत. राजकारणाचा हा क्रूर चेहरा अधिक भीतीदायक आहे.                                                                                                                                                                                    -हेरंब कुलकर्णी

Leave a Reply

Close Menu