वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी (२.०) अंतर्गत माहिती व मार्गदर्शन मेळावा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी नवीन ५५ लाभार्थी उपस्थित होते. गेल्या दोन वर्षात घरकुल योजनेत पूर्ण कोकणामध्ये वेंगुर्ला शहर आघाडीवर असून नागरिकांनी शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा व आपली उन्नत्ती साधावी, असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३५ लाभार्थ्यांना तर रमाई आवास योजनेंतर्गत २३ घरकुले देण्यात आली आहेत. ती आदिवासी लोकांसाठी शबरी आवास योजना अंतर्गत २५ लाभार्थ्यांचे अर्ज मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले असल्याची माहिती शहरस्तरीय तांत्रिक अभियंता प्रतिक डोंगरदिवे यांनी दिली. शहरातील १२० लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.