दाभोली इंग्लिश स्कूलच्या डीईएस न्यूज चॅनेलचा शुभारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. उद्घाटन भगिरथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थी दशेतच मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे गरजेचे आहे. हे स्पर्धेचे युग आहे. आपल्या जगणाच्या संकल्पनाही बदलल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित लाईफस्टाईल विकसित होत आहे. अशावेळी आता अधिक सजग होण्याची गरज आहे. दाभोलीसारख्या ग्रामीण भागातील हायस्कूलने कौशल्याधारित शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. मुलांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा अधिक विकसित करण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरावी, असे प्रतिपादन डॉ.प्रसाद देवधर यांनी केले. यावेळी पत्रकार महेंद्र मातोंडकर, वसंतराव जनार्दन दाभोलकर ट्रस्टचे विश्वस्त अण्णा दाभोलकर, शासकीय ऑडिटर राखी दाभोलकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आत्माराम खानोलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर गोलतकर, सदस्य सूर्यकांत सागवेकर, मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, शशिकांत मेस्त्री, पांडुरंग सरमळकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी दाभोली इंग्लिश स्कूलला भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व पुणे येथील श्रीकृष्ण सामंत यांच्यावतीने देण्यात आलेल्या १ लाख २० हजार किमतीच्या स्मार्टबोर्ड युनिटचे अनावरण हायस्कूलमधील विज्ञान विषयाची स्कॉलर विद्यार्थिनी समिधा पवार हिच्या हस्ते करण्यात आले. हायस्कूलमधील विविध उपक्रमांची बातमी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पंचक्रोशीत व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हायस्कूलने ‘देस‘ न्यूज चॅनेलची निर्मिती केली आहे. या युनिटचा शुभारंभ पत्रकार महेंद्र मातोंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. विविध क्षेत्रातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.