वाचनालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा-डॉ.कशाळीकर

नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे जाहीर झालेल्या विविध पुरस्कारांचे वितरण १९ जानेवारी रोजी श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवर सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ डॉ.वामन कशाळीकर, उद्योजक रघुवीर मंत्री, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार आदी उपस्थित होते.

      डॉ.वामन कशाळीकर यांच्या हस्ते साप्ताहिक ‘कोकणसाद‘चे संपादक गजानन नाईक यांना श्रीकृष्ण स.सौदागर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार, डॉ.शरयू आसोलकर यांना स्व.रमाकांत गुरूनाथ शेटये स्मृती आदर्श साहित्यिक पुरस्कार, कळणे-दोडामार्ग येथील हरिश्चंद्र भिसे यांना सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार, शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालयाला कै.विष्णूपंत गणेश नाईक स्मृती आदर्श ग्रंथालय पुरस्कार, देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाचे कर्मचारी प्रशांत बांदकर यांना श्रीकृष्ण स.सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार, प्रदीप केळुसकर यांना स्व.लक्ष्मीकांत सखाराम सौदागर स्मृती साहित्यप्रेमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

      संगणकाचा वापर आणि त्यात होणारी संशोधने याचा विचार करता आगामी २५ वर्षात वाचनालयातील पुस्तके पेनड्राइव्हमध्ये संग्रहीत केली जातील. सर्वसामान्य व्यक्त ही मोबाईल किवा संगणकाच्या आधारे घरबसल्या वाचन करतील किवा ऐकतील. त्यामुळे वाचनालयातील वाचकांची संख्या कमी हात आहे. त्यासाठी वाचनालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा व वाचक संख्या वाढवावी. भविष्यात वाचनालये ही सांस्कृतिक केंद्रे बनतील असे प्रतिपादन डॉ.वामन कशाळीकर यांनी केले.

       वाचनाने व्यक्तीमत्व विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन केलेच पाहिजे. बँकांनी सीएस फंडाचा उपयोग ग्रंथालयाच्या विकासासाठी करावा असे गजानन नाईक यांनी सांगत वाचन संस्कृती कमी होत असल्याबाबत खंतही व्यक्त केली. प्रदीप केळुसकर यांनी एका साहित्यिक व्यापा­याचा तर प्रशांत बांदकर यांनी आपल्या ग्रंथालयीन सेवेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल वेंगुर्ला नगरवाचनालयाचे आभार मानले. वेंगुर्ल्याची साहित्यिक चळवळ खूप मोठी आहे. समाजातील वैचारिक दारिद्र्य कमी होऊन विध्वजनांना समाजाला  मार्गदर्शन करण्याचे बळ येवो असे सांगत शरयू आसोलकर यांनी बाल साहित्यिकांना उत्तेजन म्हणून पुरस्कार देण्यासाठी आपल्या वडिलांच्या नावे संस्थेला १ लाख रूपयांचा कायम निधी देण्याचे जाहीर केले. रघुवीर मंत्री यांनी नगर वाचनालयाची किर्ती अधिकाधिक वृद्धिगत व्हावी अशी भावना व्यक्त करत आपली पत्नी कै.सौ.भारती मंत्री यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यासाठी १ लाख ५१ हजार रूपयांची कायमठेव नगर वाचनालयाकडे ठेवण्याचे जाहीर केले. गेली ३० वर्षे संस्था करीत असलेल्या ज्ञानदानाच्या कार्याबद्दल माहिती सांगून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अनिल सौदागर यांनी केले.

    याच कार्यक्रमात संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रमातील तसेच अ.ना.शेणई वक्तृत्व स्पर्धेतील, सुदत्त कल्याण निधी, कै.पद्माकर सौदागर स्मृती चित्रकला स्पर्धेतील, पं.जनार्दनशास्त्री कशाळीकर, भालचंद्र कर्पे, कै.रामचंद्र विश्राम किनळेकर व श्रीमती मंदाकिनी रामचंद्र किनळेकर स्मृती पारितोषिक व अन्य स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

      या कार्यक्रमाला संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, उपकार्यवाह माया परब, कार्यकारी मंडळ सदस्य मंगल परूळेकर, नंदन वेंगुर्लेकर, दिपराज बिजितकर यांच्यासह विठ्ठल करंगुटकर, वीरधवल परब, किरातचे व्यवस्थापक सुनिल मराठे, सौ.केळुसकर, सुनिता भिसे, अर्चना लोखंडे, मेहंदी बोवलेकर, डॉ.मेतर, श्रीनिवास सौदागर, जयराम वायंगणकर, वाचनालयाचे कर्मचारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यकारी सदस्य प्रा.महेश बोवलेकर यांनी तर आभार अनिल सौदागर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu