संजय घाडी यांच्या ‌‘वेदना संवेदना‌’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

         मानवी जीवन असंख्य प्रकारच्या वेदना आणि संवेदनांनी भरलेले आहे. वेदनेतूनच मानवी मुल्यांची निर्मिती होते. तर संवेदनेतून माणुसकीचा गहिवर पहायला मिळतो. माणसाला माणसाप्रमाणे जगण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. संजय घाडी यांच्या कविता वेदनेतही संवेदनशीलता जपतात. त्यामुळेच त्या आपल्या वाटतात. सहज सोप्या भाषेतून त्यांनी मानवी जीवनातील भावविश्व कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका सौ. वृंदा कांबळी यांनी वेंगुर्ले येथे केले.

            कुडाळ तालुक्यातील नारुर शाळा नंबर 1 मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले हिर्लोक गावचे सुपुत्र संजय घाडी यांच्या वेदना संवेदना या कविता संग्रहाचे प्रकाशन वेंगुर्ले येथे साई डिलक्स हॉलमध्ये आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे करण्यात आले होते. यावेळी प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष या नात्याने त्या बोलत होत्या. कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मंगेश मस्के, माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य, प्रमुख वक्ते प्रा. पांडुरंग कौलापुरे, कवी सुरेश पवार, आनंदयात्रीचे पदाधिकारी डॉ. संजीव लिंगवत, कवी संजय घाडी, सातेरी देवस्थानचे मानकरी रवींद्र परब, आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.आनंद बांदेकर, साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे, दादा गोसावी आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

            प्रमुख पाहुणे आनंद वैद्य, मंगेश मस्के यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत आनंदयात्रीचे उपाध्यक्ष प्रा. आनंद बांदेकर, सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर, सदस्य तथा सर्पमित्र महेश राऊळ, देवयानी आजगावकर, पी. के कुबल, प्रा. वैभव खानोलकर आदींच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.

            प्रमुख वक्ते प्रा. पांडुरंग कौलापुरे यांनी या कवितासंग्रहाचे रसग्रहण केले. ते म्हणाले, मानवी जीवनात जेवढ्या वेदना तेवढ्याच संवेदनाही उमटतात. संवेदना ही वेदनेची प्रतिक्रिया आहे. संजय घाडी यांनी आपल्या छोटेखानी पुस्तकात दर्जेदार कवितांचा संग्रह केला आहे. पुस्तकाची जाडी वाढावी म्हणून काहीही गळी उतरवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांची प्रत्येक कविता बोलकी आहे. ती आपल्याला काहीतरी सांगू इच्छिते. समाजात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांचे त्यात पडसाद आहेत. मानवी जीवनातील नातेसंबंधाचे हळवे पाश या कवितांतून जाणवतात. विविध छंद, वृत्तांचाही उत्तम मिलाफ घडविलेला आहे. काही गझलाही या संग्रहाच्या शेवटी उत्तमप्रकारचा काव्यानंद देतात. त्यांचे हे साहित्य क्षेत्रातील पहिलेच अपत्य अतिशय सुदृढ असेच आहे, असे ते म्हणाले.

            वेंगुर्ल्यातील प्राथमिक शिक्षिका तथा कवयित्री श्यामल मांजरेकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संजय घाडींच्या कवितासंग्रहातील काही कवितांचे वाचन करून कवितेतील संवेदना श्रोत्यांसमोर उलगडवून दाखविली. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य व नारुर शाळेचे पदवीधर शिक्षक उमाकांत यांनी संजय घाडी यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कवितेविषयी विवेचन केले. वेंगुर्ल्यातील किरात ट्रस्टने हे पुस्तक प्रकाशित केले आहे, तर प्रसिद्ध चित्रकार सुनील नांदोसकर यांनी मुखपृष्ठ निर्मिती केली आहे. किरात ट्रस्टच्या संपादक सीमा मराठे यांनीही पुस्तक निर्मितीमागील अनुभव कथन करत घाडींना शुभेच्छा दिल्या.

            कवी संजय घाडी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आपण मुळातच एक सामान्य कवी आहे. जिल्ह्यातील कार्यरत साहित्यिकांकडून प्रेरणा घेत आपणही काही निर्मिती करावी या ध्येयाने आपण कविता लेखनाचा प्रपंच मांडला. यासाठी खास तयारीही केली. अनेकांचे मार्गदर्शन घेतले. पुष्कळसे साहित्य वाचले व याहून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी जीवनातील अस्वस्थ करणारी वेदना आणि या वेदनेमागील संवेदना कवितेतून मांडण्याचा प्रयत्न आपण केला आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे हा कवितासंग्रह वाचकांच्या हाती देताना अत्यानंद होत आहे, असे ते म्हणाले.

            आनंद वैद्य, मंगेश मस्के, कवी संजय घाडी, प्रा.वैभव खानोलकर यांचा आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आनंदयात्रीचे कार्यकर्ते महेंद्र मातोंडकर यांनी केले, तर आभार निवृत मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu