जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘कवितेतील स्त्री‘ याबाबत विचार करणे उचित ठरेल. स्त्रीविषयक जाणीवा, त्यांच्या भावभावना यांचा प्रामुख्याने विचार केला तर स्त्रियांचे काव्य बहरलेले दिसते.
मराठी कवितेच्या इतिहासाकडे पाहिले तर सामाजिक, प्रेम, निसर्ग, स्त्री जाणीवा अशा विविध प्रकारच्या कवितांनी रसिकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. विविध अंगांनी भरलेली ही कविता एकूणच मराठी साहित्याला खूप उंचीवर घेऊन गेलेली दिसते. काव्यातील भावसौंदर्य, आशयसौंदर्य, त्यातील लय, प्रांजळपणा यामुळे कविता अधिकाधिक संपन्न झालेली प्रत्ययास येते. स्त्रीवर होत असलेला अन्याय, तिला मिळत असलेले दुय्यम स्थान, तिचा भावनिक कोंडमारा, तिचा एकूण जीवनपटच अत्यंत भावपूर्णतेने कवयित्रींनी व्यक्त केलेला दिसतो.
कवयित्रींनी अन्यायाबद्दल चीड व्यक्त करून बंडखोरीची वृत्ती दाखवली आहे. काव्याचा हा प्रवास फार मोठ्या परिवर्तनाची ओळख करून देतो. इतकेच नाही तर स्त्री म्हणून स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विचार करताना तिला काही हक्क आहेत. विशेष म्हणजे मनही आहे आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही आहे. स्त्री जाणिवेच्या या काव्यांचा विचार करताना काव्यातील वेगवेगळे बदल, प्रवृत्ती व परखडपणे मांडलेले विचार या सर्वांचे स्वरूप लक्षात येते.
महानुभाव पंथातील मराठीतल्या आद्य कवयित्री आणि चक्रधर स्वामींच्या शिष्या महदंबा उर्फ महादाईसा, उमाईसा, बाईसा, नागाईसा तसेच समर्थ रामदास स्वामींनी स्त्री-पुरुष भेद न मानता स्त्रियांनाही शिष्य म्हणून उपदेश दिला होता. वेणाबाई, बयाबाई, अक्काबाई अशा किमान ५० स्त्री-कवयित्री समर्थ प्रतापमध्ये आढळतात. त्यानंतर मराठी स्त्री काव्याची गंगोत्री संत जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई, बहिणाबाई, प्रेमाबाई, कान्होपात्रा, मीराबाई, सोयराबाई आदी संत कवयित्रींच्या शब्दांनी खळखळून निघाली. बदलत्या काळासोबत प्रचलित काव्य परंपरेला वैचारिक दृष्टीने नवे वळण, नवी दिशा मिळत गेली. काळाच्या दाढेतून हे आत्मपर दीर्घकाव्य लिहिणाया मनोरमाबाई रानडे, आधुनिक आद्य कवयित्रीचा मान मिळविलेल्या लक्ष्मीबाई टिळक, निसर्गकन्या-सरस्वतीची लेक बहिणाबाई चौधरी या नावाचा उल्लेख करताच ‘अरे संसार संसार‘, ‘मन वढाय वढाय‘, ‘माझी माय सरोसती‘ ही गाणी सहज ओठांवर येतात. इंदिरा संत यांच्या कवितेतील भाषा व अभिव्यक्ती सूक्ष्म निरीक्षणातून व्यक्त झालेली दिसते. यांच्या कविता वैयक्तिक अनुभवांचा आरसा आहे.
आधुनिक मराठी कवितेमध्ये स्त्रीवादी भूमिका अधिक ठळकपणे मांडणाया कवयित्रींपैकी अरूणा ढेरे यांचे नाव महत्त्वाचे आहे. स्त्रीजीवनातील सुखदुःखांचा आलेखच ढेरे यांची कविता साकारताना दिसते. स्त्री जीवनाच्या दुःखाचा पटच त्यांनी ‘बायका‘ कवितेतून मांडला आहे. भर माध्यान्ही नदीवर खळबळून जातात, चुबकून निघतात. धुण्यागत बायका सुस्कारा टाकून पदराने चेहरा पुसून घेतात. आल्या दुःखाचे पिळे होऊन घराकडे परतून येतात. चुलीच्या जाळाबरोबर मग धगधगून उठतात. बायका, तांबड्याबुंद होत जातात.
आईची अनेक रूपे मराठी कवितेने अनुभवली आहेत. स्त्रीच्या वाट्याला येणाया अनंत यातनांमध्येही आईपणाचे एक अपरंपार सुख आहे. अगदी हळुवार भूमिका म्हणजे आईची. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून हिरा बनसोडे यांनी स्रियांच्या मूकभावना अशा व्यक्त केल्या आहेत. स्त्रीचे हे संवेदन अनुभवाशी सहजपणे एकात्म झालेले दिसते. स्रीत्वाच्या बंधनामुळे स्वतःचे व्यक्तित्व दडपले जात असल्याची जाणीव आणि अश्विनी धोंगडे यांनी तिच्या सुखदुःखांचा घेतलेला शोध पुढील ओळींतून दिसतो, तडजोड म्हणजे तडकणं पुरूषाचं आणि सांधेजोड बाईची आयुष्याचे वस्त्र फाडफाडून संसाराला ठिगळ लावण्याची…
आधुनिक मराठी कवितेमध्ये स्त्रीवादी दृष्टिकोनातून नव्याने पायाभरणी करणाया ज्योती लांजेवार यांची कविता सनातन परंपरेविरूद्ध बंड पुकारते आणि स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी पराकाष्ठेची धडपड करते. स्त्रियांचा आदर करणारी समाजप्रवृत्ती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत स्रियांचे हरण होतच राहील अशाप्रकारची भूमिका त्या व्यक्त करतात. वाटतं हातात घ्यावं कोलीत, अन् लावावी आग. या अमानुष्यांच्या वस्तीला तिथं आपल्या सर्वस्वाची होळी झाली. सांसारिक वेटोळ्यातून स्त्रीची सुटका कधीच होत नसते. समाजाने हिची नाळ परंपरेशी घट्ट बांधलेली आहे.
डॉ.सुवर्णा सोनारे-चरपे यांच्या ‘आई संयमाच्या धाग्याने बाबांचा खिसा बारीक शिवायची… तेव्हा बाबांच्या खिश्यात उमेदीची नाणी खणखण वाजायची…‘ या कवितेतील धिरोदात्त स्त्री पुरूषाच्या अंतःकरणातील संयमाच्या ज्योतीला तिच्या समंजस्येच्या ओंजळीने कसोशीने जपते, सांभाळते तेव्हा तो पुरूष पुरूषार्थ सिद्ध करू शकतो. स्त्रीमधील नेतृत्व गुण, निर्णयक्षमता, परिस्थितीला तोंड देण्याची चिवटवृत्ती, तिच्यातील खंबीर आत्मविश्वास या तिच्या बळकट बाजू समजून घेऊन तिच्यावर विश्वास ठेवणारे कमीच. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे प्रत्येकाने समजून घ्यावेत असे प्रितम ओगले यांना वाटते. त्या म्हणतात, ‘स्वाभिमानी ती प्रखर, झुंजार ती काळवेळी, भिरभिरते नजर शोधे, विश्वास आभाळी, तिच्या मनाच्या तळाशी, कोणी पोचतच नाही, बाई माणसाची नाडी, कुणा कळतच नाही. जगदंबा आणि सावित्रीचा वारसा मोठ्या अभिमानाने आम्ही मिरवतो पण आजचे अत्याचारी साम्राज्य उलथवून टाकण्याची ताकद आमच्यात असतानाही आम्ही अन्याय-अत्याचार मूकपणे सहन का करतो? मुळात हा अन्याय-अत्याचार होऊ नये यासाठी आपण काय करतो? असे प्रश्न रसिका तेंडोलकर आपल्या कवितेतून पोटतिडकीने मांडताना दिसतात.
जगदंबा-सावित्रीच्या लेकी आम्ही शक्तिशाली अत्याचारी साम्राज्यात आजसुद्धा मूकबळी पुरूषप्रधान संस्कृतीत पुरूषाने स्त्रीला काही अधिकार, व्यक्तिमत्व दिलं नसलं तरी अनुराधा पाटील यांना मात्र ‘माझं आयुष्य तुझंच आहे‘ अशी सजग जाण, जागोजाग तडे गेलेल्या जमिनीसारखं हे ‘आयुष्य अखेर तुझं आहे जरी त्याच्या इच्छेशिवाय हलणार नसेल झाडाचंही पान‘ या कवितेतून दिसते. स्नेहा नारिगणेकर सृजनशक्ती या कवितेतून अथांग अशा स्त्री मनाच्या सामर्थ्याला शब्दरूप देण्याचा प्रयत्न करताना दिसतात, मनाचा कल्लोळ मिटावा हा सृजनशक्तीचा ध्यास प्रसवताना बिजांकुर सर्जनशीलतेची आस असंतोषाचा, असत्याचा, अत्याचारांचा जो कल्लोळ माजला आहे तो मिटून नवनिर्मिती करणाया स्त्रीच्या मनातील अशांती संपून सामर्थ्यवान नवबीजनिर्मिती व्हावी असे कवयित्रीला वाटते.
कवयित्री माधुरी अशिरगडे ‘आत्मनाद‘मधून एका होरपळणाया, आकांत करणा-या, दुःखातून प्रवास करणाया व मानसिकदृष्ट्या हतबल स्त्रीचे रूप डोळ्यांसमोर साकारतात. एके ठिकाणी त्या म्हणतात, आयुष्य म्हणजे एक शाश्वत मरण बदचाल कमनशिबाचं कर्मदरिद्री किटण दुःखाच्या सतत पाठलागामुळे या मनाला आत्मपिडनाची सवय लागलेली दिसते. संसारात येणारा संकटांचा पहाडही स्त्री समर्थपणे पार करीत असते. कधी कधी मनातील हे बोल हृदयावर आपोआप कोरले जातात. निसर्गाने स्त्रीला एकप्रकारे सोशिकतेचे वरदानच दिले आहे म्हणूनच मनिषा पिंपळखरे यांना मनातील दुःखही देवपूजेतील सुवासिक गंधाप्रमाणे भासते. एकूणच आधुनिक कवितेच्या संदर्भाचा विचार करीत असता बहिणाबाई चौधरी ते कल्पना दुधाळ, मधल्या टप्प्यावर अनुराधा पाटील या कवयित्रींनी बदलती कृषीप्रधान व्यवस्था यावर कवितेतून भाष्य केले तर प्रभा गणोरकर, प्रज्ञा दया पवार, मल्लिका अमरशेख यांनी महिलांचे होत चाललेले वस्तूरूप शब्दबद्ध केले. त्याचबरोबर हिरा बनसोडे, उषा अंभोरे, उषा खंदारे, छाया कोरेगावकर, आशालता कांबळे, कमल गरूड आदी अनेकांच्या कवितेतून समग्र व्यवस्थेचा वेध घेतल्याचे प्रत्ययास येते.
पुरूषप्रधान समाजरचनेमध्ये स्त्रिया आज स्वतःचे स्वतंत्र जग निर्माण करीत आहेत. आपल्या जीवनातील दुःखं दूर करायची असतील तर पुरूषांवर अवलंबून न राहता स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा विचार करीत आहेत. त्यांना ठाऊक आहे की संस्कृतीचे, बंधनाचे काटे बोचणार आहेत. याबाबत कवयित्री नीलम माणगावे यांच्या पैजण कवितेतील स्त्रियांच्या चार पिढ्या आणि त्यांचे संघर्ष नि त्यातून मिळविलेले स्वातंत्र्य याचा विचार मांडला आहे, तो अधिक सक्षम करणारा वाटतो, ‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ दे आता घट्ट, मजबूत, पोलादी पुढल्या का होईना शतकाआधी!‘
– नारायण गिरप, ८१४९८१७०४९