पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वेंगुर्ल्यातील दीपगृह आणि सूर्यास्त दर्शन या स्थळांकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. काही रस्ता डांबरी तर काही रस्ता मातीचा आहे. याठिकाणी जाण्यासाठी अन्य कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने अशी दुरावस्था झालेल्या रस्त्यावरूनच देशी-विदेशी पर्यटक ये-जा करत आहेत. दीपगृह परिसरातही गार्डन विकसित केले आहे. तसेच दीपगृहाच्या बाहेरील परिसरामध्येही बसून सर्वदूर पसरलेला समुद्र आणि सूर्यास्ताच्या छटा न्याहाळण्यासाठी कित्येक पर्यटक या ठिकाणी येत असतात. निमुजगा कॉर्नर ते दीपगृहापर्यंत पक्का डांबरी रस्ता झाल्यास या ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल.
मार्गदर्शक फलकाचीही केविलवाणी परिस्थिती झाली आहे. तसेच या फलकाच्या समोरील बाजूला प्रचंड झाडी वाढल्याने येथील बाकांवर बसणे गैरसोयीचे बनले आहे. मार्गावर असलेले पथदीपही झाडाझुडपांमधून प्रकाश पसरवत आहेत. याठिकाणी फोटोग्राफी करण्यासारखे सुद्धा काही स्पॉट आहेत. परंतु, त्याठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी देखील संरक्षक भिंत उभारून झुडुपे स्वच्छ करून इथल्या सोप्यावर बसण्याची सोय होऊ शकते.
वेंगुर्ला तालुक्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. येथील स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पाहून पर्यटक अशा किनाऱ्यांना पसंती देतात. वेंगुर्ला आणि नवाबाग किनारा जोडणारा झुलता पूल पर्यटकांना आकर्षित करत आहे. येथे स्थानिकांनी उपलब्ध करून दिलेल्या कयाकिंग, कांदळवन सफर, डॉल्फिन दर्शन सफर यामुळे या परिसरात पर्यटकांची गद वाढत आहे. परंतु झुलता पूल परिसरात रस्त्यावर लावलेले फूड स्टॉल आणि पार्किंगच्या समस्येमुळे ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होऊन पर्यटक कंटाळून येथे न येण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे वेंगुर्ल्यातील पर्यटनाला चांगला दर्जा येण्यासाठी स्थानिकांच्या फूड स्टॉल व वाहनांच्या पार्किंगची सुविधा मांडवी खाडी परिसरात करणे अत्यंत आवश्यक आहे. इथून झुलत्या पुलापर्यंत जाण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड व्हेईकल ठेवल्यास ते देखील एक आकर्षण ठरू शकेल. वेंगुर्ला नगरपरिषदेने या कामी पुढाकार घेऊन अशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास या परिसराला दीर्घकाळ पर्यटक भेट देत राहतील. नागरिकांनी देखील क्षणिक फायद्याचा विचार न करता दीर्घकाळ होणाऱ्या पर्यटन विकासाकडे लक्ष ठेवून या प्रक्रियेला सहकार्य करण्याची गरज आहे.
काही वर्षांपूव वेंगुर्ला नगरपरिषदेने शहराच्या हद्दीत चारही बाजूने प्रवेशद्वार उभारण्याचा ठराव केला होता. यातील भटवाडी वेशी आणि अणसूर नाका येथे अशी दोन प्रवेशद्वारे अस्तित्वात आली. परंतु, जी प्रवेशद्वारे निर्माण व्हायची राहिली आहेत, ती पर्यटकांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाची आहेत. निमुजगा भागात प्रवेशद्वार नसल्याने दाभोलीमार्गे वेंगुर्ला शहरात प्रवेश करत असताना आपण नेमके कुठे आलो, याबाबत पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. प्रशासकीय दिरंगाईत अडकलेली ही दोन प्रवेशद्वारे लवकरात लवकर व्हावीत ही नागरिकांची अपेक्षा आहे.