वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात गैरसोई आहेत. येत्या दहा एप्रिलपर्यंत येथे डॉक्टरांसह सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा सुविधा न मिळाल्यास रुग्णालयाच्या ठिकाणी नागरिकांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी सोमवारी प्रशासनाला दिला.
वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय हे शासनाचे अधिकृत असताना या रुग्णालयात वारंवार भासणारी डॉक्टरांची कमतरता तसेच अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्र्दंडही पडतो. काही प्रसंगी रुग्णाच्या जिवावरही बेतते. याबाबतच्या तक्रारी निर्माण झाल्याने वेंगुर्ले शहरातील जागरूक नागरिकांनी सोमवारी अचानकपणे उपजिल्हा रुग्णालय गाठले व याबाबतचा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संदीप सावंत यांना जाब विचारला.
वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेबाबत रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सर्व पक्षीय नागरिकांच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांची भेट घेतली. यावेळी रुग्णालयास मंजूर डॉक्टर किती व सध्या कार्यरत डॉक्टर किती? रुग्णालयास कायमस्वरुपी वैद्यकीय अधीक्षक आहेत का? तर दोन दिवसाचा अधिभार सावंतवाडी रुग्णालयाचा दिल्याने या रुग्णालयात चार दिवस वैद्यकीय अधीक्षक आहेत. या रुग्णालयातून शासकीय रुग्णालय ओरोस किंवा अन्य शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बरेच रुग्ण पाठविले जातात. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात ती सेवा का देऊ शकत नाही? फिजिशियन डॉक्टर येथे मंजूर असताना ते का उपलब्ध नाहीत. या उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सुविधा का उपलब्ध नाही? दंतचिकित्सा विभाग दर गुरुवारी चालतो. तेथे नियुक्त डॉक्टर येतात. त्यांची बैठकीची खुच सोडली तर या विभागात कोणत्याही साधनसामग्री नाही. त्याच्या मशिनरीची व्यवस्था तातडीने व्हावी. एक्सरे विभाग हा उपजिल्हा रुग्णालय इमारतीतच सुरु करावा. शवविच्छेदन रुम इमारत नादुरुस्त आहे, ती दुरुस्तीने सुसज्ज करावी. उपजिल्हा रुग्णालयाचे निकषाप्रमाणे कायमस्वरूपी सेवा देणाऱ्या डॉक्टरांची तातडीने नियुक्ती व्हावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय गावडे, माजी नगरसेवक महेश वेंगुर्लेकर, नागरिक हेमंत मलबारी, जयराम वायंगणकर, किरण खानोलकर, सचिन शिरोडकर, ऋषिकेश आडारकर, वाल्मिकी कुबल, अमित कुबल, संदेश गावडे, श्यामसुंदर रेवणकर, महेंद्र तांडेल, भाविक पेडणेकर, पप्या गावडे, दिलीप राणे, प्रताप गावस्कर, भाई मालवणकर, आकांक्षा परब, वृंदा मोर्डेकर आदी नागरिकाचा समावेश होता. यावेळी इर्शाद शेख, संजय गावडे, महेश वेंगुर्लेकर, पप्या गावडे यांनी रुग्णालयातील सेवेत होणाऱ्या समस्यांबाबत डॉक्टर संदीप सावंत यांच्यासमोर तक्रारी मांडल्या.