सुगंध अंतर्मनाला संतुष्ट करणारे नैसर्गिक संयुग आहे. सुगंधाचा दरवळ प्रत्येकालाच मोहीत करतो. आपला कोकण खऱ्या अर्थाने भाग्यवंत आहे, कारण चाफा, केवडा, सुरंगीसह नाना प्रकारच्या फुलांचा दरवळ कोकणपट्ट्यात अनुभवता येतो. आपला जिल्हा आता सुरंगी फुलांच्या व्यापारात गुंतू लागला आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत दरवळणारा सुगंधाचा दरवळ अर्थकरणाला उभारी देऊ शकतो. भारतीय महिला शास्त्रज्ञ संघटनेने यासाठी घेतलेला पुढाकार खुप आशादायी आहे. यातून सामाजिक फायद्यासोबत महिला सक्षमीकरणालाही प्रोत्साहन मिळेल. सुरंगीच्या सुगंधात अर्थकरणाला बळकटी देण्याची ताकद असून यावर अधिक संशोधन व्हायला हवे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.
भारतीय महिला शास्त्रज्ञ संघटना कोल्हापूर शाखेतर्फे वेेंगुर्ल्यात आयोजित केलेल्या दोन दिवशीय भारतीय नैसर्गिक सुगंधांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सामाजिक फायदा आणि महिला सक्षमीकरणासाठी वापर या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वेंगुर्ले कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात, वेंगुर्ले नगर परिषद, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्र्ले व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या परिषदेचा शानदार शुभारंभ झाला.
यावेळी व्यासपीठावर तंत्रज्ञान व्यवस्थापन संचालनालय आणि संरक्षण युनिटच्या शास्त्रज्ञ डॉ. विभा मल्होत्रा साहनी, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, नगर पालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, तहसीलदार ओंकार ओतारी, हिमसुरभी संशोधन संस्था मसुरीच्या डॉ. ज्योती मारवा, गार्डन क्लबच्या कोऑर्डिनेटर कल्पना सावंत, शास्त्रज्ञ डॉ. सीमा गायकवाड, नूतन धाकड, प्रगती चव्हाण, राष्ट्रीय परिषदेच्या समन्वयक डॉ. प्रा. धनश्री पाटील, डॉ. एस. आर. यादव, डॉ. मानसिंग निंबाळकर, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक उमेश येरम आदी उपस्थित होते.
या परिषदेचा शुभारंभ वैशिष्ट्यपूर्ण होता. मान्यवरांचे स्वागत कोकणात विपुल प्रमाणात फुलणाऱ्या चाफ्याच्या फुलांचा वापर असलेल्या सुंगधी काचबॉटलचे मोमेंटो देऊन करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन पारंपरिक दीप प्रज्वलनाबरोबरच तुळशीवृदांवनाला जलार्पण करून करण्यात आले. परिषदेच्या निमिताने व्यासपीठावर केलेली सजावट सुगंधी फील देणारी होती.
एका मागोमाग एक, फुल विणते धाग्यात
डोई रुळण्याचा मान, सुरंगीच्या भाग्यात
साथ तुटता फांदीची, होते पराधिन जीणे
धागा होतो अनमोल, सुरंगीच्या संगतीने
कधी देवाजीच्या पायी, कधी प्रियेच्या वेणीत
अशा फुलांनी कोकण, देवभूमीच्या श्रेणीत
उद््घाटनानंतर अशा मधूर स्वरशब्दांनी बद्ध गीताने परिषदेचे वातावरण सुगंधित केले. वेंगुर्ल्यातील सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे यांनी स्वरबद्ध केलेले नीलेश गावकर लिखित हे गीत सरस्वती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर या परिषदेच्या संयोजक तथा बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या प्रा. डॉ. धनश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचा नेमका उद्देश आणि यातून नेमके काय साधायचे आहे याचे त्यांनी इंग्रजीतून सविस्तर विवेचन केले.
सुरंगीपासून ‘शिवासा’ अत्तराचे लॉन्चिंग
परिषदेच्या निमित्ताने तंत्रज्ञान व्यवस्थापन संचालनालय आणि संरक्षण युनिटच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विभा मल्होत्रा साहनी यांच्या मार्गदर्शनाखाली गार्डन क्लबने विकसित केलेले सुरंगीपासूनच्या शिवासा नावाच्या अत्तराचे लॉन्चिंग करण्यात आले. हिमालय व सह्याद्री पर्वताचे महत्त्व अधोरेखित करतानाच ‘सह्याद्रीच्या सुंगधाचे हिमालयाकडे उड्डाण’ ही टॅग लाईन घेऊन हे अत्तर आता बाजारपेठेत दाखल होणार आहे. कोकणात आढळून येणाऱ्या सुरंगी आणि मोगरा अशा दोन फ्लेवरमध्ये हे अत्तर विकसित करण्यात आले आहे. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते या अत्तराचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय शास्त्रज्ञ मंचाच्या विविध उपक्रमांची माहिती असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
सुगंधाचा व्यापार वाढावा यासाठी प्रयत्न!
कोकण ही जणू देवभूमीच आहे. जैवविविधतेने नटलेली कोकणभूमी अनेकांसाठी आधारवड आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागावर निसर्गने मुक्तहस्त उधळण केली आहे. त्यामुळे येथे नानाप्रकारची वृक्षसंपदा बघायला मिळते. प्रत्येक वृक्षांवर मोहराचा बहर येतो. नाना प्रकारच्या लतावेली सुगंधित फुलांनी डवरून येतात. हा अल्हाददायक दरवळ माणसाचे मन प्रसन्न ठेवण्याचे काम करतो. प्रत्येक फुलाचा गंध वेगळा, प्रत्येक मोहोराचा दरवळ निराळा आणि संपूर्ण जग नैसर्गिक सुगंधासाठी वेडे आहे. मनाला स्वगय सुखाची अनुभूती देणाऱ्या या सुगंधाचाही व्यापार होऊ शकतो हे आमच्या संघटनेने दाखवून दिले आहे. यासाठीच गेली काही वर्षे आम्ही सुगंधावरच काम करत आहोत. नैसर्गिक सुगंधापासून कोणकोणती उत्पादने घेता येतील, यावर संशोधन करण्यात आलेय. आता प्रत्यक्ष जनमानसात जाऊन सुगंधाचा व्यापार वाढावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे शास्त्रज्ञ डॉ. विभा मल्होत्रा म्हणाल्या.
नीता मराठे यांनी मराठीतून, तर वेदश्री चव्हाण यांनी इंग्रजी भाषेतून सूत्रसंचालन करून परिषदेचा स्तर वरचा ठेवला. डॉ. सीमा गायकवाड यांनी आभार मानले. विविध विषयांवरील प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणे झाली.