खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला भाजपा पुरस्कृत व जय मानसीश्वर मित्रमंडळाच्या सहकार्याने आयोजित ‘क्रीडा महाकुंभ 2025’ अंतर्गत प्रकाशझोतातील व्हॉलीबॉल स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. यात एरिक स्पोर्ट्स वेंगुर्लाने विजेतेपद, गोवा-पालये येथील भूमिका संघाने उपविजेता, मानसीश्वर वेंगुर्ला संघाने तृतीय तर स्पायकर सावंतवाडीने चतुर्थ क्रमांक पटकाविला. बेस्ट अटॅकर- राजाराम तेरेखोलकर (मानसीश्वर-वेंगुर्ला), बेस्ट सेटर-जीवन पवार (एरिक-वेंगुर्ला), बेस्ट लिबेरो-यतिश मोरजकर (भूमिका-पालये), प्लेयर ऑफ द टुर्नामेंट-प्रथमेश सरगुले (एरिक-वेंगुर्ला) आदींनी वैयक्तिक पारितोषिके पटकाविली. या सर्व विजेत्यांना चषक व रोख रक्कम देऊन भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून अजित जगदाळे, हेमंत गावडे, राधाकृष्ण पेडणेकर, घोरपडे यांनी, गुणलेखक संदिप शेटये, सॅमसन फर्नांडिस, समालोचक म्हणून जयेश परब व मंथन परब यांनी काम पाहिले.
या स्पर्धेला तहसीलदार ओंकार ओतारी, पं.स.चे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, एक्स-सर्व्हिसमॅन सोशल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स फाऊंडेशन – मुंबईचे समरजीत सरोज, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, प्रा.जे.वाय.नाईक, माजी हॉलीबॉलपटू सुनील निरावडेकर, युवा मोर्चाचे पिंटू सावंत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुजाता देसाई यांनी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना मेडल व टी-शर्ट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेच्या उत्तम आयोजनासाठी जय मानसीश्वर मंडळाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.