मंदिर हे केवळ उपासनेचे स्थळ नसून आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीकही आहे. हाच वारसा जपण्यासाठी, वेंगुर्ल्याचे सुपुत्र प्रसाद परब यांनी एक अनोखा ध्यास घेतला आहे.
कोरीव बांधकामे, नक्षीदार दीपमाळ, लाकडी व दगडी सभामंडपांची सर्जनशील रचना, धातूचे ओतकाम, चांदीच्या मुखवट्यांच्या कलाकुसरीचे काम, पाषाणातील सुबक मूत, संगमरवरी आणि पंचधातूच्या मूत, तसेच दुर्मिळ व पुरातन मूर्तींना वज्रलेपाद्वारे नवचैतन्य देणारे प्रसाद परब. त्यांचे हे वज्रलेपाचे कार्य म्हणजे त्या त्या ठिकाणांचा आत्मा जपण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी अनेक अज्ञात किंवा दुर्लक्षित मंदिरांचे देवत्व जपले आहे.
आजच्या धावपळीच्या युगात, जिथे नव्या पिढीला आपल्या इतिहासाची आणि परंपरांची फारशी ओळख नाही, अशा वेळी प्रसाद परब यांचे हे कार्य म्हणजे नवचैतन्याचा झरा आहे.
एखाद्या गाभाऱ्यात शांत बसावं, समोरची मूत पाहत राहावं आणि हळूहळू जाणवत जावं, या मूतला कितीतरी काळ गेला असेल. रोजची पूजा, अभिषेक, धूप, दीप आणि तरीही ती मूत अजून तशीच आहे, पूज्य, प्रभावी, तेजस्वी. पण खरंच तशीच आहे का? मूतचं तेज अनेकदा काळाच्या ओघात झिजू लागतं. प्रसाद परब या वेंगुर्ल्यातल्या कलाकाराने या झिजलेल्या तेजाला परत उजळण्याचं व्रत घेतलं आहे, वज्रलेपाच्या माध्यमातून.
मूत म्हणजे नेमकं काय? फक्त एक दगडाचा पुतळा, की त्या मागचं देवत्व?
परब कुटुंबातील प्रसाद यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. त्यांचे वडील चंद्रकांत परब हे देखील देव-देवतांच्या मूत साकारत असल्याने त्यांच्या सोबत काम करत मूत घडवण्यासाठी लागणारी कलाकुसर प्रसाद यांनी आत्मसात केली. वडील मूत घडवत. मेण आणि राळ यांच्या साहाय्याने मूर्तींच्या भेगा बुजवत, त्यांना नवं रूप देत. प्रसाद हे सगळं पाहत होते. कधी शांतपणे, कधी प्रश्न विचारत, कधी मदतीला धावत.
“ही मूत केवळ दगडाची नाही रे, यात भक्ती आहे… भावना आहे…” वडिलांनी एका संध्याकाळी सांगितलेलं वाक्य त्यांच्या मनात घर करून बसलं. त्या दिवसापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज 23 वर्षांनंतरही थांबलेला नाही. त्यांनी मूत साकारण्यावर भर दिला. मूत कलाकार म्हणून ते आज सर्वत्र ओळखले जातातच, पण वज्रलेपाच्या माध्यमातून पारंपरिकता जपून शिल्पकलेचा उत्तम नमुना साकारणारे प्रसाद यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे.
वज्रलेप झिजलेल्या देवत्वाला स्पर्श देणारी कला
कित्येक शतकं पूजेत असलेल्या मूत झिजतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मंदावतात. अशा वेळी मूत बदलण्याचा विचार केला जातो. पण अनेकदा ती मूत जपणं, तिचा इतिहास आणि परंपरा वाचवणं अधिक महत्त्वाचं असतं.
वज्रलेपाच्या प्रक्रियेमध्ये मूतचे झिजलेले भाग भरून काढले जातात. पूव मेण आणि राळ वापरून हे काम केलं जात होतं, आता इफाक्सी नावाच्या केमिकल आणि मोत्यांच्या भुकटीच्या सहाय्याने हे काम अधिक शास्त्रीय आणि टिकाऊ पद्धतीने केलं जातं. तांत्रिक बाबी महत्त्वाच्या असल्या तरी, हृदयात श्रद्धा आणि डोळ्यांत समज नसेल, तर हे कार्य अपूर्णच राहते.
प्रसाद परब यांचं प्रत्येक कार्य हे नव्या शोधाची सुरुवात असते. श्रद्धेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न, मूतचा इतिहास, तिचं मूळ रूप, तिच्या हातातील आयुधं, तिचं नाव, तिचं देवत्व हे सगळं त्यांना जाणून घ्यावं लागतं. कारण मूतला चुकीचं रूप देणं म्हणजे श्रद्धेवर अन्याय करणं.
रत्नागिरीच्या भगवती देवीचं काम असो, चिपळूणच्या शारदा देवीचा वज्रलेप असो, की जेजुरी गडावरील दीपमाळा. प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकच गोष्ट जपली आहे; भक्तीचा स्पर्श आणि मूतच्या आत्म्याशी नातं.
श्रीक्षेत्र शेगाव, कोकणातील हरिहरेश्वर मंदिर, चिपळूणचे महाकाली देवस्थान, महाबळेश्वरचे महादेव मंदिर, अमरावतीचे अंबामाता मंदिर, पाचगणीत राजापुरी गावातील कार्तिक स्वामींच्या गुहेतील शिवलिंग, श्रीक्षेत्र वाई येथील नृसिंह मंदिर, पालीचे बल्लाळेश्वर मंदिर, कडेपठारचे मंदिर या आणि अशा अनेक ठिकाणच्या मंदिरांचे आणि तेथील मूर्तींना वज्रलेपातून मूळ स्वरूप प्रसाद परब यांनी दिले आहे.
वेंगुर्ला : मूळ, आधार आणि प्रेरणा
ते म्हणतात, माझ्या कलाकारीची सुरुवात शेगाव येथील गजानन महाराजांच्या समाधी मंदिरातून झाली. तेथील शंभर वर्षांपूवच्या काळ्या पाषाणातील गरुड व हनुमंतांच्या मूर्तींना मी वज्रलेप दिला. जेजुरी देवस्थान, कडेपठार येथील 70 ते 80 मूत व शिवलिंगांना मूळचे देखणे रूप दिले. मूर्तींचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना त्यांच्या पूर्वरूपात साकारणं गरजेचं असतं. प्रत्येक मूतचं वैशिष्ट्य निराळं असतं. प्रत्येक देव-देवतांचे रूप त्यांच्या हातातील आयुधांवरून ओळखावं लागतं. देवतांना आहे तेच रूप देण्यासाठी पुरातन इतिहासही अभ्यासावा लागतो.
वेंगुर्ला हे केवळ प्रसाद परब यांचं गाव नाही, तर त्यांच्या कामाचं प्रेरणास्थान आहे. सातेरी देवी, रवळनाथ यांसारख्या देवस्थानांमध्ये वज्रलेप करण्याची संधी त्यांना मिळाली आणि ती त्यांनी मनापासून स्वीकारली. “माझ्या मातीतील देवतेला नवसंजीवनी देता आली, यासारखं भाग्य नाही,” असं ते आजही नम्रपणे म्हणतात.
अखेरीस, आपल्या मातीतील देवतेला अर्पण रवळनाथ मंदिरात नवतेज
आजवर देशभरातील अनेक ठिकाणी आपली कलाकृती पोचवलेल्या प्रसाद परब यांना आपल्या जन्मगावी वेंगुर्ल्यातील रवळनाथ मंदिरात वज्रलेपाची संधी नुकतीच मिळाली. हे काम त्यांनी नुकतेच पूर्ण केले आणि त्यांच्या मते, “स्वतःच्या गावातील देवतेला नवसंजीवनी देणं, हीच माझ्या ध्यासाची खरी पूर्णता आहे.”
रवळनाथ मंदिरातील मूतचे तेज, मूळ रेखा आणि इतिहास पुन्हा उजळताना वेंगुर्लेवासीयांच्या मनातील श्रद्धास्थान जपून ठेवल्याच्या भावना भक्तिभावाने भक्त मंडळी करतात तेव्हा कृतकृत्य झाल्याचा आनंद मिळतो, असा भावपूर्ण उल्लेख प्रसाद परब आवर्जून करतात. प्रसाद परब यांचा हा प्रवास थांबलेला नाही. तो अजूनही त्या प्रत्येक मूतच्या मागे लपलेल्या भावनेच्या शोधात आहे.
कारण शेवटी मूत फक्त पूजेसाठी नसते, ती आपल्या संस्कृतीच्या जिवंत स्पंदनांची साक्षीदार असते.