समुदाय केंद्रामुळे नाथ पैंच्या कार्याचा विस्तार होण्यास मदत – शरद पवार

थोर संसदपटू बॅ.नाथ पै यांचे महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे. वेंगुर्ला शहरात साकारलेल्या बॅ.नाथ पै समुदाय केंद्रामुळे त्यांच्या कार्याचा विस्तार होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यामुळे बॅ.नाथ पै यांचे आदर्श जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेंगुर्ला येथे केले.

      सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी गुरूवारी कॅम्प येथील बॅ.नाथ पै स्मृती व समुदाय केंद्राला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती करून घेतली. यावेळी बोलताना पवार यांनी वेंगुर्ल्यातील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. वेंगुर्ल्यात यायला नेहमीच आनंद असतो. येथील सागर बंगला माझे आवडते ठिकाण आहे. एवढी उत्तम जागा महाराष्ट्रात नाही. आंबा, काजूवर संशोधन करून नवनवीन जाती तयार करण्यात कोकण कृषी विद्यापीठाचं मोठं योगदान आहे. बॅ.नाथ पै यांनी या भागाची प्रतिष्ठा वाढवली. गेली 57 वर्षे संसदेत काम करण्याची मला संधी मिळाली. यावेळी माझे जे आदर्श व्यक्तिमत्व होते त्यात बॅ. नाथ पै हे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट क्षेत्रातील लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांच्या कुटुंबाचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. वर्षातून दोन ते तिनवेळा फक्त गावस्कर कुटुंबाशी गप्पागोष्टी करण्यासाठी मी वेंगुर्ल्यात येत असे.
            यावेळी व्यासपिठावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, फोमेंतो रिसॉर्टचे चेअरमन अवधूत तिंबलो, प्रभारी पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले, बॅ.नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै, संस्थेचे पदाधिकारी सचिन वालावलकर, बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डान्टस लॉ कॉलेजचे व्हिक्टर डान्टस आदी उपस्थित होते.

      अदिती पै यांनी प्रास्ताविकात बॅ.नाथ पै समुदाय केंद्रातर्फे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नाथ पै यांची विचारधारा, लोकांसाठी केलेलं काम हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची अपुरी राहिलेली स्वप्ने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सहकारी चळवळ, आरोग्य, शिक्षण, शेती यात शरद पवार यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन अदिती पै यांनी केले.

      लांजा येथे प्रस्तावित फणस संशोधन केंद्राचे काम अपूर्ण आहे. यासाठी 3 एकर जागाही ठेवली आहे. आपण यासाठी शब्द टाकावा अशी मागणी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याकडे केली. 35 वर्षांपूव ज्यावेळी शरद पवार भेटले होते त्यावेळी वेंगुर्ल्यात रिसॉर्ट उभे करण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. आज ते रिसॉर्ट आरवलीत उभे आहे. पुढील 10 वर्षात ते जगातील बेस्ट रिसॉर्ट असणार. या रिसॉर्टमधून पुढील काळात 10 हजार लोकांना रोजगार देण्याचा मानस अवधूत तिंबलो यांनी व्यक्त केला.

      यावेळी शरद पवार यांच्या हस्ते बॅ.नाथ पै समुदाय केंद्राच्या वेबसाईटचे लॉन्चिंग करण्यात आले. त्यानंतर अदिती पै यांच्या हस्ते शरद पवार यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन वालावलकर यांनी मानले. या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला प्रदेश सरचिटणीस नम्रता कुबल, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रांताधिकारी हेमंत निकम, कुडाळ मुख्याधिकारी नातू, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदिप भोसले, वेंगुर्ला न.प.च्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल यांच्यासह राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे विद्याथ उपस्थित होते.   

      राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे हेलिकॉप्टरने वेंगुर्ला-कॅम्प येथे आगमन झाल्यावर जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रविणभाई भोसले, महिला प्रदेश सरचिटणीस नम्रता कुबल, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर यांनी त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Close Menu