मुक्तांगण स्नेहमेळाव्यात संस्कारांची पेरणी

      मुले आणि पालकांना एकत्र आणण्यासाठी रेकॉर्ड डान्ससारख्या प्रथेला बाजूला सारून महाराष्ट्र धर्म, संस्कृती आणि विचारांचा वारसा सांगणारा वेंगुर्ल्यातील मुक्तांगण परिवाराचा स्नेहमेळावा मानवी मूल्ये व संस्कारांची पेरणी करणारा ठरला.

      मुंबईतील जे. जे. आर्ट स्कूलचे निवृत्त प्राध्यापक तथा प्रयोगशील चित्रकार सुनील नांदोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहमेळाव्यात मुलांसह पालकांनीही सहभाग घेऊन आपल्या अंगभूत कलाकौशल्यांचे प्रदर्शन केले. यावेळी मुक्तांगणतर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम प्रकल्पाच्या रुपात मांडण्यात आले होते. चित्रकला, हस्तकला, गणित, भाषा, विज्ञान, परिसर अभ्यास सहली याचा हसत-खेळत अभ्यास कसा करावा, याचे हसत-खेळत सादरीकरण फलक लेखनाच्या माध्यमातून करण्यात आले होते.

      मुलांना गृहपाठ न देता, पालकांना गृहपाठ देण्याचा मुक्तांगणचा उपक्रम आजच्या धकाधकीच्या जीवनातही संस्कारांचा वसा पुढे नेण्यास मदतगार ठरला. मंगलताई परुळेकर यांनी केलेल्या सुत्रबद्ध निवेदनामुळे या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली.

      मुक्तांगणची माजी विद्यार्थिनी वरदा परब हिच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आंतरभारती संकल्पनेवर आधारित ‌‘आम्ही भारतीय‌’ हा वेशभूषेचा कार्यक्रम सुजाण पालक केंद्रातर्फे पालकांनीच सादर केला. बच्चे कंपनीसह मोठ्यांच्याही धम्माल अभिनयाला सर्वांकडून दाद मिळाली. पालकांनी नृत्याविष्कारांबरोबरच संस्कारांची पेरणी करणारा पोवाडाही सादर केला. मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग या उपक्रमांतर्गत आजी-आजोबांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षा, नृत्य, नाट्य, वक्तृत्व आदी विविध स्पर्धांमध्ये नाव मिळविलेल्या मुक्तांगणच्या माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. मुक्तांगणच्या शिक्षिका गौरी माईणकर, नीला कळंगुटकर, प्रिती राऊळ यांच्यासह मुक्तांगणच्या प्रत्येक उपक्रमांना सहकार्य करणारे गणेश माईणकर यांचाही सन्मान करण्यात आला.

      सुजाण पालक केंद्र व मुक्तांगण महिला मंचाने या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी घेतलेली मेहनत फळाला आली. आपल्या पाल्यांसह पालकांनीही विविध कलांचे प्रदर्शन घडविल्याने या कार्यक्रमाचा दर्जा उच्च होता. मुक्तांगण ही मुले आणि पालकांमध्ये संस्कारांची पेरणी करणारी एक प्रयोगशाळाच आहे. अगदी लहान वयातील मुलांवर योग्य संस्कार झाले, तरच ती मुले मोठी झाल्यावर सामाजिक जाणिवेतून आपल्या कार्याची वाटचाल सुरू ठेवतील, असे ज्येष्ठ चित्रकार सुनील नांदोस्कर म्हणाले. आभार दिव्या वायंगणकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu