अणसूर पाल विकास मंडळ, मुंबई व अणसूर पाल हायस्कूल माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे रोजी अणसूर पाल हायस्कूल येथे ग्रामीण भागातील पालक, विद्यार्थी, युवक करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा ‘प्रेरणा‘ करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन संस्था सचिव लिलाधर गावडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने तर अणसूर सरपंच सत्यविजय गावडे आणि पाल सरपंच कावेरी गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या मार्गदर्शक वर्गाला वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच तज्ज्ञ व्याख्यात्यांची व्याख्याने ठेवण्यात आली होती.
यात रानमाणूस प्रसाद गावडे यांनी ‘सिधुदुर्गातील पर्यटन-उद्योग व व्यवसायाचे नवे पर्याय‘ यावर, सिधुदुर्ग आरटीओ इन्स्पेक्टर पराग मातोंडकर यांनी ‘माझी यशोगाथा-स्पर्धा परीक्षेतील यशाच्या सुसंधी‘ यावर, प्रा. मयुरेश रेडकर यांनी ‘फार्मसी क्षेत्र-नोकरी व व्यवसायाच्या दुहेरी संधी‘ यावर, प्रा. मिलिद देसाई यांनी ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करियर‘ यावर, युवा उद्योजक तथा महालक्ष्मी ग्रो प्रॉडक्टचे संचालक अंकुश गावडे यांनी ‘यशस्वी उद्योजकाची गरूडझेप‘यावर उद्बोधक व प्रेरणादायी व्याख्याने देऊन विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांचे शंका समाधान केले. शाश्वत आणि विकास या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शाश्वत जीवनशैली ही आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे आली आहे. शाश्वत जीवनशैली जपली तरच कोकणचं सौंदर्य टिकून राहिल, असे प्रतिपादन रानमाणूस प्रसाद गावडे यांनी केले. पराग मातोंडकर यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहन व चिकाटीची गरज असल्याचे सांगितले. तर अंकुश गावडे यांनी उद्योग वयवसाय निर्माण करताना आलेले कटू-गोड अनुभव कथन केले. सर्व व्याख्यात्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी दिपक गावडे, देऊ गावडे, दत्ताराम गावडे, राजन गावडे, गुंडू गावडे, पाल उपसरपंच प्रिती गावडे, पालक, व ग्रामस्थ उपस्थित होते. हा मार्गदर्शन वर्ग यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी जगन्नाथ गावडे, अनिकेत ताम्हणकर, गजमुख गावडे, शिक्षिका अक्षता पेडणेकर व चारूता परब यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्ताविक संस्था सचिव लिलाधर गावडे यांनी, सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी केले. तर बाबाजी गावडे यांनी आभार मानले. व्याख्यात्यांची ओळख शिक्षक विजय ठाकर व माजी विद्यार्थी नंदन ताम्हणकर यांनी करून दिली.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘कलाउत्सव‘ स्पर्धेत पखवाज वादनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेल्या व पूणे येथील राज्यस्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या संतोष नाईक याचा याच कार्यक्रमात आर.टी. ओ.ऑफिसर पराग मातोंडकर यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.