साहित्यातला वैज्ञानिक वारकरी : डॉ. जयंत नारळीकर

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिवस. अध्यक्षांची निवड जाहीर झाली आणि एक सुखद धक्का बसला. अखिल भारतीय मराठी साहित्य विश्वात एक इतिहास लिहिला गेला. पहिल्यांदाच एक खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार होता. ज्यांच्या रहस्यमय विज्ञानकथांनी माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या बालमनावर विज्ञानाची जादूई कांडी फिरवली, अनेकांना विज्ञानाची गोडी लावली. आकाशगंगा, कृष्णविवर, टाईम मशीन, व्हायरस, यक्ष, अंतराळातील भस्मासूर हे एक विलक्षण आणि रहस्यमय विश्व आम्हा मुलांसमोर उभं केलं, ते आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर झालेली निवड ही समाजाला डोळसपणा येण्यासाठी अविरत लेखणीतून झिरपत राहणाऱ्या एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होता. विज्ञानयुगाची नांदी होती.

      कट टू 20 मे, 2025… आभाळ भरून आलेलं… पाऊस धो धो कोसळत असलेला अगदी धाय मोकलून रडत असणाऱ्या कोणा अर्भकासारखा… आणि तेवढ्यात बातमी येऊन धडकली, नारळीकर गेले… काही मिनिटं सुन्न झालो. पावसाचं कोसळणं हवंसं वाटलं तेव्हा… एक भूलोकीचा तारा उडून गेला अवकाशस्थ होण्यासाठी. ज्याने आपल्या लिखाणाने इथल्या कृष्णविवरातल्या मेंदूना सौरगंगेची सैर घडवली, विज्ञान कथांच्या माध्यमातून आमच्या बालबुद्धीला विचारांचा डोस दिला, ते डॉ. जयंत नारळीकर आज या महाकाय काळ्या अवकाशात लुप्त झाले. लहानपणी का, कसे, कोण, कधी, केव्हा… अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं देणारे नारळीकर आज पंचतत्वात विलीन झाले पण त्यांनी आपल्या कामातून पेरलेलं ज्ञान कायम तारा बनून आमच्या मेंदूला तेजाळत राहील, हेही तितकंच खरं.

      डोळे उघडून बघा मुलांनो झापड लावू नका… असं म्हणत कथा लिहिणारे नारळीकर आमचं विज्ञान विश्व समृद्ध करून गेलेत. विज्ञानाची खरी आवड आमच्यात रुजवून गेलेत. कल्पनाविश्वातलं जगणं आणि खऱ्याखुऱ्या गोष्टी लक्षात घेऊन जगणं, यात जमिनअस्मानाचा फरक असतो, हे डॉ. नारळीकरांनी सोदाहरण पटवून दिलंय. जे दिसते ते असेच का? याचं उत्तर नारळीकरांची पुस्तकं वाचताना मिळतं. विश्व म्हणजे काय? तर तो एक अवाढव्य प्राणी असेल का? आणि आपले ग्रह, तारे त्याच्या पेशी? आत वावरणारे आम्ही जीव म्हणजे जीवाणू, विषाणू आणि त्याचं रक्त म्हणजे हा काळाकुट्ट अंधार…? असे अनेक प्रश्न उत्पन्न करणारी नजर ही डॉ. नारळीकरांचीच देणगी. हॉलिवूडच्या सायंस फिक्शनच्या चित्रपटांपेक्षा या कथांचं विश्व खुप अद्भूत आहे. लहानपणी चांदोबा, चंपक, ठकठक यांसोबतच ज्यानं चला जाऊ अवकाश सफरीला, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव अशांसारखी पुस्तकं वाचली असतील, त्यानं खरंच खुप मोठा खजिना लहानपणीच साठवून ठेवलाय, असंच म्हणायला हवं. विज्ञानकथांच्या माध्यमातून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्वसामान्यांना विचारप्रवृत्त करणाऱ्यांत डॉ. जयंत नारळीकर हे नाव महत्त्वाचं. डॉ. नारळीकरांनी गुंतागुंतीचं विज्ञान सोप्या शब्दांत आणि तेही आपल्या मातृभाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविलं. त्यामुळे अनेकांनी विज्ञानाचा वसा घेतला. विज्ञानाला लोकप्रिय बनवण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांतून डॉक्टरांनी विपुल लेखन केलं. त्याचे विविध भाषांत अनुवादही झाले.

      प्रज्ञा, प्रतिभा आणि सर्जनशीलता यांचा एक सुरेख संगम नारळीकरांच्या ठायी जुळून आला होता. नारळीकर बनारसमधून पहिल्या क्रमांकाने पदवी उत्तीर्ण झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी थेट केंब्रिज गाठलं. तिथे बी.ए., एम.ए., पी. एच.डी. आणि वडिलांप्रमाणे रँग्लर या पदव्या मिळवल्या. खगोलशास्त्राचे महत्त्वपूर्ण टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार नारळीकरांनी खडतर मेहनतीने प्राप्त केले. खगोलशास्त्राला नवी दिशा देणारा गुरुत्वाकर्षणाचा नवा स्थिर स्थिती सिद्धांत त्यांनी आपले गुरु सर फ्रेड हॉइल यांच्यासोबत मांडला. तो हॉइल-नारळीकर सिद्धांत म्हणून खगोलविश्वात प्रसिद्ध पावला. पण म्हणतात ना आपल्या मातीची ओढ माणसाला कायम तिच्याकडे ओढत असते. त्याचप्रमाणे परदेशात जरी त्यांनी संशोधन केलं, तरी नारळीकर कधीच परदेशात रमले नाहीत. संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधन सुरु ठेवलं. जगातील संशोधकांना मार्गदर्शक ठरणाऱ्या पुण्यातील आयुका या संशोधन संस्थेची स्थापना केली. पहिल्यापासूनच अफाट बुद्धिमत्ता आणि धडाडीने काम करणारे नारळीकर आपल्या पहिल्याच पुस्तकाला (यक्षांची देणगी) महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त करतात आणि वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वष पद्मभूषण मिळवतात तेव्हा हात आपसूकच भुवयांवर जातो आणि एक कडक सॅल्युट ठोकतो.

      मराठी साहित्य विश्वातील डॉ. नारळीकरांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विज्ञान आणि मातृभाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सुटसुटीत मराठी शब्द वापरले पाहिजेत. मराठीला जागतिक भाषेच्या दर्जाला न्यायचे असेल, तर मराठीचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे. असे उद्गार जेव्हा एखादा जागतिक दर्जाचा शास्त्रज्ञ आणि लेखक तळमळीने काढतो, तेव्हा त्यातली तळमळ जाणवायला हवी. विज्ञान शिक्षण मातृभाषेतूनच दिलं पाहिजे, असं नारळीकरांचं मत होतं. कारण इतर भाषेतून मिळणाऱ्या शिक्षणामुळे कल्पनांना हवा तसा वाव मिळत नाही. इतर भाषेतून शिक्षण दिल्याने मुलांना आपल्या मातृभाषेबद्दल आपुलकी उरत नाही. त्यामुळे ती त्या भाषेपासून दुरावत जातात. त्या भाषेला मिळणारा वाचक वर्ग कमी होतो. हिच स्थिती सध्या मराठीच्या पदरी आलीय, याकडे नारळीकरांनी लक्ष वेधून घेतले. त्यामुळे सर्वसामान्यांत विज्ञान रुजवण्यासाठी ते मराठीतून अविरत लिहित होते.

      बुवा-बापूंची असंस्कृत पिलावळ पिसाटून वाहत असण्याच्या काळात डॉक्टरांसारखा एखादा माणूस आपल्या आजूबाजूला आहे, ही जाणीवच खूप सकारात्मक होती. माकड हा आमचा पूर्वज नव्हता. विश्वाच्या निर्मितीबद्दल आमच्या वेदांत आधीच लिहिलेलं होतं. साऱ्या विश्वाचं, साऱ्या शोधांचं मूळ हे आमच्या आर्यावर्तात होतं, असं छातीठोकपणे सांगणाऱ्या महत्‌‍‍ पंडितांनी त्याचे खरे पुरावे आधी गोळा करावेत, असं डॉक्टर स्पष्टपणे सांगायचे. परंतु अशा पंडितांशी वादविवाद करण्यात वेळ खच घालण्यापेक्षा आपलं संशोधन त्यांनी आधिक जोमानं सुरु ठेवलं. पुराणकथांना तोड म्हणून विज्ञानकथा लिहिल्या. त्या तितक्याच प्रामाणिकपणे वाचकांसमोर मांडल्या. त्यातून कणभराने का होईना, डोळस वाचक त्याकडे गांभिर्यानं पाहू लागला.

      विज्ञानाला सर्वोच्च मानणारे डॉक्टर पुराव्यांशिवाय विज्ञान असत नाही आणि ज्यांना पुरावे नसतात ते विज्ञान असत नाही, असं मानायचे. एकविसाव्या शतकातही फलज्योतिष, ग्रहांचे प्रभाव, पुराणकथा अशा गोष्टींमुळे समाज अधोगतीकडे जातो आणि माणूस आपली विचार करण्याची शक्तीच हळूहळू गमावतो, असं नारळीकर आपल्या भाषणांतून, मुलाखतींतून, लिखाणातून सातत्याने मांडत आले. अशा निरर्थक गोष्टींनाच विज्ञान समजून चालण्याच्या कालखंडात खऱ्या अर्थाने विज्ञानवादी होणे, सत्य तपासणे आणि नंतर ते स्विकारणे, हा दृष्टीकोन रुजण्याची गरज आहे. साहित्यातून तो दृष्टीकोन रुजवता येतो. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी साहित्यातून आपण प्रयत्न करू शकतो. व्याख्याने, प्रदर्शने, कार्यशाळा, विज्ञान कथा अशा विविध माध्यमांतून समाजामध्ये वैचारिक दृष्टीकोनाचा प्रसार करू शकतो, असं नारळीकरांचं मत होतं आणि ते काम त्यांनी शेवटपर्यंत केलं.

      एखादा विषय सोपा करून सांगण्याची शैली तेव्हाच येते, जेव्हा तो विषय सखोलपणे समजलेला असेल. नारळीकरांचं लिखाण वाचताना त्यातून ही परिपूर्णतेची झळाळी कायमच लख्खपणे जाणवत राहते. लहान मुलांमध्ये विज्ञाननिष्ठा जागृत करणे, हे मुख्य ध्येय मानून ते विज्ञानकथा लिहित असत. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शिक्षक आणि मुले असं दोघांनीही मिळून शोधायला हवं. त्यामुळे दोघांनाही शिकण्याची प्रेरणा मिळत असते, असं ते म्हणायचे. पद्मभूषण सोबतच, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, भटनागर, एम. पी. बिर्ला पुरस्कार, फाय फाऊंडेशन, इचलकरंजी मार्फत राष्ट्रभूषण पुरस्कार, दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, अमेरिकेतील फाऊंडेशन मार्फत दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार असे अनेकविध मानाचे पुरस्कार डॉ. जयंत नारळीकरांना मिळाले होते. चार नगरांतले माझे विश्व असं म्हणणारा आयुकातला हा विज्ञानमहष मराठी सारस्वताच्या दरबारात सर्वोच्च पदावर विराजमान झाला होता. विज्ञान कथांच्या माध्यमातून लहान मुलांचं वैज्ञानिक मनोरंजन करत असताना त्यांनी थेट प्रभूशी नाते जोडले.

      कोरोना कालावधीतील बंधनांमुळे आणि प्रकृतीच्या कारणास्तव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहू शकलो नाही म्हणून अध्यक्षांना देण्यात येणारा एक लक्ष रुपयांचा निधी परिषदेला परत करत या निधीत इतर साहित्यिक कार्यक्रम करा म्हणून सांगणारे नारळीकर आज आपल्यातून निघून गेलेत. पण त्यांच्या पुस्तकांच्या, कथांच्या आणि वैज्ञानिक विचारांच्या रूपांत ते अजूनही आपल्यात आहेत आणि कायम राहतील. अवकाशात त्यांची एक वेगळी जागा त्यांनी निर्माण केलीय जी तेजाने भारीत आहे. आर्यभट्टापासून गॅलिलियो आणि सॉक्रेटिसपासून हॉकिंगपर्यंतच्या साऱ्या देवदूतांच्या रांगेत आता नारळीकर दिसतील. हे साऱ्या अवकाशस्थ शक्तींनो, स्वागताला तयार राहा… एक विज्ञान महष आपल्या मांदियाळीत सामील होण्यासाठी प्रस्थान करत आहे…!                               – श्रेयश शिंदे, कणकवली 9404917814

Leave a Reply

Close Menu