वेंगुर्ला नगरपरिषद शहरातील दोन चार राजकारणी व निवडक कंत्राटदार लॉबीतील लोकांच्या हाताखाली त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार हाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत निदनीय असून त्याचा आम्ही निषेध करतो. न.प.ने शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करताना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावे, अशी मागणी वेंगुर्ल्यातील सजग नागरिकांनी मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्याकडे केली आहे.
अॅड.नंदन वेंगुर्लेकर, अॅड.मनिष सातार्डेकर, डॉ.वंदन वेंगुर्लेकर व अवधूत वेंगुर्लेकर यांनी मुख्याधिकारी किरूळकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केले की, गेली अडीच ते तीन वर्षे पालिकेचा कारभार प्रशासकांच्या नेतृत्वाखाली चालविला जात आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी व वेंगुर्ल्यातील मोजक्या राजकारण्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे पालिकेचा कारभार हाताळला आहे.
शहरातील सर्व प्रकारचे कर भरणाया सामान्य नागरिकांना कधीच आदराने बोलावले जात नाही, ही बाबही अतिशय खेदजनक आहे. या प्रकारचा आम्ही निषेध व्यक्त करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केवळ चार-पाच व्यक्ती म्हणजे संपूर्ण शहर असूच शकत नाही. याची साधी जाणीव पालिकेला नाही. विविध उपक्रमांच्या नियोजनाबाबत यापूर्वीच्या आढावा बैठकीत फक्त राजकीय पक्ष प्रतिनिधी व निवडक कंत्राटदार लॉबी यांना बोलावून सामान्य नागरिकांची गळचेपी केली आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त, कोकण भवन बेलापूर यांच्याकडे आपली रितसर तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी मुख्याधिकारी यांना दिला.