शिक्षणासोबतच आपला दृष्टिकोन बदला – न्याय.रेडकर

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने तालुक्यातील सातवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शक ठरेल अशा १७, १८ मे आणि २४, २५ मे या चार दिवसीय विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन व्हिजन वेंगुर्ला, मुंबई आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांनी केले आहे.

   या सोहळ्याच्या शुभारंभाप्रसंगी प्रमुख वक्ते व उद्घाटक न्यायधीश आकाश रेडकर, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री कार्यालयाचे मंत्रालयीन मुख्य जनसंफ अधिकारी व माध्यम सल्लागार तथा व्हिजनकार कृष्णदर्शन जाधव, नगरपरिषदेचे उपमुख्य प्रशासकीय अधिकारी वैभव म्हाकवेकर, टीव्ही मालिका दिग्दर्शक तथा व्हिजनकार निलेश डिचोलकर, व्हिजनकार संगीता धुरी-परब, न्यायधीश सपना हर्णे, कलाक्षेत्र समन्वयक रूपाली डिचोलकर, वेंगुर्ला पत्रकार संघाचे विनायक वारंग, ग्रामजीवनोत्तीच्या समन्वयक सायली आंगचेकर आदींसह बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

   प्रत्येकाने आपल्या प्रगतीसाठी शिक्षणासोबतच आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. तसेच जर दृष्टिकोन बदलला, तरच करिअरची दिशा आणि दशा बदलेल असे न्यायाधीश आकाश रेडकर म्हणाले. प्रथम सत्रात ‘न्यायालय आणि कायदे यामधील उपलब्ध संधी, परीक्षांची तयारी, पोक्सो कायदा‘ यावर  मार्गदर्शन करताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे क्षेत्र निवडण्याचे आवाहन न्यायाधीश रेडकर यांनी केले.

   तर द्वितीय सत्रात ‘सोशल माध्यम, मुलांची मानसिकता आणि उपलब्ध नवनवीन संधी‘ यावर सोशल मिडिया इन्फ्लून्सर, सर्वोत्कृष्टरिल्स मेकर आणि विविध पुरस्कार विजेते प्रा.अक्षय हेदुळकर यांनी सहज सोप्या गोष्टीसह सोशल मिडियातील अर्थाजनाबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच तृतीय सत्रात मुंबईस्थित नाट्य कलाकार, लेखक, सूत्रसंचालक असलेले किसन पेडणेकर यांनी ‘एकांकिका, लेखन, मालवणी भाषा, समाजसेवा आणि विविध संधी‘ याबद्दल मार्गदर्शन केले.

     दुस­या दिवशी ‘टीव्ही मालिका, सिनेक्षेत्रातील संभाव्य अडचणी आणि उपलब्ध संधी‘ याबाबत आघाडीच्या मालिकांचे दिग्दर्शक, कार्यकारी निर्माता मुंबईस्थित निलेश डिचोलकर मार्गदर्शन करताना, एकूणच कला क्षेत्रातील अनेक समज आणि गैरसमज याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर केल्या. तसेच येत्या काळात व्हिजन वेंगुर्लाच्या माध्यमातून या पुढील टप्यात क्षेत्र, महाविद्यालय निवडीसाठी सहकार्य करण्यासोबतच डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू करण्याचे व्हिजनकार कृष्णदर्शन जाधव यांनी स्पष्ट केले.

   सूत्रसंचालन कर्पूरगौर जाधव आणि निशा वालावलकर-जाधव यांनी केले तर रिता घाडी यांनी स्वागत केले. स्वाती परब यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Close Menu