नराचा नारायण बनलेला हा जैतिर उत्सव तुळस गावातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या उत्सवाला माहेरवाशिणींबरोबरच अन्य भाविकही उपस्थिती दर्शवित असतात. त्यामुळे अलोट गर्दी पहायला मिळते. यंदा हा उत्सव २६ मे पासून सुरू झाला आहे. या उत्सवासाठी येणा-या भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे तसेच दुकानदारांनाही आपल्या मालाची विक्री व्यवस्थित करता यावी यासाठी देवस्थानतर्फे गेले काही दिवस नियोजन केले होते. २६ मे रोजी पहाटेच श्रींची पूजा झाल्यानंतर सकाळपासून भाविकांनी मंदिरात गर्दी करीत श्रींचे दर्शन घेत नवसाची फेड केली. तर नविन नवसही बोलण्यात आले. दुपारनंतर मंदिराकडे भाविकांची गर्दी वाढू लागली. मांडावर खेळणा-या देवाचा आशिर्वाद घेण्यासाठी भाविकांची गडबड दिसत होती. तसेच मंदिर परिसरात केळी, नारळ, ओटी, मिठाई, खाद्यपदार्थ तसेच जीवनाश्यक वस्तूंची दुकानेही मांडण्यात आली होती. या उत्सवाला घोंगड्याही विक्रीसाठी आल्या होत्या. काहींनी याची खरेदीही केली. ४ जून रोजी कवळासाने या उत्सवाची सांगता होणार आहे.