खारेपाटण येथील शारदिय प्रतिष्ठानचा प्रा. शरद काळे स्मृती पुरस्कार यावर्षी तळेरे येथील सेवाभावी डॉक्टर दाम्पत्य डॉ.मिलिद कुलकर्णी व डॉ ऋचा कुलकर्णी यांना जाहीर झाला होता. सदरचा पुरस्कार डॉ. कुलकर्णी दाम्पत्यांना २४ मे रोजी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत यांच्या हस्ते धारखंड-वाळपई येथे प्रदान करण्यात आला. रोख १० हजार, मानपत्र, शाल-श्रीफळ, मोरपीस असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. काळे सरांसारख्या समर्पित भावनेने आपले कार्य करणाया एका सत्प्रवृत्त शिक्षक व लेखकाच्या नावे मिळणारा हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरक असून पुढे कार्य करण्यासाठी बळ देणारा आहे असे कुलकर्णी दाम्पत्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी शारदिय प्रतिष्ठानचे वर्षा काळे, चारूता काळे-प्रभूदेसाई, डॉ.अनुजा जोशी, कपिल काळे उपस्थित होते. याच कार्यक्रमात ‘सत्यकथा‘ या दर्जेदार मासिकात लेखन केलेले व कोकणचे ज्येष्ठ कथालेखक आणि खारेपाटण हायस्कूलचे माजी प्राचार्य शरद काळे यांचे शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक कार्य उलघडून दाखविणारा ‘ही एक प्रेरक सत्यकथा‘ हा कार्यक्रम मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांनी सादर केला.