महिला सक्षमीकरण प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी येथे महिला सक्षमीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला प्रतिनिधींच्या नेतृत्ववृद्धीसाठी ‘विलीड‘ उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग डायोसिजन विकास संस्था सावंतवाडी, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, समता प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, सामाजिक संवेदना आजरा, दिशा सामाजिक संस्था चंदगड आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सावंतवाडी-नवसरणी येथे करण्यात आले. पंचायत राज व्यवस्था आणि महिला सदस्यांची क्षमता बांधणी करून त्यांना त्यांच्या जबाबदा­या अधिक प्रभावीपणे पार पाडता याव्यात यासाठी मार्गदर्शन करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.  शिबिराला सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी, कारीवडे, लक्किट्टे, एरडोळ, प्रेरणोली, पारपोली, कुणकेरी, तुळस, मातोंड, पाल, मठ, होडावडे, घावनळे, आंबोली आदी गावातील महिला सरपंच व ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.

     महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळाल्याशिवाय ख-­या अर्थाने लोकशाही सक्षम होऊ शकत नाही. या प्रशिक्षण शिबिरात महिला प्रतिनिधींना प्रशासनिक कौशल्य, निर्णयक्षमता, शासकीय योजना, कायदेशीर अधिकार, महिला हक्क व ग्रामविकासातील त्यांची भूमिका या मुद्द्यांवर सखोल माहिती देण्यात आली. महिलांनी त्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये स्वयंपर्यंत निर्णय घेण्याची क्षमता कशी विकसित करावी याबद्दल मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणामुळे नवीन आत्मविश्वास, सुस्पष्ट दिशा आणि प्रभावी संवादकौशल्य लाभल्याचे महिलांनी सांगितले.

      आजपर्यंत आम्ही काम करत होतो, पण अनेक गोष्टींची नीट माहिती नव्हती. या प्रशिक्षणामुळे आमच्यात बदल घडत आहे. आता आम्ही अधिक प्रभावीपणे काम करू असे एका महिलेने स्पष्ट केले.  सदर उपक्रम भविष्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा आयोजकांचा मानस असून, महिलांचा सामाजिक व राजकीय सहभाग वाढवणे, हे यामागील दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. शिबिराचा समारोप करताना आयोजकांनी उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले व त्यांच्या यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Close Menu