शहरासाठी पोलीस पाटीलाची नियुक्ती करा!

वेंगुर्ला शहरामध्ये गेली कित्येक वर्षे पोलीस पाटील नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तरी त्वरित पोलीस पाटीलाची नेमणूक करून शहरवासीयांची गैरसोय दूर करावी अशी मागणी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

     शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना वारस तपास, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र अशा विविध दाखल्यांकरीता व विविध कामांकरीता पोलीस पाटील यांच्या दाखल्याची आवश्यकता भासते. काही महिन्यांपूर्वी वेंगुर्ला तालुक्यातील गावागावांमध्ये पोलीस  पाटील यांची पदे भरण्यात आली. परंतु, वेंगुर्ला शहरासाठी अद्यापही पोलीस पाटील नेमण्यात आलेले नाहीत. दरम्यान, ग्रामीण भागात पोलीस  पाटीलाची पदे भरताना एकाच गावात एकापेक्षा जास्त पदे भरण्यात आली आहेत. वेंगुर्ला शहरातील लोकसंख्येचा विचार करता किमान एक तरी पोलीस पाटील कार्यरत असणे गरजेचे आहे. सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दाखल्यासाठी वणवण फिरणा­या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शहराला आवश्यक पोलीस पाटील भरती घेण्यात आलेली होती. त्यांना असेल ती हरकत त्वरित दूर करून नियुक्त पत्र देण्यात यावे, असे अॅड. सातार्डेकर यांनी निवेदनात नमुद केले आहे.

 

Leave a Reply

Close Menu