यंदाच्या मे महिन्यातच बरसलेल्या अवकाळी पावसाने वेंगुर्ला शहरात चाललेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांनी स्वतः हस्तक्षेप करत पालिका प्रशासनाच्या अनेक गोष्टी लक्षात आणून दिल्या असल्या तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. याचाच परिणाम म्हणून संतापलेल्या नागरिकांनी पुन्हा ‘वेंगुर्ले शहर नागरी कृती समिती‘ पुनरूज्जीवित केली असून समितीच्या कार्यकर्त्यांनी ६ जून रोजी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी स्पॉट पंचनामा करत पालिकेच्या कारभारावर पुन्हा बोट ठेवले आहे. यावेळी नंदन वेंगुर्लेकर, संजय गावडे, रूपाली पाटील, दीपा जाधव, कैवल्य पवार, हरेश खानोलकर, वंदन वेंगुर्लेकर, प्रबोध मराठे, नाथा कदम, लवू तेरसे यांच्यासह जागरूक नागरिक उपस्थित होते.
पालिकेने शासनाचे २५ लाख खर्च करून कॅम्प गार्डन येथे चारचाकी इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिग स्टेशन उभारले आहे. शुभारंभ झाल्यानंतर दोन दिवसातच मशिनला काळे प्लास्टिक गुंडाळून ठेवण्याची वेळ पालिकेवर आली आहे. शहरात बक्षिसाच्या रक्कमेतून वॉटर एटीएम व एटीएम
टॉयलेट काही ठिकाणी उभारली आहेत. ही सर्व युनिटे आठवडाभरही चालली नाहीत. यारून पालिकेच्या उधळपट्टीची जाणीव होते, असा आरोप नागरिकांनी केला. शहरातील अर्धवट विकासकामांमुळे अशा भागातून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांचे हाल होत आहेत. पालिकेचे नियंत्रण नसल्याने अशाप्रकारे विकासकामांचा खेळखंडोबा झाला असल्याचे साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी स्पष्ट केले.
पालिकेचे नव्याने आलेले मुख्याधिकारी अत्यंत निष्क्रिय असल्यानेच ठेकेदारांचे फावले आहे. त्यांना कोणतेच भय उरले नसल्याने ते वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे खोदाई करून रस्त्यांची वाट लावत आहेत. केवळ कमिशन लाटण्यासाठी नको ती कामे रेटून नागरिकांच्या माथी मारली जात असल्याचा आरोप संजय गावडे यांनी केला.
कृती समितीचे निमंत्रक अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांनी पालिकेला कडक इशारा देताना दर चार दिवसांनी पालिकेने केलेल्या कामांचा स्पॉट पंचनामा करण्यात येईल. पालिकेने आता तरी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी. ठेकेदारांचे लाड थांबवून कामांचा दर्जा तपासावा. जे ठेकेदार दर्जा राखून काम करीत नाहीत त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे. चुकीच्या कामांना कोणत्याही परिस्थितीत पाठिशी घातले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.