आई…तुझी खूप आठवण येते गं. आता तू मला कधीच दिसणार नाहीस.नुसत्या आठवणींवर आठवणी येतात. मन कायम भूतकाळात रमते. तू होतीस म्हणून मी व उमेश इथपर्यंत पोहोचलो आणि तू होतीस म्हणून आमच्या जीवनाला अर्थ मिळाला..योग्य दिशा मिळाली.
मी अडीच वर्षे व उमेश केवळ दहा महिन्यांचा असताना आमचे वडील देवाघरी गेले. वडील म्हणजे काय असतात. हे समजण्याचे दोघांचेही वय नव्हते. आमचे वडील ज्यावेळी वारले तेव्हा खानोलीला आमच्या आजोळी तू ठेवलेस. कारण आमचा घरी राहून सांभाळण्याचा प्रॉब्लेम होताच. शिवाय तुला डी.एड.चे ट्रेनिंग होते. नोकरी करण्यासाठी ते प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे होते. त्यामुळे मी व उमेश तुझ्याशिवाय दोन वर्षे खानोलीत होतो.तिघी मावश्या व अत्यंत प्रेमळ अशी आजी आम्हाला लाभली. खानोलीची शाळा ही घरापासून लांब होती. त्यामुळे आम्हा दोघांनाही घरात अभ्यास करून बाहेरून परीक्षा देऊन पुढच्या इयत्तेत जावे लागत होते. तू महिन्यातून एकदा यायचीस तेव्हा आम्हाला खूप आनंद होत असे. तू भरपूर खाऊ, कपडे आणत होतीस. त्यानंतर तुला वेंगुर्ल्यात पोस्टिंग मिळाले व जागा भाड्याने घेऊन आम्ही पुढील शिक्षणासाठी वेंगुर्ल्यात दाखल झालो. आपल्या स्वतःच्या शाळेत कधी तू आम्हाला ठेवले नाहीस. त्यामुळे बाकीच्या मुलांप्रमाणे आम्हाला शाळेत ट्रिट केले गेलो.
वेंगुर्ल्यातून १९६८ साली तुझी शिरोड्याला बदली झाली. १९७५ पर्यंत आमचे शिक्षण शिरोड्यात झाले. खर्डेवाडी शाळेमध्ये माझे तर शिरोडा नं.१ शाळेत उमेशचे शिक्षण झाले. शिरोड्यातील तेव्हाचे मित्रमैत्रिणी अजूनही आमच्या संफात आहेत. शाळेत, गावात सगळीकडे मानाने तुला वागवायचे. अक्षरशः रक्ताचे पाणी करून तू शाळेतल्या मुलांना शिकवले. हे सर्व पालकांच्या मनात होते. शिरोड्याला भरपूर ताज्या पालेभाज्या, मासे. तसेच फळांची रेलचेल होती. आमची तब्येत सुद्धा उत्तम होती. १९७५ नंतर तुझी बदली वेंगुर्ल्यात झाली व आमचे कॉलेज शिक्षण तिथेच सुरू झाले. आई हीच सबकुछ हे आमच्या बालमनावर कोरले गेले होते. कधीच कुणा दुस-यांचे बाबा बघून ‘आम्हाला वडील असते तर..‘ असे कधीच वाटले नाही. कारण तू एवढे कष्ट करत होतीस की कुठल्याच बाबतीत आम्हाला त्यांची उणीव भासू दिली नाहीस. तुझे नेहमी म्हणणे असायचे की. मुलीची जात आहे. दुसयाकडे कुठलीही वस्तू मागायला जायचे नाही. त्यामुळे तिच्या आवडीप्रमाणे सर्व घेऊन द्यायचे. दोघांचेही तू आपल्या ऐपतीप्रमाणे खूप लाड केलेस आणि तेवढे धाकात पण ठेवलेस.
‘विद्या, मागे फिर.‘ असे शब्द कानात पडल्यावर माझी काय बिशाद होती एक पाऊल पुढे टाकायची.डोळ्याच्या धाकात आम्ही वाढलो.पण त्याचे कधीच वाईट वाटले नव्हते. कारण, आई करते ते आपल्या भल्यासाठी एवढे नक्की कळत होते. आम्ही दोघेही सगळ्या इयत्ताच्या वर्गात चांगल्या मार्कांनी पास होणे किवा नंबरमध्ये येणे हेच तिचे ध्येय होते. किबहुना आम्हाला लहानाचे मोठे करणे. शिकवून आपल्या पायावर उभे करणे. हेच तिच्या जगण्याचे खरे कारण होते. आम्ही विश्व होतो तिचे.
आम्हा दोघांना ग्रॅज्युएट करणे व स्वतःच्या पायावर उभे करणे हेच तिचे आयुष्य जगण्याचे कारण ठरले. स्वतःसाठी कधी नवीन साडी खरेदी केल्याचे मला आठवत नाही. कधी हॉटेलमध्ये जाणे नाही. कधीच कसली चैनीची वस्तू उपभोगली नाही. नोकरी करून घरात स्वतः धुणीभांडी केली. विहिरीचे पाणी आणायला, भरायला अशी सगळी कष्टाची कामे केली आणि त्यातही वेळ काढून गणिताच्या वगैरे शिकवण्या घ्यायची. त्यावेळी महिन्याला दोन रूपये फी असायची.कित्येक गरीब मुलांना तिने फुकटच शिकवलय. शाळेत सुद्धा ती पोटतिडकीने शिकवायची. मुले पण आवडीने ‘देसाई बाईच‘ पाहिजेत असा हट्ट धरायची.
आई बरोबर बाजारात जायची सोय नव्हती. पाच पावले चालली की कोणतरी विद्यार्थी भेटायचा. भर रस्त्यात तिला नमस्कार करायचा. मग आई पण त्याची चौकशी करायची. असे सारखे होत असे. तसेच मुलांचे पालक दिसले की त्यांना त्यांच्या मुलांविषयी प्रगती सांगायची. मग तेही मुलांच्या गोड तक्रारी करत. मग आमच्या आईसाहेब शाळेत गेल्यावर आठवणीने त्या त्या मुलांना गोड बोलून कसे वागायचे. आईवडिलांबरोबर कसे वागावे, अभ्यासाचे आयुष्यात काय महत्व आहे ते त्याला पटवून द्यायचे आणि तो मुलगा खरेच सुधारायचा. अशी कितीतरी मुले तिने तिच्या शैलीत चांगल्या मार्गाला लावली. ‘देसाई बाई‘, म्हटले की मुलांच्या मनात एक आदरवजा भीती असायची. तिने अनेक अशी चांगली मुले घडवली.
आम्ही ग्रॅज्यूएट झाल्यावर मात्र दोघेही चांगल्या नोकरीला लागलो. मी प्रथम पोस्ट ऑफिसमध्ये नंतर युनियन बँकमध्ये तर उमेश सारस्वत बँकमध्ये लागलो आणि तिचे शारीरिक कष्ट करण्याचे दिवस संपले. पण जबाबदारी मात्र वाढली. माझे लग्न. ही मोठी जबाबदारी होती. परंतु ईश्वराच्या कृपेने बांबुळकरांसारखे उत्तम स्थळ आले व पहिल्यांदाच पाहण्याच्या कार्यक्रमात १९८३ मध्ये ती माझ्या जबाबदारीतून मुक्त झाली. तसेच १९९० मध्ये उमेशचेही दोनाचे चार हात झाले. त्यानंतर उमेश प्रमोशन घेऊन मुंबईला गेला व जरा स्थिर झाल्यावर विरारला फ्लॅट घेऊन आईलाही तिथे घेऊन गेला. तिथपासून ते २० मार्चपर्यंत आईला एकदम सुखात ठेवले. आयुष्यात कधीच ती आजारी पडली नाही. किरकोळ सर्दी, ताप असला तर त्यालाही गोळ्या घेऊन काम चालू. शेवटचे मात्र तीन महिने तिला बरे नव्हते. तेव्हा मलाही वेळ होता. बँकेतून व्हॉलन्ट्री घेतल्याने व नातवंडांचे पण सेटअप झाल्याने मी विरारला राहू शकले व आईची मनापासून सेवा केली. तिला मी कोल्हापुरातून आलेले पण कळत नव्हते. वेगवेगळी नावे घ्यायची. त्यावेळी खूप वाईट वाटायचे. पण मनाला खूप समाधान होते की मी तिच्या शेवटच्या काळात तिच्याबरोबर होते.
पण मला एक कायमची खंत लागून राहिली की, २० मार्च २०२५ रोजी ती स्वर्गवासी झाली त्यावेळी मी विरारला जाऊ शकले नाही. कारण माझा मोठा कार अपघात झाला होता. त्यात पायाचे हाड दोन ठिकाणी मोडल्याने आदल्या दिवशीच माझे मोठे ऑपरेशन झाले होते. आम्ही कुणीच जाऊ शकलो नाही. उमेशने मात्र आपले कर्तव्य चोख बजावले.
आपल्याला पुनर्जन्म असेल तर हीच आई जन्मोजन्मी मिळावी हिच परमेश्वराजवळ प्रार्थना!
– विद्या बांबूळकर. कोल्हापूर-९४२०४९३०३४