हिंदवी स्वराज्य स्थापनेत मोलाचा वाटा असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भारतीय जनता पाट, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘जिजाऊ पुरस्कार 2025‘ चे आयोजन वेंगुर्लेत करण्यात आले. या वषचा पुरस्कार तुळस येथील सौ. माधवी बबन घोगळे यांना प्रदान करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
माधवी घोगळे यांनी आपल्या दोन्ही मुलांना (शिवम आणि जान्हवी) उत्कृष्ट संस्कार, शिक्षण व शिस्तीचे मोल शिकवून त्यांना जीवनात यशस्वी करण्यासाठी मातृभूमीवर आदर्श घालून दिला आहे. त्यांचा मुलगा शिवम घोगळे हे एक प्रेरणादायी आणि अत्यंत यशस्वी मॅरेथॉन धावपटू असून त्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. “Run 12 Hr Sawantwadi – 5th Edition” या कार्यक्रमासाठी त्यांची निवड Face of the Event म्हणून करण्यात आली आहे. त्याची यशस्वी कामगिरी खालीलप्रमाणे:
टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 2025- 2 तास 15 मिनिटांच्या वेळेसह 4 था क्रमांक. धुळे मॅरेथॉन 2025- 21 किमी अंतरात पहिला क्रमांक, वैयक्तिक सर्वोत्तम वेळ: 1 तास 8 मिनिटे. मुंबई विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धा- 2 वर्षात मिळवले 6 पदके. महाराष्ट्र इंटर युनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 – रौप्य पदक. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप- मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व 4 वेळा. ठाणे मॅरेथॉन 2024 – 5 किमी अंतरात पहिला क्रमांक, वेळ: 14 मिनिटे 52 सेकंद.
शिवम घोगळे यांची धावण्यातील कामगिरी ही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांची शिस्त, मेहनत आणि सातत्य यामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा भारताचे प्रतिनिधित्व करू शकतील, अशी आशा आहे. त्यांची मुलगी जान्हवी बबन घोगळे अभ्यासू युवती असून त्यांनी आपले शिक्षण तसेच पत्रकारिता क्षेत्रातील प्रारंभिक अनुभव अत्यंत नेटकेपणाने पूर्ण केले असून इंग्रजी साहित्य विषयात पदवी प्राप्त करून भाषिक अभिव्यक्ती व साहित्यिक जाणिवांचा पाया भक्कम केला. मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता या क्षेत्रात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून वृत्तपत्रसंपादन, डिजीटल मिडिया, सार्वजनिक संवाद यांसारख्या क्षेत्रात सखोल ज्ञान संपादन केले आहे. आपल्या शैक्षणिक ज्ञानास प्रत्यक्ष अनुभवाची जोड देताना त्यांनी डिजीटल कोल्हापूर न्यूज चॅनेलमध्ये इंटर्नशिप पूर्ण केली. या काळात त्यांनी बातमी संकलन, लेखन, संप्रेषण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सादरीकरण यामध्ये मूल्यवान अनुभव घेतला. त्यांच्या आईच्या त्यागमय व प्रेरणादायी मातृत्वाचा गौरव करत, या पुरस्काराद्वारे त्यांचे योगदान सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात “स्वराज्याच्या संकल्पनेला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे स्मरण करणे, ही आपल्या संस्कृतीची कृतज्ञ परंपरा आहे” असे मत आनंदयात्रीचे अजित राऊळ सर यांनी मांडले. उपस्थित मान्यवरांनी सौ. घोगळे यांच्या कार्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले. या कार्यक्रमाद्वारे, स्त्रीशक्तीच्या बळावर सशक्त समाजनिर्मिती कशी घडू शकते याचा आदर्श उदाहरणातून समाजासमोर ठेवण्यात आला. ‘जिजाऊ पुरस्कार‘ हा केवळ सन्मान नसून स्त्रीच्या कर्तृत्वाची सार्वजनिक कबुली आहे“ असे गौरवोद्गार या कार्यक्रमाचे संयोजक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी काढले.
यावेळी तुळस सरपंच रश्मी परब, साईप्रसाद नाईक, ॲड. सुषमा खानोलकर, मनवेल फर्नांडिस, सुहास गवंडळकर, सुजाता पडवळ, दादा केळुस्कर, वृंदा गवंडळकर व आकांक्षा परब, रामू परब, माजी सरपंच शंकर घारे व विजय रेडकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, वैभव होडावडेकर, प्रा. डॉ. सचिन परूळकर, आनंदयात्रीचे अजित राऊळ, उपसरपंच सचिन नाईक, संतोष शेटकर, प्रमोद गोळम, विनय गोरे, सचिन नाईक, ग्रा.पं.सदस्य जयवंत तुळसकर, सत्यवान पालव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्रा.डॉ.सचिन परुळकर यांनी केले.