कुटुंबाचा चरितार्थ चालवित असताना कठीण प्रसंगी हतबल न होता आपल्या मुलांना उत्तम संस्कार आणि शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट भरारी घेण्यासाठी अतोनात मेहनत घेतलेल्या तुळस येथील सौ. माधवी घोगळे या महिलेला सिधुदुर्ग भाजपाच्यावतीने ‘जिजाऊ पुरस्कार २०२५‘ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
माधवी घोगळे यांना दोन मुले असून मुलगा शिवम याने मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. सध्या त्याची कुडाळ आणि सावंतवाडी मॅरेथॉन स्पर्धेसाठी ‘ब्रॅण्डअॅम्बॅसिडर‘ म्हणून निवड केली आहे. तसेच त्यांची कन्या जान्हवी हिने मास कम्युनिकेशन, पत्रकारिता, वृत्तपत्रसंपादन, डिजीटल मिडिया, सार्वजनिक संवाद या क्षेत्रात काम केले आहे. तसेच इंग्रजी साहित्य विषयातही पदवी प्राप्त केली आहे. सौ. माधवी घोगळे यांनी आर्थिक परिस्थिती नसतानाही आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देऊन मुलांना घडविण्याचे काम केले आहे. सौ. घोगळे यांच्या या कार्याची दखल घेऊन भाजपातर्फे पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, माजी सरपंच शंकर घारे व विजय रेडकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, वेताळ प्रतिष्ठानचे सचिन परूळकर, आनंदयात्रीचे अजित राऊळ, भाजपाचे प्रसन्ना देसाई, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस, सुहास गवंडळकर, सुजाता पडवळ, दादा केळुसकर, वृंदा गवंडळकर, आकांक्षा परब, रामू परब, वैभव होडावडेकर, संतोष शेटकर, प्रमोद गोळक, विनय गोरे, सचिन नाईक, सत्यवान पालव आदी उपस्थित होते.