गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा मंडळाच्या समाजविकास दृष्टिकोनाचा अविभाज्य भाग आहे. गुणी विद्यार्थ्यांना समाजाकडून मिळणारा सन्मान त्यांना यशाकडे नेणा-या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतो. विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून अधिकारी किवा उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा. तसेच आपले भविष्य घडवताना समाजाच्या आशा-अपेक्षांचे प्रतिक बनावेत, असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर यांनी केले.
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लातर्फे तालुक्याती विविध शाळांमधून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या भंडारी ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम २९ जून रोजी साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाला. उद्घाटन सातार्डा येथील उद्योजक योगेश मांजरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर मंडळाचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर, उपाध्यक्ष वृंदा कांबळी, मुंबईतील यशस्वी उद्योजक भाऊ आंदुर्लेकर, रमण वायंगणकर, सुरेश बोवलेकर, अंकिता बांदेकर व मंडळाचे संचालक उपस्थित होते.
या कार्यक्रमात वेंगुर्ला तालुक्यातील विविध शाळांतील दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, पुस्तक भेट आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव तर रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत इंग्लिश मिडियमची विद्यार्थीनी शमिका तळवणेकर हिने दहावी परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. योगेश मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश देत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख‘ हे प्ररणादायी आत्मचरित्रात्मक पुस्तक भेट दिले. भंडारी समाज मंडळ शिक्षण, सन्मान आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाज उभारण्याचे करीत असलेले कार्य उल्लेखनीय असून या मंडळाला नेहमीच आमचा आर्थिक पाठींबा राहणार असल्याचे भाऊ आंदुर्लेकर म्हणाले. वृंदा कांबळी यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, श्रम आणि समर्पणाच्या मूल्यांची जाणीव करून देणारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अॅड.श्याम गोडकर यांना भारत सरकारची नोटरी पदवी मिळाल्याबद्दल रमण वायंगणकर यांच्या हस्ते तर योगेश मांजरेकर व भाऊ आंदुर्लेकर यांचा अॅड.श्याम गोडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ.आनंद बांदेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन आणि आभार डॉ.सचिन परूळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद केरकर, विकास वैद्य, दिपक कोचरेकर, गजानन गोलतकर, डॉ.जी.पी.धुरी, श्रेया मांजरेकर यांनी परिश्रम घेतले.