वेतोरेच्या सातेरी विकास सोसायटीला नाबार्डचा पुरस्कार

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मार्फत वेतोरे येथील श्री सातेरी प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. वेतोरे या संस्थेला नाबार्डचा नॉन क्रेडिट सव्र्हस (कर्ज वाटपाव्यतिरिक्त इतर व्यवसाय) क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ आणि नाबार्डच्या ४४व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सातेरी  सोसायटीचे चेअरमन दत्ताराम गणपत नाईक व व्यवस्थापक नारायण बाबूराव नाईक यांनी सोसायटीच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, नाबार्डचे उपप्रबंध निदेशक गोवर्धनसिह रावत, मुख्य निदेशक रश्मी दराद आदी उपस्थित होते.

   सातेरी सोसायटीची सभासद संख्या ९८० एवढी असून या सोसायटीच्या माध्यमातून किराणा माल विक्री दोन दुकाने, दूध डेअरी, खत विक्री, बि-बियाणे विक्री, स्वस्त दराचे धान्य दुकान (रेशन दुकान), कर्ज विभाग असे विभाग चालविले जातात. सोसायटीचा एकूण टर्नओव्हर ७ कोटी रूपये एवढा आहे. सोसायटीचा सन २०२३-२४ सालचा एकत्रित नफा १४,०७,३२३ एवढा आहे. सोसायटीची कर्मचारी संख्या ११ आहे. नाबार्डच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २१ हजार विकास संस्थांतून या सोसायटीची निवड करण्यात आली. सातेरी सोसायटीला पुरस्कार मिळण्यात सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी, संचालक, सभासद यांचा मोलाचा वाटा आहे. सातेरी सोसायटीला पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सोसायटीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

Leave a Reply

Close Menu