वेंगुर्लेची नात पुर्वा रश्मी संदीप गावडे हिने नुकत्याच सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून उल्लेखनीय कामगिरीने सिंधुदुर्गचा नावलौकीक राज्यात तसेच अन्य देशांत केला. यानिमित्त वेेंगुर्ल्याची नात असलेल्या पूर्वाचा वेंगुर्ला हायस्कूलच्या सभागृहात वेंगुर्ले तालुक्यातील विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून पुर्वा व तिचे आई-वडील यांचा सत्कार वेंगुर्ले नायब तहसिलदार क्षितीजा जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
पुर्वाने जिद्द, चिकाटी ठेवून मेहनत चांगल्या प्रकारे केल्याने तिला हे यश मिळाले आहे. सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून उल्लेखनीय कामगिरी करत ती सिंधुदुर्गातील पहिली सिंधुकन्या ठरली आहे. पुर्वा यापुढेही नक्कीच भारतकन्या व विश्वकन्याही होईल. पुर्वा गावडे हिचे नावसुध्दा पाठ्यपुस्तकात येईल, असा विश्वास पुर्वा हिचे जलतरण प्रशिक्षक दीपक सावंत यांनी तिला शुभेच्छा देताना व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांमध्ये आधार फाऊंडेशनच्या संस्थापक माधुरी वेंगुर्लेकर, महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा परब, माजी नगराध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल, भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा प्रभू-खानोलकर, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष आनंद बोवलेकर, माजी अध्यक्ष योगेश नाईक, जलतरण प्रशिक्षक दीपक सावंत, वेंगुर्ला तालुका बहुविध क्रीडा परिषदेचे पदाधिकारी नंदन वेंगुर्लेकर, वेंगुर्ला तालुका क्रीडा समन्वय समितीचे जयराम वायंगणकर, माझा वेंगुर्ला संस्थेचे अमृत काणेकर, वेतोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय परब, अणसुर-पाल हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश घाटवळ, दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे सल्लागार प्रदीप सावंत, भरत सातोसकर, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे, क्रीडा प्रशिक्षक जयवंत चुडनाईक, संजीवनी परब, डॉ. वंदन वेंगुर्लेकर आदीचा समावेश होता.
यावेळी विविध संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना प्रत्येक संस्थेच्या प्रतिनीधींनी, वेंगुर्लेतील सुपुत्रीने मिळविलेले यश हे वेंगुर्लेचे सिंधुदुर्गबरोबरच राज्यात व देशात नावलौकीक करणारे ठरले आहे. तिचे यश द्विगुणीत होत जावो, भविष्यात ती जगातील जलतरण स्पर्धेत
तसेच ऑलिंपिकमध्येही देशाचा नावलौकीक करणारी विश्वकन्या होवो, अशा शुभेच्छांचा वर्षाव तिच्यावर करण्यात आला. पूर्वा ही वेंगुर्ले येथील कै. भरत सापळे यांची नात तर पूर्वाश्रमीची रश्मी सापळे व तरुण भारतचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी संदीप गावडे यांची कन्या आहे.
पूर्वा गावडे सत्काराला उत्तर देताना म्हणाली, माझ्या आई-वडिलांनी मला जलतरणसाठी प्रोत्साहन दिले, हे खरे असले तरी मला जलतरणचे अचूक प्रशिक्षण देणारे माझे गुरू प्रशिक्षक दीपक सावंत हेच माझ्या यशाचे खरे सुत्रधार आहेत. तुम्हा सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा व प्रोत्साहनाद्वारे प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या प्रशिक्षणातून पुढील जलतरण स्पर्धामध्ये यश पटकावण्यासाठी व वेंगुर्लेचा नावलौकीक करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन. तुम्हा सर्वाचे आशीर्वाद नक्कीच मला पुढील स्पर्धामध्ये यश प्राप्त करून देणारे ठरतील.
यावेळी शहर व तालुक्यातील विविध संस्था, संघटना, यांचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुर्वा गावडे हिला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी केले.