माणूस आणि प्राणी यांचे नाते हे शतकानुशतकांपासून विविध रूपांत विकसित होत आले आहे. मात्र, हे नाते खरोखरच्या करूणेच्या आधारावर उभे आहे की फक्त माणसाच्या सोयी आणि स्वार्थावर, हा प्रश्न नेहमीच विचार करण्यासारखा राहिला आहे. प्राण्यांना मारून खाणे, त्यांना ओझे वाहण्यासाठी वापरणे किवा धार्मिक भावनेने पुण्य मिळवण्यासाठी त्यांचा उपयोग करणे, हे सगळे प्रकार मानवी इतिहासात सामान्य आहेत. आजही रस्त्यावरील कुत्र्यांवरून होणारी वादविवाद, कबुतरांच्या घरांबाबतचे संघर्ष किवा हत्तींच्या मालकीवरून निर्माण होणारे तंटे, हे सगळे माणूस आणि प्राणी यांच्यातील जटिल संबंधांचे प्रतिबिब आहेत. या निमित्ताने, माणसाच्या यांत्रिक जीवनशैलीतही प्राण्यांबद्दलची भावना टिकून राहिली आहे, ही गोष्ट सुखावह वाटते. पण हे प्रेम खरे आहे की निवडक आणि स्वार्थी, याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.
माणसाने प्राण्यांसोबतचे सहजीवन सुरू केले ते भूतदयेच्या भावनेतून नव्हे, तर स्वतःच्या जीवनाला सोपे करण्याच्या प्रयत्नांतून. निसर्गातील एक सामान्य प्राणी असलेल्या माणसाने आपल्या प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, उपयोगी ठरणाया जीवांना आपल्या नियंत्रणात आणले. बैल, गायी, शेळ्या, घोडे, गाढव, उंट, कुत्रे, मांजर, कोंबड्या आणि अगदी हत्तींपर्यंत, सगळ्यांचा वापर तो विविध कारणांसाठी करत आला. निरोप पाठवण्यासाठी कबुतर पाळणे किवा मनोरंजनासाठी पोपटांना कैद करणे, हेही मुळात करूणेचे उदाहरण नव्हे. प्राण्यांना पाळणे म्हणजे त्यांच्यावर स्वामित्व गाजवणे आणि हे स्वामित्व त्यांच्या नैसर्गिक स्वातंत्र्यावर आक्रमण आहे. कल्पना करा, जर एखादा सिंह किवा वाघ माणसाला पाळतो म्हणून सांगितला तर? हे क्रूर वाटेल, मग माणसाचे हे वर्तन का वेगळे मानले जाते?
अलिकडच्या काळात हत्ती आणि कबुतरांवरून होणारे वाद हे या गुंतागुंतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हत्ती हा प्राणी जंगलात मुक्तपणे वावरायला जन्मलेला, पण माणसाने त्याला ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतिक बनवले. त्याच्या प्रचंड बुद्धिमत्ता आणि शक्तीचा उपयोग तो आपल्या फायद्यासाठी करत आला. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील हत्तिणीच्या ताब्यावरून झालेला गदारोळ, हा फक्त सामान्य लोक विरूद्ध न्यायव्यवस्था आणि आर्थिक सत्ता असा नाही, तर त्यात भावनिकताही मिसळलेली आहे. गावकयांना ती हत्तीण त्यांच्या गावाची शान वाटत होती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार तिला जंगलात परत पाठवण्याला त्यांचा विरोध होता. नांदणी मठातील हत्तीण ही लोकांच्या जगण्याचा महत्त्वाचा भाग होती. लोकांचा तीव्र विरोध, मोर्चा या सर्वांची दखल शासन आणि संबंधितांना घ्यावी लागली. हत्तीणीला पुन्हा आपल्या मूलनिवासामध्ये परतण्याचा मार्ग कायदेशीररित्या मोकळा करण्यात आला. सर्व सोपस्कार, तिच्यासाठी उपचार केंद्र आदी सर्वांची सोय होऊन हत्तीण आपल्या मूळ गावी परत येईल देखील; पण मुळात हत्तीला कोणाच्या ताब्यात ठेवण्याची गरजच काय? ती जंगलात मुक्त असावी असा विचार समाजामध्ये का रूजत नाही?
दुसरीकडे, मुंबईसारख्या शहरातील कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद हा आरोग्य आणि धार्मिक भावना दुखावणे यासंदर्भात आहे. राज्य सरकारने टप्प्याने ५१ कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला, कारण कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे माणसांच्या श्वसनसंस्थेला धोका निर्माण होतो. न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम ठेवत त्यांच्यासाठी पर्यायी जागांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत या निर्णयाविरोधात जैन समुदायाने भूतदयेच्या नावाने विरोध दर्शवला आहे. ते म्हणतात, बंदीमुळे कबुतरे रस्त्यावर मरत आहेत आणि हा निर्णय त्यांच्या धार्मिक विश्वासांविरुद्ध आहे. ब्रिटिश काळापासून सुरू झालेल्या या पथेची आजच्या दाट लोकवस्तीच्या शहराशी तुलना होऊ शकत नाही. शहरातील लोकसंख्येची घनता लक्षात घेता, आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. तरीही, धर्माचा मुद्दा जोडल्याने हा पश्न अधिक किचकट झाला आहे. कबुतर घरात येऊ नये म्हणून जाळ्या लावणे आणि त्याचवेळी पुण्ण्यासाठी त्यांना खायला घालणे, हा दुटप्पीपणा आहे. हा दुटप्पीपणा हे दाखवते की, माणसाचे प्राणीप्रेम निवडक असते फक्त सोयीच्या पाण्यांपुरते.
हे निवडक प्रेम अनेक ठिकाणी दिसते. हत्तिणीला जंगलात नेल्यावर राज्यभर गदारोळ होतो. गाय हा पवित्र प्राणी, पण दूध देण्याचे बंद झाले की तिला सोडून दिले जाते. गोहत्या बंदीमुळे भाकड गायी रस्त्यावर भटकतात, तेव्हा करूणा कुठे गायब होते? दुसरीकडे कोंबड्या, शेळ्या, बोकड यांची रोजची कत्तल अनेकांना आहारासाठी आवश्यक वाटते, पण भूतदयावादी त्याकडे दुर्लक्ष करतात. प्राण्यांच्या झुंजी लावणे ही परंपरा नाही, तर क्रूरता आहे. घोड्यांना रेससाठी धाववणे, गाढवांना ओझे वाहण्यासाठी मारणे किवा यात्रेत खेचरांना पायपीट करवणे, हे सगळे प्राणीप्रेमाशी विसंगत आहे.
या सगळ्यात माणूस आणखी एक चुकीची गोष्ट करतो आहे, ती म्हणजे प्राण्यांच्या नैसर्गिक सवयी बदलणे. प्रत्येक जीवाकडे अन्न शोधण्याची उपजत क्षमता असते आणि तो संघर्ष त्यांच्या जगण्याची प्रेरणा असते. पण शहरात सहज अन्न मिळत असल्याने कुत्रे, कबुतरे, कावळे यांची संख्या वाढते. ज्यामुळे त्यांच्या जीवनावर परिणाम होतो. ही तथाकथित दया प्राण्यांच्या जीवावर उठते.
अलिकडेच स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंद करण्याच्या निर्णयावरूनही वाद निर्माण झाला. काही महापालिकांनी हा निर्णय घेतला, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. स्वातंत्र्यदिनासारख्या राष्ट्रीय सणाला असे करणे अयोग्य आहे. अशा जनभावना सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत. प्रत्येकाला आपला आहार निवडण्याचा अधिकार आहे आणि विविध जाती-धर्मांच्या लोकसंख्येत अशी बंदी भावनिक मुद्दा बनू शकते. माणसाचे प्राणीप्रेम हे बहुतेकवेळा बेगडी आणि निवडक असते. खरी भूतदया ही प्राण्यांना मुक्त आणि नैसर्गिक जीवन देण्यात आहे, न की त्यांना उपयोगी ठरवण्यात. या दुटप्पीपणावर मात करून, माणूस आणि प्राणी यांचे सहजीवन अधिक समतोल आणि करूणामय बनवणे गरजेचे आहे. अन्यथा, हे नाते फक्त स्वार्थाचे साधन राहील.