राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रसिकांवर छाप पाडलेल्या, संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रीत झालेल्या, स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘भेरा’ या मालवणी चित्रपटाला राज्य शासनाचा दादासाहेब फाळके नावाने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र. 1 पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोकणातील चित्रीकरण असलेल्या या चित्रपटाने आपली मोहर उमटविली.
यानिमित्ताने मालवणी चित्रपटसृष्टीचा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर भिडे, प्रथम पदार्पण उत्कृष्ट अभिनेता दीपक जोईल व प्रथम पदार्पण उत्कृष्ट अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांनीही पुरस्कार पटकावले.
वैजप्रभा चित्र निर्मित ‘भेरा’ हा असा पहिला मालवणी चित्रपट आहे, जो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सादर झाला आहे. पिंगुळीचे प्रसाद खानोलकर यांच्या ‘साकव’ या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. तेच या चित्रपटाचे पटकथा आणि संवाद लेखकही आहेत. यात श्रद्धा खानोलकर (पिंगुळी), दीपक जोईल (खुडी-देवगड), विवेक वाळके, गौरव राऊळ, प्रमोद कोयंडे, आकांक्षा खोत व अन्य अनेक स्थानिक कलाकार आहेत. या चित्रपटाला संगीत-प्रद्युम्न चावरे, प्रणव जांतीकर, छायाचित्रण-समीर भास्कर, संकलन-स्मिता फडके, तर ध्वनी धनंजय साठे यांचे आहे.
पुणे येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केवळ सातच मराठी चित्रपट निवडले जातात. त्यामध्ये उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट कला दिग्दर्शक अशी दोन पारितोषिके या चित्रपटाला मिळाली. महाराष्ट्र शासनाने फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स फिल्म मार्केटसाठी मराठी तीन चित्रपटामध्ये ‘भेरा’ चित्रपटाची निवड केली होती. जर्मनीमध्ये होणाऱ्या स्टुटगार्ड एशियन फिल्म फेस्टिवलमध्येसुद्धा हा चित्रपट दाखविण्यात आला. चंद्रपूर फिल्म फेस्टिवलमध्ये ‘भेरा’चा सहमाग होता. 21 व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये श्रद्धा खानोलकर यांना अनीबाईच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता मेरा या चित्रपटाला मिळालेले पुरस्कार सिंधुदुर्गसाठी गौरवशाली आहेत.