आजच्या मार्केटिंगच्या युगात प्रत्येक सण-उत्सवाचं स्वरूप बदलत चाललं आहे. नावीन्याच्या नावे पैशांची उधळपट्टी, भपक्याचे देखावे आणि पर्यटनाशी जोडून निर्माण झालेलं ‘फेस्टिवल‘ सदृश्य वातावरण आता सर्वसामान्य झालं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचं बीज लोकमान्य टिळकांनी रुजवलं तेव्हा त्यामागे स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा होती, सामाजिक प्रबोधनाची दृष्टी होती, व्याख्यानमाला, लोककला-संवर्धन आणि तरुणांच्या नेतृत्वगुणांचा विकास करण्याचा उद्देश होता. पण आज त्या सगळ्याला भव्यतेच्या आड लपवून टाकलं आहे.
वृत्तपत्रांमधून आणि माध्यमांमधून आदर्श गणेशोत्सव कसा असावा याविषयी सातत्याने आवाहन होतं; पण प्रत्यक्षात डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज, लेझर शो, प्रचंड रोषणाई, वाहतुकीची कोंडी आणि रात्रभर चालणारा गोंधळ यातूनच गणरायाचं आगमन होतं. या सर्वाचा आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर आणि जगण्यावर विपरीत परिणाम होत असतानाही विरोधाचा आवाज उठवला तर तो लगेच ‘धर्मविरोधी’ म्हणून गप्प बसवला जातो. हेतू कितीही प्रामाणिक असला तरी त्याला राजकारणाचा रंग दिला जातो.
भ्रष्ट पैशांच्या आधारे उभे राहणारे भव्य मंडप, दहाच्या दहा मजल्याएवढ्या उंच मूत, दहीहंडीच्या कोट्यावधींच्या बक्षिसांच्या स्पर्धा, नवरात्रोत्सवाचा व्यापारी झगमगाट या सर्व देवाच्या नावाखालील दिखाव्याचं रूपांतर झालं आहे. श्रीकृष्णाने शिकवलेली साधेपणाची, भक्तीची गाथा आपण विसरलो आहोत.
हे गणराया, तुमचं पूजन प्राचीन काळापासून चालत आलं आहे. तुम्ही असुरांचा पराभव करून देवांनाही भयातून मुक्त केलं, पण आजचे ‘असुर’ वेगळ्या रूपात समाजातच वावरत आहेत. लोभ, भ्रष्टाचार, अतिरेकाचा देखावा, राजकीय स्वार्थ आणि पर्यावरणाचा विध्वंस हेच आजचे दैत्य आहेत. सभ्यपणाचा बुरखा घालून ते समाजाच्या अंगणात पसरलेले आहेत आणि त्यांना पाठीशी घालणारेही सत्ताधारी वा तथाकथित पुरोगामीच असतात. अशा या आधुनिक आसुरी शक्तींचा विनाश व्हावा हीच सर्वसामान्यांची तुमच्यापाशी आर्त प्रार्थना आहे.
कोकणात मात्र अजूनही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा जपली जाते. मातीच्या मूत, माटवीतली हिरवीगार सजावट, घराघरातले भजने- फुगड्या – आरत्या आणि एकत्रित कुटुंबांचा आनंद यातून खऱ्या भक्तिभावाचा अनुभव मिळतो. मुंबई-पुण्यासारख्या धकाधकीच्या शहरांतून चाकरमानी प्रवासाचा त्रास सोसून गावाकडे परततात, फक्त गणरायाच्या चरणी दोन दिवस भक्तिभावाने उपस्थित राहण्यासाठी. कोकणातल्या मूर्तिकारांनी पिढ्यानपिढ्या जपलेली परंपरा आजही मातीशी, निसर्गाशी नातं जपते. हीच खरी शिदोरी आहे जी पुढच्या पिढ्यांना द्यावी.
परंतु दुसरीकडे निसर्गाकडे दुर्लक्ष करून मानव हव्यासाच्या मागे धावताना त्याचा रुद्रावतार अनुभवतो आहे. महापुर, भूस्खलन, उष्णतेची लाट, वादळंही सगळी निसर्गाची चेतावणी आहेत. तरीही मानव झोपेचे सोंग घेतो आहे. म्हणूनच हे गणराया, समाजाला विवेक दे, सद्बुद्धी दे, भव्यतेपेक्षा भक्तीचं खरं महत्त्व उमजूदे आणि सण म्हणजे साधेपणाचं, एकोप्याचं, निसर्गाशी सुसंवाद साधण्याचं पर्व आहे हे प्रत्येकाला जाणवू दे.