ऑगस्ट महिन्यात एकाच आठवड्यात चार अति जोखीम असलेल्या बाळांचे प्राण वाचवण्यात वालावलकर रूग्णालयाच्या बालरोग विभागाला यश आले. याचे मुख्य कारण म्हणजे निपुण डॉक्टर तर आहेतच पण सुसज्ज असा १० बेडचा आयसीयू वॉर्ड. ज्यामध्ये वॉर्मर, ऑक्सिजन, बाळाला पेटीमध्ये ठेवण्याची व्यवस्था, व्हेंटिलेटर, एक्स-रे मशीन, रक्तपेढी आदी सुविधा आहेत. या सर्व सुविधा महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत आहेत. त्यामुळेच वालावलकर रूग्णालय गरीब रुग्णांसाठी नवसंजीवनी बनले आहे.
ती नवजात बालके दापोली तालुक्यातील नेवसे गावातील होती. या चार बाळांपैकी दोन बाळ ही जुळी होती. त्यांना श्वासोच्छसाचा त्रास होता. त्या बाळांना व्हेंटिलेटर लागत होते. तब्बल एक महिना आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर ते बरे झाले. तिसरे बाळ हे वेळेच्या आधीच जन्मल्यामुळे १.१०० ग्रॅम वजनाचे होते. हे बाळ दापोली तालुक्यातील टेटवली येथील होते. ते देखील अतिशय कमी वजनाचे होते. या बाळाला कृत्रिम श्वास द्यावा द्यावा लागत होता व पेटीत ठेवले होते. हे बाळ पंधरा दिवसांनी बरे झाले. चौथ्या बाळाला श्वासाचा त्रास होता. परंतु ते पूर्ण आठवडे झाल्यानंतर जन्मले असूनही दुसया हॉस्पिटल मधून डेरवण रूग्णालयात पाठवण्यात आले. त्यावेळी बाळाला जास्त प्रमाणात आकडी येत होती. तसेच श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. त्यांचे जन्मावेळी वजन २.५६८ इतके होते. त्यामुळे व्हेंटिलेटर लागत होते. या चारही बाळांवर औषधोपचार करुन सुखरूप घरी पाठवण्यात आले.
या बाळांचे उपचार बालरोग तज्ज्ञ डॉ.अनिल कुरणे, डॉ. पार्वती हळबे व डॉ.अंकिता सुर्वे तसेच बालरोग विभागातील सहकारी डॉक्टर्स सलोनी, पंक्ती यांनी केले. तसेच या बाळांची शुश्रुषा करणाया एनआयसीयूच्या नर्सेस वृषाली, संपदा, सोनाली, प्राची, प्रज्ञा, श्रृतिका, शितल, जान्हवी, आकांक्षा, साक्षी, निलम, ऐश्वर्या यांनीही योग्य ती काळजी घेतली. या बाळांच्या पालकांनी आपल्या बाळांना घरी नेताना वालावलकर रूग्णालयाच्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले.