कासव संवर्धनाला निसर्ग पर्यटनाची जोड
ऑलिव्ह रिडले कासवांची दुर्मिळ प्रजाती देशात ओरिसा, गोवा आणि कोकणात आढळते. त्यांची पैदास डिसेंबर ते मार्च या कालावधीत होते.या निमित्ताने मऊशार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवांची पिल्ले समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेण्यासाठी सुरू असलेली त्यांची पळापळ …..
कासवांच्या लिलांचे दर्शन याची देही, याची डोळा घेण्याची संधी निसर्गप्रेमी पर्यटकांना उपलब्ध होत असते.कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावात गेली काही वर्षे ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचे काम सुहास तोरसकर आणि निसर्गमित्र ग्रामस्थ हे करत आहेत. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात ही कासवे किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. या अंड्यांपासून बनवलेल्या पदार्थांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये खूप मागणी असते.त्यामुळे अंडी चोरीला जाऊ नयेत तसेच कुत्रे किंवा अन्य प्राण्यांपासून त्यांचे भक्षण होऊ नये म्हणून सुहास तोरसकर त्यांचे सहकारी वायंगणी ग्रामस्थ विशेष काळजी घेतात. कासवांची अंडी ज्या ठिकाणी घातली आहेत तिथे जाळी बसवली जातात. 55 ते 60 दिवसांनंतर वाळूतून पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली समुद्रात सोडले जाते.
किरात ट्रस्ट, वायंगणी ग्रामस्थ यांचे नियोजन आणि लुपिन फाऊंडेशनच्या सहकार्याने दरवर्षी या गावात कासव जत्रा हा निसर्ग उपक्रम राबविला 2012 ते 2018 पर्यंत राबविला गेला.कासवांच्या पिल्लांचा जन्मसोहळा पाहण्याबरोबरच मांडवी किनाऱ्यावरची डॉल्फिन सफर ,खाडीतील मासेमारीचा अनुभव ,वायंगणी जंगल ट्रेल, कासव संवर्धनाचे स्लाईड व फिल्म शो ,पक्षी-प्राणी तज्ञांशी गप्पा ,खाडीतील सफर, दशावतार ,अस्सल मालवणी पदार्थांची मेजवानी ,सांस्कृतिक कार्यक्रम या कासव जत्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात येतात.कासव जत्रा हा उपक्रम किरात ट्रस्ट ,वायंगणी ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने लुपिन फाउंडेशन च्या सहकार्याने गेली पाच वर्ष सातत्याने सुरू आहे. सन 2019 मध्ये शासनाने हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्यात येण्यासाठी ग्रामपंचायतीचला पर्यटन महोत्सव राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. सन 2019 मध्ये पर्यटन महोत्सव-कासव जत्रा हा उपक्रम वायंगणी किनाऱ्यावर राबवण्यात आला होता.
संवर्धन कासवांचे
कासवाची पाठ जेवढी कठीण असते तितकेच ते दीर्घायुषी असते .कासव शंभर वर्षांपर्यंत जगू शकते.परंतु बहुतेक कासवे आपल्या आयुष्याच्या सीमेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच माणसा द्वारे किंवा इतर शत्रूमार्फत विनाकारण मारली जातात.
जन्म पूर्वीपासूनच सुरू होतो संघर्ष जगण्याचा
मादी कासव समुद्रकिनारी एकांत ठिकाणी वाळूमध्ये खड्डा खोदून अंडी घालत. एका वेळी कमीत कमी 70 ते जास्तीत जास्त 100 पर्यंत अंडी घालते. अंडी घालताना मादी सतत अश्रू ढाळीत असते ,अर्थात वेदना होतात म्हणून नाही तर अनावश्यक मीठ बाहेर टाकण्यासाठी.त्यानंतर पुन्हा ती खड्डा वाळूने भरते.अंड्यांना उष्णता मिळण्यासाठी .अंडी घातल्यानंतर मादी कासव पुन्हा समुद्रात जाते. आपली अंडी आणि त्यातून निघणारी पिल्ले यांना पुन्हा कधीच पाहत नाही. नैसर्गिकपणे कासवांच्या जगण्याचा दर पन्नास टक्के एवढाच असतो. पण माणसांची वाढलेली हाव , जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी, जगभरात कासवाचे मांस आणि अंडी यांना वाढती मागणी यामुळे वाळूतील अंडी पळविण्याचे प्रकार वाढले. मांसाशिवाय कवचासाठी सुद्धा कासवांची शिकार केली जाते. यांचाही धोका असतोच .परंतु लालची प्रवृत्तीच्या माणसांमुळे कासवांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.
वायंगणी किनारा बनतो आहे भारतातील कासवांचे आणखी एक मॅटर्निटी होम
भारतात ओरिसाच्या समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव लाखोंच्या संख्येने अंडी घालण्यासाठी येतात.फार मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या कासवांच्या संख्येने या घटनेला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.हा किनारा खास कासवांसाठी सुरक्षित झाला आहे. अशाच प्रकारचे प्रयत्न सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनार्यावर सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.गेल्या काही वर्षात ऑलिव्ह रिडले जातीची कासवे दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात.सततच्या या प्रयत्नामुळे कासवांचा नैसर्गिक जन्मदर जो जेमतेम चाळीस ते पन्नास टक्के होता तो आता सुमारे 70 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्या प्रमाणे देवगड येथील प्राणी मित्र प्राध्यापक दप्तरदार यांचेही या कामात मार्गदर्शन मिळते .
कासवांच्या प्रमुख जाती ग्रीन टर्टल या प्रकारांपैकी जातींच्या दुर्मिळ कासवे अंडी घालायला येतात असे निरीक्षण आहे.
निसर्ग उपक्रमाला प्रतिसाद
कासव जत्रा या निसर्ग उपक्रमात मुंबई-पुणे,नाशिक महाराष्ट्र तसेच भारतभरातून असंख्य निसर्गप्रेमी पर्यटकांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. वायंगणी गावात पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था इथल्या स्थानिक घरांमध्येच केली जाते. नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान कासवांच्या पिल्लांचाजन्म सोहळा आपणाला देखील पाहण्याची इच्छा असेल तर आगाऊ संपर्क करून आपणही आपली सहल आयोजित करू शकता.