मी आणि कोरोना – एक अनुभव

  लॉकडाऊन घोषीत होण्यापूर्वीच दोन्ही मुलांचा शाळेच्या परीक्षा रद्द झाल्या. सासुबाई काही दिवसांपूर्वी नागपुरला गेल्यामुळे घरकामाला येणा-या मावशीच्या ताब्यात मुलांची रवानगी झाली. लॉकडाऊन घोषीत होताच आम्ही खाजगी डॉक्टरांनी अत्यावश्यक आजार वगळता  बंदचा निर्णय घेतला. त्यातल्या त्यात मी पंचकर्म तज्ज्ञ म्हणजे माझे पेशंट सगळे करंट क्युरेटीव्ह  ट्रिटमेंट घेणारे. गंभीर असे नाहीच.. मग काय… मुलांना आणि मलाही ‘‘दिल ठुंडता है फिर वही फुरसत के..‘‘ असं वाटलं. दोन-तिन दिवस बरे गेले नि मी कमालीची अस्वस्थ व्हायला लागली. कारण पतिदेव राजकोटला नोकरीमुळे अडकुन पडले आहेत. तिथे २००० स्टाफसाठी एकत्र जेवण तयार व्हायचं.. शिवाय पाचव्या दिवसानंतर त्यांना डिमार्ट मधील भाजीपाला मिळणे बंद झाला होता. त्यामुळे सकाळचा चहा-न्याहारी कंपनीकडून बंद करण्यात आले. सकाळच्या जेवणात जिरेमोहरीच्या फोडणीची डाळ व भात. रात्री चपाती भाजी मिळत होती. कसेबसे २१ दिवस काढा नी घरी परता. असा मी हेका सुरु केला.

       २१ तारखेच्या ओपीडीला  मुंबई पुण्याहुन आलेल्या दोन रुग्णांना मी तपासले होते. २८ तारीखला त्यांचा फोन आला की, कोरडा खोकला छातीतील कफ कमी होत नाही. तापही वाटतोय. माझ्या पायाखालची वाळु सरकली. मी त्यांना लगेच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवले व तेथूनच चार दिवसांनी मला कधी नव्हे ते ताप चढला.. सर्दिपेक्षा घश्यात खवखव खुप होती.. माझ्या दोन्ही पेशंटचे कोव्हीडचे रिपोर्ट्स यायला तिनचार दिवस वेळ होता. कारण रिपोर्ट्स मिरजेहुन येतात. सिंधुदुर्गातील पहील्या २७ संशयीतापैकी २ माझे रुग्ण होते. घरात मी व दोन मुले. मोठा तिसरीत, धाकटा केजीला. मी स्वतःचे उपचार सुरु केले. मुलांना अंगावेगळी ठेवायला लागली. घरातही मुलांसहीत मास्क व ग्लोज वापरले. दरम्यान वरीष्ठ डॉक्टरांनी परिस्थीतीची कल्पना दिली. जर त्या रुग्णांचे रिपोर्ट्स पॉझीटीव्ह आले तर बॅग भरून सरळ मुलांसहीत जिल्हा रुग्णालयात मुक्कामी जायची मानसिकता तयार ठेवली. संकटावर मात करता येते पण संकटाची अनिश्चितता प्रचंड तणाव देते. मला माझ्यापेक्षा मुलांची काळजी पोखरत होती. पतीदेव तिकडे चिंतेत होते. माझा तापसर्दी पाचव्या दिवशी ओसरला आणि दैवकृपेने दोन्ही रुग्ण कोव्हीडचे निगेटिव्ह निघाले.

       ‘‘आपुले मरण पाहीले म्या डोळा‘‘ असा हा सात रात्रींचा अनुभव गाठीशी पडला. मी सावरले पण यापुढे सतर्कता बाळगायला हवी हे समजले. या दिवसांत मी मुलांना गरज पडल्यास आपल्याला काय काय करावे लागेल ह्याची जाणीव करुन देत होते. कोणतीही नकारात्मक उर्जा मुलांना माझ्याकडुन प्रवाही होणार नाही ह्याची काटेकोर अंमलबजावणी केली. ‘‘जरतर‘‘ ही संभ्रमित अवस्थेचे द्योतक, शब्द, अंधार व काश यांत एक पुसट रेष आखुण ठेवतो. आपण इथेच तोल ढळु द्यायचा नसतो. मला काहीही झाले तरी मुलांच्या बिकट जबाबदारीची जाणीव मला खंबीर गंभीर व सावध करुन गेली.

         पहिल्या लॉकडाऊननंतर खासगी वैद्यकीय सेवा सुरु करण्याचे आदेश निघाले. मी नियमीतपणे न जाता पुर्व नोंदणीनुसार ओपीडीला जायचे ठरवले. जाताना दोन्ही मुले हात जोडुन गहीवरुन बोललीत, ‘आई, नको जाऊ ना गं.. बघं ना बाबापण नाही आमच्याजवळ आत्ता. तु आजारी पडली तर आम्ही काय करु?‘ मी हसून त्यांना पोटाशी धरलं आणी सांगीतलं, ‘यावेळी कोरोना काय देवसुद्धा माझं काहीही बिघडवू शकत नाही कारण मला तुमची आणि माझ्या पेशंटचीही रक्षा करायची जबाबदारी देवानेच दिली आहे. राजा स्वतःच्या सैनिकाला मारत नाही तसेच देवच माझे रक्षणही करेल. चला रात्री छान मसालेभात बनवुया.प्रॉमिस क्लॅप देवुन मी घरात दोघांनाच ठेवून निघाले. पाय-या उतरताना मनात म्हटले, ‘‘देवा माझा विश्वास अखंड ठेव‘‘

आजपावेतो रुग्णसेवा सुरु आहे. मुले आंघोळीला पाणी तापवून ठेवतात. मी व मुलेही गंभीरपणे शासकीय नियमांचे सकारात्मकतेने पालन करतो. माझा मोठा भाऊही गुडगावला रुग्णसेवा बजावत आहे. माझी वहिनी पाच महिन्याची गरोदर असून पदरात दोन वर्षाचा मुलगा आहे. भाऊ सात दिवसांच्या वॉर्ड ड्युटीनंतर १४ दिवस कोरोंटाईन म्हणजे २१ दिवस घराबाहेर असतो. तिथे त्यांच्या घरमालकांनी त्यांच्याशी सर्व संफ तोडला आहे. नजरेवर नजर पडली तर बघणेही टाळतात. आम्ही दोघेही बहीण-भाऊ ६८ वर्षीय आईला आमच्या समस्या सांगतो पण अत्यंत सुलभ सकारात्मकतेने. जेणे करुन ती आश्वस्त राहील पण ती शेवटी आईच.

        तिच्यापासून काही लपविणे म्हणजे आरश्याला खोटं पाडणे. असो.. माझ्या दैवकृपेने सिंधुदुर्गाच्या उत्तम शिस्तप्रिय प्रशासकीय यंत्रणेला सलाम ठोकून, कोकणवासीयांच्या स्वयंशिस्त स्वभावाचा आदर्श ठेवावा असा आहे. या काळात मला संकटाला त्रयस्थपणे बघण्यात यश आले व हा धडा मुलांनी जाणतेपणाने गिरवला. ही या लॉकडाऊनची कमाई आहे. बाकी स्वयंपाक घरातील चंगळ वगैरे विषय चघळायला क्षुल्लक वाटतात..काही लोक नियमांचे पालन करीत नाही त्यांचा रागही येतो.. शेवटी आम्ही क्षुद्र पामर.

     माझे बाबा म्हणायचे ‘‘संकटच संकटा -तून बाहेर पडायचा मार्ग सुजवत असतो फक्त आधी आपण संकटाच्या भितीपासुन मनाला बाहेर काढले पाहिजे..‘‘

-डॉ. सुवर्णा सोनारे-चरपे.७०३८३८१५५३

आरवली वैद्यकीय व संशोधन केंद्र

Leave a Reply

Close Menu