किरात साप्ताहिकाची वाटचाल

एकेकाळी भरभराटीचे बंदर असलेल्या पश्चिम किना-यावरील वेंगुर्ले या शहरातून ‘किरात‘ हे साप्ताहिक वृत्तपत्र सन १९२२-२३ यावर्षीपासून सुरु झाले. अनंत वासुदेव मराठे हे या वृत्तपत्राचे संस्थापक आणि पहिले संपादक होते.

वेंगुर्ले शहर ऐतिहासिक काळापासून व्यापारी उतार पेठ म्हणून प्रसिद्ध होते. त्याच्यावर इंग्रजांचा अंमल होता. स्वाभाविकच इंग्रज राज्यकर्त्यांना आवश्यक असणा-या सुधारणा या वेंगुर्ले शहरात झालेल्या होत्या. शिक्षणाचा प्रसार ब­-यापैकी होता. अनेक व्यापारी पेढ्या या शहरात होत्या. देशातल्या कोचिन-मुंबई-कराची या प्रमुख बंदराकडे तसेच परदेशातही वेंगुर्ले बंदरातून व्यापारी मालाची वाहतुक होत असे. विशेषतः या गावातील लोकांचा मुंबईशी निकटचा संबंध होता. त्याकाळी वेंगुर्ले तालुक्यात प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा खेड्यापर्यंत होत्या. परंतू माध्यमिक शिक्षणाची सोय वेंगुर्ले-कॅम्पमध्ये असलेल्या ‘ए.पी.मिशन स्कूल‘ (आताचे वेंगुर्ला हायस्कूल) या अमेरिकन मिशनरी संस्थेने सुरु केलेल्या शाळेमधेच होती. त्यावेळी स्वातंत्र्याची चळवळ जोमाने सुरु होती. वेंगुर्ले हे दक्षिण कोकणातील स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र होते. अशा त्या काळात ब्रिटिश धार्जिण्या असलेल्या ‘ए.पी.मिशन‘ स्कूलच्या बरोबरीने स्वदेशी संस्थेचे हायस्कूल सुरु करावे असा विचार अनेक लोकांच्या मनात बळावत होता. श्री. अनंत वासुदेव मराठे हे त्यापैकीच एक. त्यांनी काही समकालीन समविचारी सहका-­यांना बरोबर घेऊन जॉर्ज इंग्लिश स्कूल (आताचे पाटकर हायस्कूल) या माध्यमिक शाळेची स्थापना केली. श्री.अ.वा. मराठे यांचे त्यावेळी मॅट्रीकपर्यंत शिक्षण झालेले होते. त्यांनी स्वतः या शाळेमध्ये शिक्षक म्हणून विनामूल्य काम केले.

 

 

श्री.अ.वा.मराठे हे व्यासंगी लेखक होते. ‘इंग्रजांचे स्वरा

 

ज्य‘ हा त्यांचा ग्रंथ तत्कालीन ऐतिहासिक पाठ्यपुस्तकात समाविष्ट झालेला होता. शिवाय मराठी क्रमिक पुस्तकाच्या संपादक मंडळावरही ते होते. मुंबईच्या प्रसिद्ध ‘ढवळे प्रकाशन‘ या संस्थेकडे त्यांनी अनेक ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथाचे संपादन केले होते. त्यामुळे मुंबईशी त्यांचा निकटचा संबंध होता.

वेंगुर्ले येथे माध्यमिक शाळा सुरु करतांना मुलांना व्यावसायिक शिक्षण द्यावे असा विचार त्यांनी मांडला. त्याकाळी वेंगुर्ल्यात छापखान्याची सोय नव्हती. लहान मोठ्या छपाईच्या कामासाठी १७ मैलांवर असलेल्या सावंतवाडी संस्थानच्या छापखान्यात जावे लागे. वेंगुर्ल्यातील नवीन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायीक शिक्षण देण्यासाठी छापखाना सुरु केला तर वेंगुर्ल्याची छापखान्याची गैरसोयही दूर होणार होती.

श्री.अ.वा.मराठे यांनी मुंबईतील ओळखीतून स्वतःच्या जबाबदारीवर एक छोटासा परिपूर्ण छापखाना विकत आणला. त्यासाठी स्वतःच्या जमिनीही गहाण ठेवून पैसा उभारला. परंतू पुढे शिक्षणाविषयी व्यापक दृष्टिकोन नसलेल्या अन्य काही सहका-यांशी त्यांचे मतभेद झाले आणि मराठे यांना संस्थेतून बाहेर पडावे लागले. मुंबईहून आणलेला छापखाना स्वतःच्या घरी आणून ठेवावा लागला. पुढे काय? हा प्रश्न होताच. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीत जनजागृती करणे हे मोठे काम होते. ‘केसरी‘, ‘ज्ञानप्रकाश‘ सारखी वर्तमानत्रे वेंगुर्ल्यात टपालाने येत असत. त्यातूनच स्वातंत्र्य चळवळीला पोषक आणि लोक प्रबोधन करणारे असे वृत्तपत्र आपणही सुरु करण्याचे श्री.अ.वा.मराठे यांनी ठरविले आणि १९२२ साली त्यांनी ‘किरात‘ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले. स्वतःचा छापखाना हाताशी असल्याने छपाईचा प्रश्न नव्हता.

अनिष्ट गोष्टींवर अचूक शरसंधान असे उद्दिष्ट ठरवून साप्ताहिक ‘किरात‘ची वाटचाल सुरु झाली. स्थानिक बातम्यांना प्राधान्य, स्थानिक विषयांवर लेख याबरोबरच संपूर्ण कोकणपट्टी नजरेसमोर ठेवून कोकणाच्या समस्या आणि प्रसंगोपात राष्ट्रीय विषयावर लेखही ‘किरात‘मधून त्याकाळी प्रसिद्ध असत. स्वतः श्री. अ. वा. मराठे उत्कृष्ट लेखक, संपादक होतेच. त्याबरोबरच त्यांनी अनेक समकालीन लोकांना विविध विषयांवर लिहिण्यास प्रवृत्त करुन नवे लेखक घडविण्याचे काम केले.

श्री.अ.वा.मराठे यांची हीच परंपरा त्यांचे सुपूत्र श्री. केशव अनंत मराठे उर्फ बाबा मराठे यांनी समर्थपणे चालविली. श्री.अ.वा.मराठे यांच्या संपादन कार्यकाळात ते जेव्हा मुंबई येथे जात असत त्यावेळी संपादक म्हणून श्री.द.गो.काळे, ना.वि.जोग अशा शिक्षकांनीही काही काळ ‘किरात‘च्या संपादनाची धुरा सांभाळली होती. त्याकाळी ‘किरात‘चा अंक नियमित आठ पृष्ठांचा आणि बातम्या, विविध विषयांवरील मजकुरांनी भरगच्च असायचा.

श्री.अ.वा.मराठे यांचे मे १९७३ मध्ये निधन झाले. तोपर्यंत त्यांचे संपादक म्हणून नाव असले तरी ‘किरात‘च्या प्रत्यक्ष संपादनाचे काम कार्यकारी संपादक असलेले बाबा मराठे हेच करीत असत. लहान वयातच त्यांच्यावर छापखान्याची आणि ‘किरात‘ वृत्तपत्राची जबाबदारी आलेली होती. त्यामुळे ते स्वतःचे माध्यमिक शिक्षणही पूर्ण करु शकले नव्हते. परंतू उपजत बुद्धिमत्ता, माणसे जोडण्याची वृत्ती याच्या जोरावर साप्ताहिक ‘किरात‘ची संपादनाची धुरा त्यांनी सुमारे ३५ वर्षे समर्थपणे सांभाळली. त्यांनीही ब-याच लोकांना लिहिते केले. अनेक प्रसंगानिमित्ताने ‘किरात‘चे खास विशेषांक काढले. वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी त्याकाळी ‘किरात‘मध्ये विविध विषयांवर लेख लिहून लोकप्रबोधन केले आहे.

कोकण रेल्वेचे उद्गाते म्हणून ज्यांचा आज उल्लेख केला जातो ते अ.ब.वालावलकर हे त्यापैकीच एक. श्री. वालावलकर हे जॉर्ज इंग्लीश स्कूल मध्ये श्री.अ.वा.मराठे यांचे विद्यार्थी होते. त्यांच्याच प्रेरणेने ते पुढे लेखन करु लागले. पुढे रेल्वेखात्यात नोकरीला लागल्यानंतर त्यांनी किरातमध्ये अनेकदा लेखन केले आहे. कोकण रेल्वेचा आराखडा आणि कोकण रेल्वेची आवश्यकता याविषयी श्री.अ.ब.वालावलकर यांचे अभ्यासपूर्ण लेख सर्वप्रथम ‘किरात‘मधून प्रसिद्ध झाले होते.

राशी भविष्य लेखनाने ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ‘धनुर्धारी‘ हे मासिक लोकप्रिय केले आणि वृत्तपत्रांतून राशीभविष्य देण्याची प्रथा सुरु केली ते मालवणचे होरारत्न ज्योतिषी वसंत लाडोबा म्हापणकर यांचे पहिले राशीभविष्य ‘किरात‘मधून प्रसिद्ध झालेले होते.

त्यावेळी रत्नागिरी जिल्हा हा मंडणगड ते दोडामार्ग असा लांबलचक पसरलेला होता. प्रशासनाच्या आणि जनतेच्या दृष्टीनेही तो गैरसोयीचा होता. या जिल्ह्याची फाळणी करुन दोन जिल्हे करावेत आणि दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे नाव ‘सिधुदुर्ग‘ असे ठेवावे. अशा स्वरुपाचा लेख सर्वप्रथम ‘किरात‘मधून प्रसिद्ध झाला होता. जिल्ह्याचे मुख्यालय ‘वेंगुर्ले‘ येथे ठेवावे अशीही सूचना त्या लेखात करण्यात आलेली होती. त्यावेळी श्री. बाबा मराठे यांचे समकालीन श्री. विष्णूपंत नाईक, सुरेश शर्मा अशा कितीतरी लोकांनी लेखन केलेले आहे.

अशक्यप्राय वाटणारी कोकण रेल्वे सुरु झाली आणि तीस वर्षापूर्वी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला आहे. पश्चिम किनारी सागरी महामार्गाचा आराखडा आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आणि कोकण विकासाच्या दृष्टीने त्याचे महत्व सांगणारा लेख ४० वर्षापूर्वी ‘किरात‘ ने सर्वप्रथम प्रसिद्ध केला आहे. आज तो मार्ग बहुतांशी पूर्ण झाला आहे. असे कितीतरी विषय त्या काळापासून ‘किरात‘ने हाताळलेले आहेत. त्याद्वारे जनजागृती व लोकप्रबोधन केले आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या आधीन न रहाता ‘किरात‘ने निःपक्षपातीपणे पत्रकारिता केली. जनतेच्या प्रश्नांना वृत्तपत्राद्वारे व्यासपीठ मिळवून दिले. अनेक होतकरु लेखकांना उत्तेजन दिले. अनेक संस्थांच्या उत्सवानिमित्त त्या संस्थांची समग्र माहिती देणारे विशेषांक प्रसिद्ध करुन त्या संस्थेच्या कार्याला चालना दिली. हे सगळे करतांना ‘किरात‘च्या संचालकांनी कधीही अर्थप्राप्तीची अपेक्षा ठेवली नाही. वर्गणीदारांकडून येणारी वर्गणी आणि जाहिरातींमधून मिळणारा मोबदला हेच ‘किरात‘चे उत्पन्नाचे मुख्य स्रोत होते आणि लोकाश्रय हा मोठा आधार होता. त्याकाळी अन्यत्र प्रसिद्ध होत असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांच्या तुलनेत ‘किरात‘ला वाचकांचा मोठा प्रतिसाद होता. त्यामुळे वर्गणी नियमित येत असे आणि जाहिरातदारांचाही चांगला प्रतिसाद मिळत असे. त्यामुळे ‘किरात‘ची वाटचाल अव्याहतपणे सुरु राहिली, ‘किरात‘ हे वेंगुर्ल्याचेच नव्हे तर कोकणचे मुखपत्र बनले. सरकारी स्तरावरही ‘किरात‘मधील लेखनाची नोंद घेतली जात असे.

त्याकाळी आजच्यासारख्या दैनिक वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्यां नव्हता. त्यामुळे ‘किरात‘ सारख्या तालुक्याच्या गावातून निघणा-या वृत्तपत्रांचे महत्व मोठे होते. त्यांना वाचक वर्गही चांगला होता. विविध प्रकारच्या लेखनावर वाचक आपली प्रतिक्रिया देत असत व त्याची दखल सरकार दरबारी घेतली जात असे.  लोकांचे प्रश्नही मार्गी लागत असत. त्याकाळी अद्ययावत मुद्रणाच्या सोयी नसूनही श्री. बाबा मराठे यांनी हाती असलेल्या लेटरप्रेस छापखान्याच्या माध्यमातून ‘किरात‘चा अंक सर्वांगसुंदर व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्या काळातील अनेक विशेषांकांतून दिसून येते. म्हणूनच त्यांचे नाव ‘किरात‘चे संवर्धक म्हणून आवर्जून नोंदले गेलेले आहे.

त्याकाळी ‘किरात‘ ही एक कार्यशाळाच होती. ब­याच लोकांनी साप्ताहिक ‘किरात‘मध्ये आणि ‘किरात‘ मुद्रणालयात प्रथम उमेदवारी करुन पुढे मुंबई, पुणे यासारख्या शहरात या क्षेत्रातील नोकर्‍या मिळविल्या. टेक्स बुक ब्युरोचे संचालक झालेले कै. बाबा मराठे यांचे समकालीन सहाध्यायी कै. बापूराव नाईक हे त्यापैकीच एक.

बाबा मराठे यांचे १९८० साली निधन झाले. त्यानंतर ‘किरात‘ मुद्रणालय आणि वृत्तपत्राची जबाबदारी श्री. श्रीधर केशव मराठे यांच्यावर आली. त्यांनी ती नुसती सांभाळलीच नाही तर वृद्धिगत केली. १९८० सालातच ‘किरात‘चा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. तत्पूर्वी ललित साहित्य देणारा ‘किरात‘चा दिवाळी अंक प्रसिद्ध झालेला नव्हता. दिवाळी विशेषांकाच्या उपक्रमाबरोबरच जानेवारी महिना हा वर्षारंभ धरुन ‘किरात‘चा खास वर्षारंभ विशेषांकही प्रसिद्ध करण्याची नवीन प्रथा संपादक श्रीधर मराठे यांनी १९८१ पासून सुरु केली. दिवाळी अंकाद्वारे कोकणातील अनेक नवोदित लेखक कविना ‘किरात‘ने पुढे आणले. आज ते प्रतिथयश लेखक, कवी आहेत आणि त्यांनीही आपल्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांतून ‘किरात‘चा आवर्जून उल्लेख केलेला आहे.

वर्षारंभ अंकाद्वारे ‘किरात‘ने विविध सामाजिक विषयांवरती शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या अशा स्वरुपाच्या निबंध स्पर्धा आयोजित केल्या. वर्षारंभे वर्धापन दिनी अनेक नामवंत वक्त्यांची भाषणे आयोजित करुन लोक प्रबोधन केले. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. त्यामध्ये खास उल्लेख करावा लागेल तो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आझादी बचावो आंदोलनाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव दीक्षित, खासदार एकनाथ ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत अनंत दीक्षित, ज्येष्ठ लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, गीतकार गंगाधर महांबरे, सिधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखक हरिहर आठलेकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, हास्यकवी अशोक नायगावकर, ज्योतिषी कै. मायाताई आंबर्डेकर यांच्या सहयोगाने गीतकार अशोक पत्की यांचा संगीत कार्यक्रम आदींचा.

‘किरात‘चा ७५ वा आणि दहा वर्षांनी ८५ वा वर्धापनदिन मुंबईतील वाचक हितचितकांच्या सहकार्याने मुंबईत भव्य प्रमाणात साजरा झाला. या वर्धापनदिन कार्यक्रमाचा उद्देश वाचकांचा ‘किरात‘प्रती असलेला स्नेहबंध वाढविणे हा होता. त्यानिमित्ताने ‘किरात‘ प्रकाशनाने पर्यटन विशेषांक, ‘वेंगुर्ले काल, आज, उद्या‘ हा माहितीपर संग्राह्य ग्रंथ अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. मुंबईत अशा प्रकारचा वाचकांचा भव्य स्नेहमेळावा घेणारे ‘किरात‘ हे कोकणातील एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र असावे.

‘किरात‘च्या दिवाळी विशेषांकांना अनेक राज्यस्तरीय प्रदर्शनांतून उत्कृष्ट अंक म्हणून तसेच उत्तम संपादनाबद्दल पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर ‘किरात‘च्या संपादकांना, श्रीधर मराठे यांना अनेक राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रतिवर्षी उद्योजक डहाणूकर पुरस्कृत राज्यस्तरीय पत्रकारिता स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत १९८६ साली ‘किरात‘मधील ‘कोकण विकास आणि पुणे परिषद‘ या संपादकीय अग्रलेखाला काकासाहेब खाडीलकर स्मृति प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले होते. त्याचबरोबर वसई येथील कै. भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठानचा कोकण विभागीय २५ हजार रु.चा पुरस्कार, पु. भा. भावे स्मृति पुरस्कार, विश्वसंवाद केंद्र या संस्थेचा महर्षी नारद पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा कोकण वैभव पुरस्कार ‘किरात‘चे संपादक श्रीधर मराठे यांना मिळालेले आहेत. हे पुरस्कार म्हणजे ‘किरात‘च्या कार्याचीच पावती आहे.

एका महाविद्यालयीन प्राध्यापकांनी ग्रंथपाल पदवीसाठी ‘किरात‘च्या कार्याचा आढावा घेणारा प्रबंध सादर केला आहे. त्याचबरोबर पी.एच.डी.साठीही प्रबंधाचा विषय म्हणून साप्ताहिक ‘किरात‘ची निवड करुन किरातच्या समग्र वाटचालीचा आढावा घेणारे संशोधन कार्य एका प्राध्यापकानी सुरु केले आहे. तसेच २०२० मध्ये रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी किरातच्या जुन्या अंकांचा अभ्यास करून प्रबंध सादर करणार आहेत. यावरुन ‘किरात‘चे आजचे जनमानसातील स्थान अधोरेखित व्हावे.

गेल्या १२ वर्षात ‘किरात‘ने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन मोठी झेप घेतली आहे. नियमित आठ पृष्ठांचा, रंगीत छपाई व आकर्षक मांडणी असलेला अंक प्रसिद्ध होत आहे. सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर नवनवीन सदरे सुरु केलेली आहेत, त्यांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

www.kiratonline.in या नावाने वेबसाईट सुरु आहे. किरातच्या फेसबुक पेजवरुन प्रसिद्ध होणारे महत्वाचे लेख यामुळे जगभरातील कोकणातील वाचकांपर्यंत किरात पोहोचत आहे.

किरात ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून श्रीधर मराठे स्मृती जागर विचारांचा हा प्रबोधनात्मक उपक्रम गेली सात वर्षे सुरु आहे. यामध्ये नामवंत वक्त्यांचा परिसंवाद, चर्चा वाचकांना अनुभवायला मिळतात. यामध्ये २०२० पर्यंत लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर, ज्येष्ठ संपादक सुकृत खांडेकर, साने गुरुजी कथामालेचे मुकुंद तेलीचेरी, ख्यातनाम दिग्दर्शक व लेखिका प्रतिमा कुलकर्णी, वयम् मासिकाच्या संपादक शुभदा चौकर, सामाजिक कार्यकर्ते अरुण पांडे, पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ, मराठी चळवळीचे प्रणेते अनिल गोरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.रुपेश पाटकर, प्रयोगशील शिक्षक तथा भगिरथ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अनंत सामंत अशा मान्यवर वक्त्यांनी वेंगुर्ला नगरवाचनालय, पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला शाळा नं.२, भटवाडी शाळा नं.२, बॅ.खर्डेकर महाविद्यालय याठिकाणी सर्व वयोगटातील श्रोत्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमधून किरात प्रकाशनातर्फे विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील तरुण उपक्रमशील पत्रकारांना श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आत्तापर्यंत सिधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार तुळसुलकर, महेंद्र पराडकर, पराग गांवकर, महेंद्र मातोंडकर, निकेत पावसकर, सुमेधा देसाई, महादेव उर्फ काका भिसे हे पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.

वायंगणी, ता. वेंगुर्ला येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी पुरक ठरणारा कासव जत्रा हा उपक्रम वायंगणी ग्रामस्थ आणि संस्थांच्या माध्यमातून गेली पाच वर्षे यशस्वीपणे राबविला जात आहे. या उपक्रमाची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच दरवर्षी सामाजिक विषयांवर खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. किशोरवयीन मुला-मुलींकरीता व्यक्तीमत्व विकास घडविणा­-या, शारीरिक मानसिक बदल समजावून सांगणा­या प्रेरणा कार्यशाळा निवड शाळांमध्ये आयोजित केल्या जातात.

सामाजिक बदलांची नोंद घेऊन लोकांच्या अभिरुचीनुसार किरातने नवे बदल स्विकारले आणि अंमलातही आणले. ही सर्व वाटचाल वेंगुर्ले सारख्या छोट्याशा गावातून यशस्वी केली ती केवळ पूर्वसुरींच्या पुण्याईवर आणि वाचक हितचितकांच्या पाठिब्यावरच! हे याठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते.

किरातच्या विद्यमान संपादक – सीमा शशांक मराठे

फोन नं – 9689902367, 9403364764, (02366) 262217

पत्रव्यवहाराचा पत्ता – 63/9 , बी. के.रोड,वेंगुर्ला ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग पिन – 416516

This Post Has 2 Comments

  1. खुप छान

  2. किरात साप्ताहिका बद्दल अगदी विस्तृत आणि उपयुक्त माहिती वाचावयास मिळाली जी आजच्या तरुण पिढीला अत्यंत प्रेरणादायी ठरेल. किरातने कोकण आणि कोकणचे रहिवासी यांच्या हितासाठी आणि विकासासाठी अविस्मरणीय कार्य केले आहे ज्या मुळे किरात साप्ताहिक सर्व कोकणवासीयांचा एक कौटुंबिक भाग झाला आहे.

Leave a Reply

Close Menu