लहानाचे मोठे होऊन समाजात एक जबाबदार व्यक्ती म्हणून वावरताना जर भूतकाळात वळून बघितलं तर आपल्यावर झालेल्या खूप सा-या उपकाराची जाणीव वेळोवेळी होते. फक्त डोळे उघडे असले पाहिजेत. आज अशाच उघड्या डोळ्यांनी मागे बघताना प्रत्येकाला निश्चित आठवेल ती म्हणजे आपली शाळा…नव्हे माझी शाळा. मलासुद्धा आज प्रकर्षाने आठवण होतेय ती न्यू एज्युकेशन सोसायटी उभादांडा या संस्थेची आमची न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा ही शाळा…….नव्हे तर संस्कार मंदिर.
इयत्ता आठवी ते दहावी असे फक्त तीन वर्ग, त्यात एकूण सहा तुकड्या आणि साधारणपणे ३००-३२५ मुले, ही ढोबळ रचना. २००१-२००२ मधली आमची दहावीची बॅच. आज शाळा सोडून जवळपास १९ वर्षे झाली तरी शाळा, ते शिक्षक आणि आठवणी अगदी ताज्याच वाटतात.
शाळेची एक सर्वमान्य ओळख म्हणजे, सातार्डेकरांची शाळा. कारण कै.सतीश सातार्डेकर सर यांचा एकूणच शाळेवर असलेला प्रभाव आणि दबदबा (आजच्या काळात टेरर असं म्हटलं तरी वावगं ठरु नये) कारण सर मुळात होतेच तसे. शाळेत तर सोडाच पण एखाद्या वात्रट विद्यार्थ्याला अगदी घरी जाऊन मार देण्याची अजब हिंमत ठेवणारे. ‘‘होयो तसो मारा त्याका‘‘ असे पालकांकडून सुद्धा वन्समोअर घेणारे केवळ सातार्डेकर सरच नाहीत तर आमच्या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाची एक खासियत होती. मग सातार्डेकर मॅडम असुदेत वा लोहार सर. गणिताचे सर्वोत्तम कांबळी सर असुदेत वा वाळवेकर सर. हिंदी शिकवताना अगदी कवितेत शिरणारे कुबल सर आणि स्मशानातले सोने शिकवणारे मराठीचे थरकार सर. ज्यांच्या काठीच्या फटक्यात पण वेगळीच मजा असायची अशा वाळवेकर मॅडम. भूगोल कसा शिकवावा हे मोहिते मॅडम कडून कोणीही शिकावं. खेळ असुदेत वा एम.सी.सी. वा विज्ञान सगळे विषय तेवढ्याच इर्षेने शिकवणारे गोवेकर सर. या आणि अशा सर्व शिक्षकांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या कित्येक पिढ्या घडविल्या.
१९६३ सालची स्थापना असूनसुद्धा भौतिक अडचणींचा सामना करणारी आमची शाळा. पण गुणवत्तेच्या बाबतीत कधीही कमी पडली नाही. शालांत परीक्षांचा सर्वोत्तम निकाल, कबड्डीचे कित्येक वेळचे जिल्हा विजेते, सांस्कृतिक स्पर्धा असोत वा वक्तृत्व स्पर्धा, एमसीसी संचलन असो वा विज्ञान प्रदर्शन. शाळेचा सहभाग असला आणि बक्षिस मिळालं नाही असं क्वचितच कधी व्हायचं. याला कारण केवळ आणि केवळ शिक्षकांचा सक्रिय सहभाग. म्हणूनच सरस्वती पूजन आमच्या शाळेत तीन दिवस चालायचे मग पाठोपाठ सहामाही परीक्षा त्यानंतर लगेच क्रीडा महोत्सव. प्रत्येक कार्यक्रमाचा मूड हा त्या त्या प्रसंगाला साजेसा असायचा. एवढं सगळं अनुभवलं तर कुठला विद्यार्थ आपल्या शाळेला विसरेल?…….म्हणूनच न्यू इंग्लिश स्कूल चा कुठलाही विद्यार्थी याला अपवाद नाही.
आज शाळा सोडून एवढी वर्ष झालीत. मग आठवतो तो व्यवहार. खरंच आपल्या शाळेने आपल्याला तारलं का? असा वाटणारा प्रश्न. इतरांचे अनुभव काहीही असतील मात्र माझं मत ठाम आहे. शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच नाही तर जगायला पण शिकवलं. स्काऊटगाईडच्या माध्यमातून खरी कमाई करताना माडांच्या झावळ्या वळून मिळवलेले १० रुपये खूप काही शिकवून गेले. क्रीडा महोत्सवात वडापाव विकताना कधी लाज नाही वाटली. घरात इस्त्री नसेल तर तांब्यात गरम पाणी भरा आणि कपडे इस्त्री करा, पण १५ ऑगस्टला शिस्तीत या असं सांगणा-या शिक्षकांनी परिस्थिती वर मात करायला शिकवलं. इंग्रजीच्या नावाने बोंब असणारे आम्ही, आज आत्मविश्वासाने आणि व्याकरण दृष्ट्या शुद्ध इंग्रजी बोलतो आणि लिहितो ही सर्व आमच्या शिक्षकांचीच पुण्याई.
आज आमची ती शाळा आणि आताची एकूणच शिक्षणाची परिस्थिती बघता काही गोष्टी परखडपणे नमूद कराव्या असं आवर्जून वाटतं. परीक्षा असाव्यात की नकोत, आठवी पर्यंत नापास करावं की नको, बेस्ट ऑफ फाईव्ह चा तमाशा, एस.एस.सी.ला म्हणे भविष्य नाही म्हणून आय.सी.एस.सी. व सी.बी.एस.सी.असे काहीतरी पर्याय, सुलभ शिक्षणासाठी डिजिटल स्कूल ही संकल्पना, इंग्रजीचा अट्टहास करतानाच सेमी इंग्लिशचा मध्यम मार्ग अशा एक ना अनेक गोष्टींनी आजचा विद्यार्थी आणि त्यापेक्षा पालक गोंधळून गेलाय. आम्ही शिकताना या गोष्टी तर कधीही नव्हत्या, पण आज अभिमानाने सांगावस वाटतं की अशा तथाकथित भौतिक सुविधा नसून सुद्धा आम्ही भरपूर शिकलो आणि शिकतोय. याला सुद्धा कारण एकच. आम्हाला शिकवणारे सर्व आदर्श शिक्षक. मग आज कोण कमी पडतंय? याचा सुद्धा सारासार विचार व्हायला हवा.
आज मोबाईलच्या वापरात विद्यार्थ्यांच्या कित्येक पिढ्या वाया गेल्यात हे कटू सत्य आहे. पुस्तकांच्या वाचनापासून मुलं दूर होत चाललीत. संस्कार घरात व्हावेत की शाळेत हे पालकांना सुद्धा कळेनासं झालंय. म्हणूनच या परिस्थितीत शाळा आणि शिक्षकांची जबाबदारी खूप वाढलीय. एक माजी विद्यार्थी म्हणून आणि एक समाज घटक म्हणून एवढंच वाटतं की शाळांनी आता थोडं बदलावं. १०.०० ते ५.०० च्या बाहेर येऊन उरलेला वेळ मुलांना बिझी ठेवावं, काही खेळांसाठी, पुस्तकांवर आधारित प्रश्नमंजुषासारख्या स्पर्धानी, चाकोरी बाहेच्या छोट्या छोट्या वैज्ञानिक शोधांसाठी, लहान सहान अभ्यास दौरे-सहली काढून, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अगदी सातवी-आठवी पासून सुरु करुन, देशात आणि समाजात आजूबाजूला होणा-या घडामोडींवर उघड चर्चा घडवून, मो मवावक मॉक पार्लमेंट सारख्या उपक्रमातून.
आजची एकूणच सामाजिक परिस्थिती बघता या सर्वप्रश्नांना शाळा हाच एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे आणि उभादांडा पंचक्रोशीपूरता विचार करता न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा ही माझी शाळा या सर्व आव्हानांना समर्थपणे सामोरी जाईल असा विश्वास. – समिर मधुसूदन घोंगे, एल.एल.एम.(मुंबई),
उभादांडा, वेंगुर्ला. ९९६००३६१८४