सागररत्न मत्स्य बाजारपेठमधील तळमजल्यावरील १५ गाळ्यांबाबत जुन्या गाळे धारकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ‘‘फस्टराईट टू रिफ्युजल‘‘ यानुसारच लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन या शासकीय प्रक्रियेला सहकार्य करावे. नियोजित लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर ज्यांना गाळे मिळतील अशा गाळेधारकांना ३० वर्षे दीर्घ मुदतवाढ देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवून योग्य तो न्याय देण्यात येईल. यामुळे जुन्या गाळेधारकांनी आत्मदहना सारखे कृत्य करू नये असे आवाहन नगरपरिषद तर्फे करण्यात आले.
सागररत्न मत्स्य बाजारपेठमधील तळमजल्यावरील १५ गाळ्यांबाबत जुन्या गाळेधारकांच्या बाबतीत नगरविकास मंत्री यांनी दिलेल्या निर्णयाबाबत चर्चा करण्यासाठी २६ ऑगस्ट न. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली तालुका व्यापारी संघ व जुने गाळे धारक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डीचोलकर, नगरसेवक तुषार सापळे, कृतिका कुबल, शितल आंगचेकर, कृपा गिरप-मोंडकर, साक्षी पेडणेकर, स्नेहल खोबरेकर, श्रेया मयेकर यांच्यासहीतत व्यापारी संघ अध्यक्ष विवेक खानोलकर, व्यापारी राजेश शिरसाट, संजय तानावडे, सदानंद नवार, गजानन गावकर, किशोर परब, सदानंद दिपनाईक, सय्यद कासीम, प्रकाश नेरूरकर, मेघशाम सामंत, शंकर सातार्डेकर, श्याम शेट्ये आदी उपस्थित होते.
हे गाळे जुन्या गाळेधारकांना देण्यात यावेत. लिलाव प्रक्रियेत बाहेरुन येणारे व्यापारी जास्त बोली लावून गाळा मागतील मात्र तेवढे जुन्या गाळे धारकांना देणे शक्य होणार नाही व आमच्यावर अन्याय होईल त्यामुळे याचा विचार व्हावा अशी मागणी या बैठकीत व्यापा-यांनी केली. मात्र या दृष्टीने नगरपरिषद कडून कोणतीही कार्यवाही झाल्यास शासन आदेशाचे उल्लंघन होणारे आहे. त्यामुळे सर्व जुन्या गाळे धारकांनी शासनाच्या नियमाप्रमाणे लिलावात भाग घेऊन नियमानुसार गाळे प्राप्त करावेत. दरम्यान ही लिलाव प्रक्रिया झाल्यांनातर गाळ्यांचा भाडेतत्ववारील कालावधीचा विचार करता तो ३० वर्षांसाठी वाढवून देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येईल असे मुख्याधिकारी डॉ.सोंडगे यांनी सांगितले.