शेकडो पाऊल खुणा मागे सोडत ग्रीन सी टर्टल सागर वासी

देवबाग-तारकर्ली किनारपट्टीवर समुद्री कासवाने अंडी घालून घरटे बनविल्याची घटना कासव मित्र पंकज मालंडकर यांनी दि. ११ जानेवारी रोजी उजेडात आणली होती. सुरुवातीला हे घरटे ऑलिव्ह रिडले या सागरी कासव प्रजातीची असल्याचे बोलले जात होते. परंतु या कासवाचे फोटो आणि व्हिडिओ येथील पर्यावरण विषयक पत्रकार संदीप बोडवे यांनी कांदळवन विभागाच्या अधिका-यांना पाठविले होते. या फोटो आणि व्हिडिओमधील कासव हे ऑलिव्ह रिडले या सागरी कासव प्रजाती पेक्षा काहीसे वेगळे वाटत असल्याचे कांदळवन विभागाच्या अधिका-यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कासव अभ्यासकांशी याबाबत चर्चा केली. सखोल माहितीसाठी सदरील फोटो आणि व्हिडिओ बेंगलोर येथील वाईल्ड लाईफ कॉन्झव्हेशन सोसायटीचे कासव अभ्यासक नुपूर काळे यांनाही पाठविण्यात आले. काळे यांनी या फोटो आणि व्हिडिओंचा अभ्यास केल्या नंतर सदरील कासव हे ग्रीन सी टर्टलअसण्यावर शिकामोर्तब केले होते.

     ग्रीन सी टर्टल ने अंडी घालून घरटे बनविल्यानंतर ५२ दिवसांनी ग्रीन सी टर्टल च्या घरट्यामधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली. ७४ पिल्ले बाहेर आली तर ३ अंडी खराब निघाली. सागरी जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यावेळी कांदळवन प्रतिष्ठानचे सागरी जीव अभ्यासक हर्षल कर्वे, रोहित सावंत, दुर्गा ठिगळे यांसह इसादाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कासव घरट्याचे संरक्षण केलेल्या पंकज मालंडकर यांच्या आई अनिता या सुध्दा यावेळी उपस्थित होत्या.

      ‘ग्रीन सी टर्टलया समुद्री कासव प्रजातीची भारतात फक्त गुजरात आणि लक्षद्वीप येते घरटी आढळून येतात. या कासवाच्या खालील कवचाच्या बाजूला ग्रीन रंगाचे फॅट असते म्हणून याला ग्रीन सी टर्टलअसे संबोधले जाते. ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवाला अंडी देण्यासाठी पूर्ण वाढ होण्यास २० ते ३० वर्षांचा कालावधी लागतो.

      एखाद्या समुद्री कासवाने किना-यावर येत घरटे बनविल्यानंतर ते जन्माला येणारे कासव पूर्ण वाढ होईपर्यंत त्याला अनेक शत्रूंचा सामना करावा लागतो. घरट्यात असताना अंडी चोरी होणे तसेच मुंगूस, कोल्हे किंवा अन्य पाण्यांपासून त्यांना धोका असतो. पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यावर घार, कावळे आदी पक्षी त्यांना खाऊ शकतात. तसेच समुद्रात मोठे मासे, शार्क, मासेमारीची जाळी आणि घोस्ट नेस्ट यांचा लहान पिल्लांना धोका असतो.

      देवबाग-तारकर्ली किनारपट्टीवर ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवाने घरटे बनविणे ही महाराष्ट्राच्या कासव संवर्धन मोहिमेसाठी सुखद घटना आहे. यानिमित्ताने सिंधुदुर्गचे किनारपट्टी सागरी जैवविविधतेने संपन्न असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. येथील पर्यावरण रक्षकांचे यासाठी अभिनंदन करत असल्याचे कांदळवन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी सांगितले.

      कांदळवन प्रतिष्ठानचे सागरी जीव अभ्यासक हर्षल कर्वे म्हणाले, महाराष्ट्रात आढळलेले ग्रीन सी टर्टलचे हे पहिलेच नेस्ट असल्यामुळे आम्ही याचा अभ्यास करणार आहोत. या घरट्यातील अंड्यांंचे प्रमाण, त्यापैकी बाहेर आलेली पिल्लांची संख्या आणि लागलेला कालावधी या माहितीचा आम्ही पुढील काळात ग्रीन सी टर्टलचा अधिवास जतन करण्यासाठी उपयोग करणार आहोत.

Leave a Reply

Close Menu