बच्चे मन के सच्चे…

      त्या दिवशी मानसीच्या घरी सहज भेटायला गेले होते. तर तिच्या घरी तिची दोन वर्षांची मुलगी स्वरा आणि तिच्यात जुगलबंदी चालू होती. स्वराला ती भात भरवत होती. शेवटचे दोन तीनच घास राहिले होते. पण स्वराला ते नको होते. त्यामुळे मानसीने घास भरवला की ती तो बाहेर काढायचा प्रयत्न करत होती आणि मानसी तो पुन्हा आत ढकलत होती. दोन-तीन वेळा हे दृश्‍य बघितल्यावर मी न राहवून मानसीला म्हटले, “अग, तिला नको असेल तर बास कर ना! कशाला जबरदस्ती करतेस?“ त्यावर मानसीचे उत्तर होते, “अग निदान एवढा भात तरी तिच्या पोटात जायला नको? आणि ती असेच करत राहिली तर तिला पानात अन्न टाकायचे नाही हे कसे कळणार?“ त्यावर मी म्हटले, “तिचे पोट भरले असेल म्हणूनच ती असे करते आहे ना? पहिला भात तिने खाल्लाच ना व्यवस्थित? याचाच अर्थ तिचे पोट आता भरले आहे. तिने किती अन्न खायचे हे तिचे पोट ठरवू दे ना. आपण ठरवणारे कोण?”

      बऱ्याचदा असे दृश्‍य आपल्याला अनेक घरांमधून दिसून येते. एवढेच कशाला या वयातील मुलांना अंघोळीला किती गरम पाणी द्यायचे, त्यांनी कधी झोपायचे, कधी जेवायचे, कधी पाणी प्यायचे या गोष्टी आई ठरवते. वास्तविक या सर्व क्रिया म्हणजेच भूक, तहान, झोप या वयातील मुलांच्या अंतःप्रेरणा आहेत. अर्थात मुलांना योग्य वळण लावण्यासाठी काही सवयी त्यांना लावणे आवश्‍यकच आहे यात शंकाच नाही. फक्त त्या सवयी लावताना  त्यांच्या मूळ प्रेरणा आपण दडपत नाहीये ना याची काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.

      अगदी गर्भधारणेच्या आधीपासून शिशुशिक्षणाला  सुरुवात होते असे आपण म्हटले. सहा महिन्यांपर्यंतच्या बालकामध्ये हे शिक्षण कसे देता येईल याचाही यापूर्वी आपण विचार केला. आता सहा महिने ते तीन वर्षांच्या बालकांसाठी आपण शिशुशिक्षणाचा विचार या लेखामध्ये करणार आहोत.

      तत्पूर्वी आपण थोडा औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. सहा महिने ते तीन वर्षेपर्यंतचे मूल हे स्वच्छंदी असते. अनेक गोष्टींचा नवीन अनुभव ते घेत असते. रोजच्या स्वच्छतेच्या-खाण्यापिण्याच्या सवयी तो शिकत असतो. त्याला कोणत्याही प्रकारची अजून शिस्त नसते. त्यामुळे शाळेत बसून जसे एक नंतर दोन, दोन नंतर तीन असे अंक म्हणायचे किंवा क, ख नंतर ग येतो असे काही शिकवले जाते ते या अनौपचारिक शिक्षणात अपेक्षित नाही. तर या सर्वांची पूर्वतयारी येथे अपेक्षित आहे. म्हणजे वस्तू कमी-जास्त, लहान-मोठी  समजणे, वस्तूंची नावे समजून घेऊन त्याचा उच्चार करणे अशा पद्धतीने  सहज जाता जाता हे शिक्षण दिले गेले पाहिजे. उदा. गुलाबजामचे नुसते चित्र पाहून मुलांना त्याची अनुभूती येणार नाही, तर तो प्रत्यक्षात ते खातील तेव्हा तो पदार्थ त्यांच्या स्मरणात कायमचा राहील. त्यामुळे नंतर जेव्हा ते या पदार्थाचे चित्र पाहतील तेव्हा पटकन तो नावासकट सांगतील. कारण तो अनुभव त्यांनी घेतला आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे आणि जास्तीत जास्त अनुभव या वयात मुलांना देणे हा शिशुशिक्षणाचा पाया आहे. तेच अनौपचारिक शिक्षण! आहार-विहार-संस्कार आणि अंतःप्रेरणा-अनुकरण अनुभव यांच्या मदतीने हे शिक्षण दिले जाते.

         सहा महिने ते तीन वर्षापर्यंतच्या अवस्थेला क्षीरान्नाद असे म्हणतात. या काळात क्षीर म्हणजे दूध व अन्न असा दोन्ही प्रकारचा आहार ते घेतात. हळूहळू दूध कमी करून तीन वर्षापर्यंत मुलांना पूर्ण अन्न खायची सवय लावावी लागते. सहा महिन्याच्या मुलांना चवीची फारशी माहिती नसते. त्यामुळे जेव्हा अन्न देण्यास सुरुवात करतो तेव्हा सर्वही सहा रसांची त्यांना चव दिली तर ते सर्व प्रकारच्या चवीचे अन्न खायला शिकतात. सुरुवातीला पेज, डाळीचे पाणी यासारख्या द्रव पदार्थांपासून सुरुवात करत हळूहळू खिरीसारखे पातळ पदार्थ आणि नंतर खिचडी-मऊ भात द्यावा. त्याबरोबरच फळभाज्या/पालेभाज्या, सर्व प्रकारच्या डाळी यांचा समावेश असावा. आहार स्वच्छ, ताजा आणि सुखोष्ण असावा. त्यात दूध- तूप घालून स्निग्ध केलेला असावा. रेडिमिक्स, तळलेले, बाजारी आणि अति मसालेदार पदार्थ किंवा शीतपेये यांची मुलांना या वयात सवय लावू नये.

      विहाराचा विचार करता या वयात मुलांची कर्मेंद्रिये अधिक सक्रिय असतात. त्यामुळे बसणे, रांगणे, उभे राहणे आणि चालायला लागणे या क्रिया क्रमाने होत असतात. या काळात त्यांना त्या त्या कृती करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सुरवातीला मुलांना भरवता भरवता हळूहळू त्यांना स्वतःच्या हातांनी जेवण्याची सवय लावणे, न सांडता अन्न खाणे, थंड-गरम स्पर्श किंवा गोड-तिखट असे पदार्थ खाणे यातून त्यांच्या कर्मेंद्रियांच्या व ज्ञानेंद्रियांच्या सूक्ष्म कौशल्याचा विकास होण्यास मदत होत असते. या वयातील मुलांना पाणी, माती यांच्या सान्निध्यात जास्तीतजास्त राहायला आवडते. पण त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल म्हणून आपणच त्यांना यापासून वंचित ठेवतो. वास्तविक माती-पाण्यात खेळली तरच मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते हे सत्य आहे. त्यांना जास्तीतजास्त निसर्गाच्या सहवासात नेणे, झाडे-पाने-फुले यांना स्पर्श करणे, त्यांचे अनेक प्रकारचे रंग दाखवणे, फुलपाखरे, पक्षी, प्राणी यांची ओळख करून देणे, गवतावर चालायला लावणे अशा विविध माध्यमातून त्यांच्या कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये यांच्या विकासाला आपण साहाय्य करू शकतो.

      या काळात जसा शारीरिक विकास होत असतो तसाच मानसिक विकास होण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात. त्यांना प्रेम व सुरक्षा हवी असते. त्यामुळे आई-वडिलांचा सहवास जास्तीतजास्त मिळणे गरजेचे असते. त्यांच्यासमोर आपापसात बोलताना किंवा त्यांच्याशी बोलतानाही आपली भाषा योग्य असली पाहिजे. मातृभाषा ही त्यांना अधिक जवळची असल्याने त्याच भाषेत संभाषण करणे योग्य ठरते. पोलीस, डॉक्टर, इंजेक्शन, एखादा प्राणी यांची सातत्याने भीती घालू नये. अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्यामुळे ताटात अन्न टाकणे, जमिनीवर अन्न फेकणे या गोष्टी अयोग्य आहेत याची त्यांना हळूहळू जाणीव करून द्यावी लागते. त्यांची खेळणी ही वयाला अनुरूप आणि आकर्षक रंग असणारी, इजा न होणारी, कर्कश्‍य आवाज न करणारी असावीत. बंदूक, तलवार यासारखी हिंसेकडे झुकणारी खेळणी शक्यतो टाळावीत. कपडे आकर्षक रंगाचे, सुती, सैल व पाने-फुले वा सुखावणारी चित्रे ज्यावर आहेत अशी असावीत.

      सहा महिने ते तीन वर्षांच्या मुलांमध्ये कुतूहल, एखादी गोष्ट वारंवार करून बघणे, सक्रियता स्वाभाविक असते. त्यामुळे त्यांची नैसर्गिकरित्या होणारी वाढ लक्षात घेऊन त्याला पूरक असे शिक्षण म्हणजेच पचनास योग्य असा पोषक आहार, अयोग्य सवयी दूर करून शरीराला व मनाला हितकर अशा सवयी लावणे व त्यांच्यामध्ये प्रेम-सुरक्षितता व आनंद निर्माण होईल असे पोषक वातावरण घरातच निर्माण करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने शिशुशिक्षण होय!

– डॉ. मेधा फणसळकर, 9423019961.

Leave a Reply

Close Menu