तुज पंख दिले देवाने- – विशेष मुलांसाठी पुण्यातील प्रिझम फैौंडशन ही संस्थ्ा काम करते. या संस्थ्ोमधील बेन्यू प्रशिक्षण विभागाच्या मुख्याध्यापक विद्या भागवत यांनी लिहिलेल्या विशेष मुलांच्या जिद्दीच्या कहाण्या ‘तुज पंख दिले देवाने’ या नवीन सदरात …
“अरे राजा, रात्र झाली, आता झोपा रे, मीट बघू डोळे! कितीदा सांगायचे तुला? दिवा बंद केला तरी तुझे डोळे टकटकीत उघडे! काय रे हे! जा, मी तुझ्याशी बोलणारच नाही! अजिबात हसून पाहू नकोस माझ्याकडे, मी ही दिवसभर दमते रे!“ अवनीचे अखंड बोलणे चालू होते पण आमचा राजा – तो काही केल्या डोळे मिटत नव्हता, मी माझे ऑफीसचे काम करत होतो, शेवटी अवनीला म्हणालो “अगं, तू दमली आहेस ना? दिवसभर त्याचं केवढं करायला लागतं तुला, तू झोप, मी बघतो त्याच्याकडे! अवनीने माझं ऐकलं आणि राजाच्या पलीकडे तिने थकलेले अंग टाकलं.
मी काम करता करता हळूच टेबल लॅम्पच्या दिव्याची डोळ्यांवर तिरीप जाऊ नये म्हणून तो ॲडजेस्ट केला आणि दोघांकडे पाहिले, अवनी शांत झोपली होती आणि राजा? त्याचे डोळे उघडेच होते, शेवटी मी उठलो आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला उचलले, उचलतांना जरा त्रासंच झाला, कारण आमच्या राजाचं वय आहे, 10 वर्ष; पण तो स्वत: फार हालचाली करू शकत नाही, तोल सांभाळत नाही, अवनी कसं मॅनेज करते देव जाणे!
त्याच्या येण्याच्या चाहुलीने आम्ही सुखावलो होतो, तोवरचं आमचं सहजीवन मस्त होते. त्याने या जगात येण्याची जरा घाईच केली. 7 व्या महिन्यातच जन्माला आला आणि वजनही फार नव्हतं त्याचं! त्यामुळे आनंदाबरोबरच काळजीचे वातावरणही होते. सगळं नीट होईल ना? बाळाचं वजन वाढेल ना? म्हणून आम्ही धास्तावलो होतो. त्याला ‘इनक्यूवेटर’ मधेच ठेवलं होतं, त्याची प्रगती दिसत होती. त्याला एक महिन्यांनी घरी सोडलं, पण डॉक्टरांनी “त्याची काळजी घ्यावी लागेल, लक्ष द्या“ असं बजावलं त्याप्रमाणे सगळी काळजीही घेत होतो.
त्यातच एक दिवस ताप आल्यावर त्याने अकस्मात डोळे फिरवले, हालचाल करेना, तोंडातून लाळ गळायला लागली. अवनीने त्याला उचलून डॉक्टरांकडे नेले. तेंव्हा मॅनेंजायटिसचे निदान झाले, उपचार झाले, पण त्याच्या सगळ्याच कृती मंदावल्या. मान धरणे, हातापायांची हालचाल या सगळ्यांवरच परिणाम दिसायला लागला आणि डॉक्टरांनी त्याच्यावर दीर्घकाळ उपचार करावे लागतील असे सांगितले. त्या एवढ्याशा बाळाला सांभाळण्याची आमची कसरत सुरू झाली. अवनीचं आयुष्य त्याच्या भोवतीच फिरू लागलं आणि सुरू झाला ताणाचा, कष्टांचा प्रवास!! पूर्वीची अवनी दिसेनाशी झाली. माझ्याभोवती फिरणारी, माझा विचार करणारी! माझीही थोडी चिडचिड व्हायची पण अवनी मात्र राजातच गुंग असे! तिचा गाण्याचा रियाज थांबला. आमचा संवाद थांबला.
राजाला लवकर जाग येत नसे, तर तेवढ्या वेळात अवनी घरातलं सगळं आवरून ठेवायची. नाष्टा, जेवण, सगळं! मी तेव्हा मदत करायला लागलो की अवनी म्हणायची, “तुम्ही तुमचं आवरा“ मग माझा नाईलाज व्हायचा!
त्यानंतर ती 9 वाजता राजाला उठवायची. त्याच्या कलाकलान, हळूहळू त्याचं आवरायची, त्याच्या हालचाली नीट व्हाव्यात म्हणून मालीश करणे, त्याला गिळतांना ठसका लागायचा म्हणून सावकाश, थोडं थोडं दूथ चमच्याने घालणे, चमच्याने जीभेवर अलगद दाब देणे इ. प्रेमाने, काळजीने करायची. डॉक्टरांच्या प्रत्येक सुचना लक्षात घ्यायची. हळूहळू त्याला फिजिओथेरपीला, स्पीच थेरपीला नेणं सुरू झालं आणि तिच्यावरचा ताण आणखीनच वाढला. आता 4 वर्षांचा राजाही तिला दाद देईनासा झाला होता. मधे मधे त्याला फिट्स येणेही सुरू झाले, त्यामुळे त्याच्यात दिसणारी प्रगती ही खुंटायची, परत तो थोडा मागे आलेला असायचा! तिचा त्रागा, चिडचिड पाहून मी ही खंतावत होतो.
यावेळी मात्र मला जाणवलं की, “असं मूल होणं हा स्वतःचा दोष आहे“ असं ती मानत होती. आमच्या घरी जरी असं कोणी म्हणलेलं नसलं तरी ही गोष्ट तिला निश्चितच खात होती. शेवटी मी तिला समजावलं, प्रसिद्ध कवी, गीतकार गुरु ठाकूर यांची कविता वाचून दाखवली,
“असे जगावे छाताडावर, आव्हानांचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर,
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर”
त्यातच पुढे माझ्याही ओळी मी जोडल्या
“दोघे आपण असतां सोबत, संकटे कितीही येवो बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमधे आयुष्याला द्याव उत्तर”
आणि तिला म्हणलं, “अगं, माझ्यासाठी सहजीवन म्हणजे येणाऱ्या प्रत्येक क्षणाला दोघांनी एकत्र सामोरे जाणे, मग ते सुख असू दे, दुःख असू दे, आपले हात हातात असले की कशाचीही भिती, ताण बाळगायचे कारण नाही. असं मूलं होण हे आपल्यासाठी वरदान आहे असं समजूया, या निमित्ताने दहा वेळा आपण देवाचं नाव घेतोय.
हे बघ, आपण प्रयत्नात कुठेही कमी पडायचं नाही. डॉक्टर सांगतील ते सगळं आपण दोघे मिळून करू, आपण एकमेकांना सर्वार्थाने साथ देऊ आणि आपल्या राजाचं भवितव्य चांगलं असेल याची काळजी घेऊ. त्याला, त्याच्या क्षमतांना फुलवायला दोघांचीही गरज आहे, त्याचबरोबर आपण ही “माणूस“ म्हणून अधिक चांगले होऊ. स्वतःचे छंद जोपासू म्हणजे कोणावरच त्याचे ओझे होणार नाही.“ बऱ्याच दिवसांच्या चर्चेनंतर अवनीलाही हे पटले आणि हळूहळू तिचे मळभ दूर झाले.
आम्ही आता कामांची विभागणी केली. मी सकाळचा नाश्ता बनवायला सुरूवात केली, घरामधली स्वच्छता करायला लागलो, त्या वेळेत अवनीला तिच्या गाण्याचा रियाज करता यायला लागला. लोकांना/मित्रांना कळल्यावर आधी त्यांनी टोमणे मारले पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलयं.
राजा उठला की मी त्याचे दात घासायला, त्याला पायरी पायरीने शिकविणे सुरू केले, त्याला चूळ भरता यायची नाही, पटकन पाणी गिळूनच टाकायचा!! मग ठसकायचा!! त्यासाठी फिजिओथेरपिस्टने सोपी युक्ती सांगितली. तसे व्यायाम हसत खेळत करून घेतले, मग हळूहळू त्याच्या गालाचे स्नायू तयार झाले आणि थोडा वेळ पाणी तोडांत धरता यायला लागले. त्याच्यासाठी बाथरूममध्ये टब बसवून घेतला त्यात पाणी साठवून “हाइड्रोथेरपी“ सारखे उपचार करून घ्यायला सुरूवात केली. यामुळे त्याच्या स्नायूंना व्यायाम मिळायला लागला आणि त्याच्या हालचालींमधे बदल झाला. माझी ही त्याच्याशी जवळीक वाढली.
त्यानंतर मी ऑफीसला जातांना अवनी आणि राजाला फिजिओथेरपीसाठी सोडायला लागलो, तेथे व्यायाम करून झाला की अवनी त्याला परत आणायची, फिजिओथेरपीच्या वेळी तेथे ती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बघायची, मग घरात उरलेल्या वेळी त्याच्याकडून त्याच्या कलाकलाने त्या करून घ्यायची. त्याला गोष्टी सांगणे, चित्रे दाखविणे, त्याच्या फाईन मोटर्स स्किल विकसित व्हाव्या म्हणून ॲक्टिव्हिटीज करणे हे सगळं करतांना ती अजिबात थकायची नाही. एकीकडे रात्रीची थोडी तयारीही ती करून ठेवायची. आता मी घरी आलो की त्याला घेऊन आम्ही बागेत जातो, तिथल्या लॉनवर त्याच्या बरोबर बसतो, त्याला बागेतल्या घसरगुंडी, सिसॉवर बसविण्याचा प्रयत्न करतो अर्थात धरून धरूनच!! तो पडणार नाही याची काळजी घेतच हे सगळे आम्ही करतो आणि या सगळ्याचा चांगला परिणाम राजावर झालेला दिसतोय, त्याच्या डोळ्यांत प्रत्येक गोष्टीबद्दल उत्सुकता दिसायला लागलीय, आपण होऊन हालचालीसाठी तो प्रयत्न करतोय. मला मात्र बागेतून घरी येण्याची थोडी घाई होते. घरी आलं की मला रात्रीचं वनमिल डिनर करायचं असत ना! राजाला कॉर्नरचेअर मधे बसवून माझं त्याच्याशी बोलत बोलत कामं चालतं. परवाच आम्ही एका शाळेतही जाऊन आलोय. आमचा राजा आता शाळेत जाणार आहे! मला खात्री आहे की आमच्या दोघांच्या एकत्रित प्रयत्नांना यश येईल. राजाची त्याच्या क्षमतांनुसार चांगली प्रगती होईल आणि तो आयुष्याला योग्य उत्तर देईल!!
यांसारख्या अनेक मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या संस्था आहेत, त्यापैकी एक म्हणजे संस्था म्हणजे, पुण्यामधली प्रिझम फौंडेशन! ही संस्था 1990 सालापासून विशेष शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. वरील गोष्टीत उल्लेख केलेल्या बाबांची मानसिकता सकारात्मक होण्यासाठी आणि त्याच्या आईवरील ताण कमी करण्यासाठी संस्थ्ोने खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर हा बदल घडला.
प्रिझम फौंडेशन ही धर्मादाय विश्वस्त संस्था असून सदर संस्थेतर्फे : 1. फिनिक्स स्कूल (विशेष शिक्षण) : जे विद्यार्थी अभ्यासात मागे पडतात़़ अशा गतिरूध्द विद्यार्थ्यांसाठी ही शाळा चालविली जाते.
- लार्क ः लार्क ही शाळा मतिमंदत्व़, एपिलेप्स़ी, बहुविकलांग, थोडा वाचादोष, श्रवणदोष़, अस्थिरता यासारख्या समस्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
- माधवी ओगले व्यावसायिक शाळा (MOVS): शैक्षणिक प्रगती करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे कॅनिंग, भरतकाम, बेकिंग, कॉम्प्युटरची ओळख यांचे शिक्षण देऊन व्यवसायासाठी पाया तयार केला जातो.
- बेन्यू प्रशिक्षण संस्था ः विशेष शिक्षणासंबंधी एक महिन्याचे, आठवड्याचे प्रशिक्षण वर्गांचे नियोजन केले जाते. शिक्षकांसाठी व पालकांसाठी चर्चासत्र आयोजित करून त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो.
संस्थेला आर्थिक हातभाराची गरज नक्कीच आहे. गेली 32 वर्ष सरकारी मदतीविना, समाजातील दानशूर व्यक्तींच्या अर्थपूर्ण सहभागामुळे आणि सर्व शिक्षक वर्गाने केलेल्या सहकार्यामुळे संस्था वाटचाल करते आहे. संस्थकडे 80 G, CSR क्रमांक आहे. तसेच संस्थेला ISO 9001:2015 सर्टिफिकेट आहे.
संपर्कासाठी पत्ता – प्रिझम फौंडेशन, 77, एरंडवणा, प्रभात रोड, लेन नं. 15, पुणे. 411 004,
ई-मेल prismfoundation@hotmail.com / prism.spl.edu1990@gmail.com
फोन- 020 25679714/09022941108
– विद्या भागवत
प्रिझम फौंडेशन संचलित बेन्यू प्रशिक्षण केंद्र