स्वामी समर्थांची वेंगुर्ला शहराला अलौकिक देणगी : सद्गुरु भास्करपंत वागळे!!

    अक्कलकोटच्या सद्गुरू स्वामी समर्थांचे वेंगुर्ल्यावर खूप प्रेम होते. त्याला कारणही तसेच घडले होते. सुमारे दोनशे सव्वादोनशे वर्षांपूर्वी (1790 ते 1872) उभादांडा येथील महान सद्गुरू परम विठ्ठलभक्त पूर्णदास बाबा उसपकर यांच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दस्तुरखुद्द विठ्ठल रखुमाई मानवी दांपत्याच्या रूपाने तब्बल तेरा महिने पूर्णदासांच्या घरी त्यांची सेवाशुश्रूषा करीत वू सुखसंवाद साधत वास्तव्य करून राहिले. ही अभूतपूर्व अशी घटना वेंगुर्ल्यास घडली…!! साहजिकच संतवाङ्मयाचे श्रेष्ठ लेखक ह.भ.प. दासगणू महाराज भक्तिसारामृत ग्रंथात लिहितात:

“नित्य संवाद श्रीहरीसी । करीत होते पुण्यराशी ॥

वेंगुर्ले हे कोकणाशी । प्रति झाले पंढरपुर ॥ 99॥

पूर्णदास पुंडलिक । तद्भक्ती चंद्रभागा देख ॥

उभा रुक्मिणीनायक।  वेंगुर्ल्यासी राहिला ॥100॥”

(भक्तीसारामृत अध्याय 33)

        अशा या वेंगुर्ल्याच्या पुण्यभूमीवर स्वामी समर्थांचे नितांत प्रेम जडले.त्यामुळे त्यांची सदैव कृपादृष्टी या शहरावर राहिली आणि अत्यंत वैभवाच्या काळातही (म्हणजे 1890 ते 1924) वेंगुर्ला उतू नये, मातू नये व त्याने सद्भावभक्ती व माणुसकी यांचा घेतलेली वसा टाकू नये यासाठीच त्यांचे परमशिष्य आनंदनाथ महाराज यांच्या करवी अत्यंत कडक अशा आध्यात्मिक, कोतवालाची नेमणूक वेंगुर्ला शहरावर केली. त्या कडक कोतवालाचे नाव होते, ‘अवलिया सद्गुरू भास्करपंत वागळे.’

       या आध्यात्मिक कोतवाताने वेंगुर्ल्याच्या इतिहासातील त्या सुवर्णकाळात अत्यंत नि:स्पृहपणे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून वेंगुर्ला शहराची राखण केली. नुसती राखणच केली नाही तर वेंगुर्ला बाजारपेठेचा  आध्यात्मिक व आर्थिक तोल ढळू दिला नाही. वेंगुर्ल्याचे पुण्यत्व कायम राहिले. अत्यंत वैभवातही वेंगुर्ला उतले नाही, मातले नाही, हरिनामाचा व सुसंस्कारांचा पूर्वांपार घेतलेला वसा त्याने टाकला नाही. स्वामी समर्थांना वेंगुर्ल्याच्या रक्षणाची व कल्याणाची सोपविलेली कामगिरी त्यांच्या या शिष्याने एकनिष्ठेने व अत्यंत जबाबदारीने स्वामीनामाचा प्रसार करीत शेवटच्या श्वासापर्यंत निरिच्छ राहून पार पाडली…!!

      तो काळच तसा होता. वेंगुर्ला बाजारपेठेतील प्रत्येक दुकानातून, पेढ्यापेढ्यातून सोन्याचा धूर निघायचा. त्याकाळी (इ.स. 1890 ते 1925) वेंगुर्ल्याचे वैभव मुंबईसारख्या शहराप्रमाणेच होते. वेंगुर्लाबंदरात देशोदेशीची जहाजे – गलबते थांबत. त्यावरील खलाशांच्या बाजारहाटामुळे व्यापारी वर्गाची बरीच चलती होती. माणिकचौकात तर अक्षरश: हिरे माणकांचा व्यापार चाले. माणिकांच्या राशीवर राशी ओतल्या जात. पुणे शहराप्रमाणे वेंगुर्ल्यातही गल्लीबोळातील पेठांना शुक्रवार, रविवार, बुधवार अशी नावे होती. त्या काळात ही असंख्य लक्षाधीश पेढीवाले या भागात होते. अशा या श्रीमंती थाटात जगणा-या वेंगुर्लावासीयांत भास्करपंतानी ज्या विरक्तीचे सहज दर्शन घडविले ते साधकांस / मुमुक्षूस अनुकरणीय वाटत असे आणि सामान्य जनांस थक्क करून सोडत असे. ह्या त्यांच्या वैराग्यशील जगण्याला तोड नाही असेच म्हणावे लागेल.

      बरेच व्यापारी, पेढीवाले, दुकानदार त्यांना धन भिक्षा घालू पहात. पण रागाचा आव आणून ते ओरडून म्हणायचे, “तुझ्या कडे पैसा जास्त झाला काय रे? तो जपून ठेव. गरज असेल अशा गरिबाला दे. उतू नकोस. स्वामी नाम घेत जा. तेच आपल्याला तारते. मला तुझा पैस /अडका काही नको.. “ देणारे व्यापारी थक्क होऊन जायचे; असा बैरागी त्यांनी पाहिलेला नसायचा. मनालाच्या मनात ते व्यापारी अंतर्मुख व्हायचे..!! कडकडीत वैराग्या बाबत जसे, भास्करपंत दक्ष असायचे तसेच दांभिकपणाबाबतही त्यांच्या मनात भयंकर चीड होती. कुणीही दांभिक आचरण केलेले, त्यांना बिलकूल आवडत नसे. या बाबतीत ते कुणाचाही मुलाहिजा ठेवेत नसत. त्याकाळी वेंगुर्ला शहरातील मंदिरात विशेषत: परुळेकर दत्तमंदिरात कथाकिर्तन व प्रवचने मोठ्या प्रमाणावर होत असत. शहरात कुठेही किर्तन-प्रवचन असले तरी पंत आवर्जून त्याठिकाणी जात असत. लक्षपूर्वक ऐकत असत. परंतु कथेकरी किर्तनकार बुवा जर दांभिक भाषण करू लागला तर मात्र त्याला मोठमोठ्याने शिवीगाळ करून, व्यत्यय आणून सळो की पळो करुन सोडायचे. रौद्र रूप धारण करायचे. त्यामुळे वेंगुर्ला शहरात दांभिकपणा, दंभाचार यांना आळा बसला. “आपण कोरडे पाषाण । होका सांगे ब्रमज्ञान ॥” अशी वृत्ती त्यांनी कधीही आणि कुणाकडूनही खपवून घेतली नाही. त्यामुळे वेंगुर्ल्यात यायचे तर योग्य तेच बोलायचे, दांंभिकपणा करायचा नाही अशी दहशत बसली. थोडक्यात या भास्करपंत नावाच्या कडक आध्यात्मिक कोलवालाने वेंगुर्ल्याला चांगले वळण लावले.

   ते कथा-किर्तनाच्या विरोधात नव्हते. उलटपक्षी सज्जन व हरिभक्त अशा किर्तनकारांची किर्तन/प्रवचने त्यांना आवडत असत. उभ्यादांड्याचे केशव राजाध्यक्ष तथा मळ्येकर मास्तरांसारख्याची किर्तने मुद्दामहून ते आयोजित करीत असत. लोकांची तोबा गर्र्दी व्हायची. यात तेही शांतपणे ऐकत बसलेले असत. एकदा याच मळ्येकर मास्तरांनी पहिल्या जागतिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभर झालेल्या परिणामास अनुसरून भास्कर पंतास प्रश्‍न विचारला, “महाराज, हे महायुद्ध केव्हा संपेल.” पंत म्हणाले, “ब्रिटिशांनी हिंदुस्थान केव्हा घेतले? ते वर्ष कोणते होते ? मळ्येकर मास्तर म्हणाले, “सन 1818“ कारण पुणे येथे दुस-या बाजीरावास हरवून ब्रिटिशांनी शनिवार वाड्यावरून भगवा उतरवला व युनियन जॅक फडकविला इ.स.1818. ख-या अर्थाने याचवर्षी ब्रिटिशांनी हिंदुस्थान घेतले.

      सन्‌ 1818 साल सांगताच पंत हसले व म्हणाले, “तेथून शंभर मोज.“ मास्तर मोजू लागले. सन्‌ 1918 असे बोलताच पंतानी त्याला थांबवले व म्हणाले, “वर्ष येईल सन 1918 यावर्षी युद्ध थांबेल.” पुढे तसाच अनुभव आला. भास्करपंत त्रिकालज्ञ होते. पण त्यांना अहंकार असा मुळीच नव्हता! ते खूप कडक असले तरी “फणसा अंगीचे काटे। आत अमृताचे साठे“ या शेख महंमद यांच्या पदोक्तीप्रमाणे ते रसाळ फणसासारखे प्रेमळ व मोक्षाचा मार्ग मोकळा करणारे अवलिया सद्गुरु होते.

      पूर्वजन्मीचे परस्परांचे देणे/घेणे (कर्मविपाक) आपल्या संपर्कात येणा-या कृपेला पात्र ठरलेल्या व्यक्तींबाबत अवलिया सद्गुरु कसे फेडून टाकतात. कर्मविपाक वितळवतात याचे उत्तम उदाहरणे म्हणून भास्कर पंताची खालील कृती उद्बोधक आहे. याबाबत आपणास काहीच ज्ञान नसते. पूर्वजन्मीच्या देण्याघेण्याबाबत आपण अनभिज्ञ असतो म्हणून आपणास अवलियांची ही कृती चमत्कारिक व विसंगत वाटते. प्रसंगी आपणास रागही येतो!!

 वेंगुर्ल्यातील एका पोलीस शिपायाला बोंडू खावेसे वाटते म्हणून तो ते खरेदी करण्यासाठी घाईघाईने बाजारात निघाला होता. तोच वाटेत भास्करपंत उभे राहिले व प्रेमळपणे म्हणाले, “काय रे, तुला काजू खावेसे वाटतात ना? चल माझ्याबरोबर. मी देतो तुला…“. एवढ्यात दाभोलीच्या तिठ्यावरुन एक बोंडवाली धावत धावत आली. भास्करपंतानी तिच्या डोक्यावरील टोपली उतरवून घेतली. शिपायास म्हणाले, “तुला हवे तितके बोंडू घे“ त्याने आनंदाने हवे तितके बोंडू घेतले. तेवढ्यात दुसरा एक इसम तिथून चालला होता. त्याला अडवत पंत बोलले, ‘अरेऽऽऽ हिचे पैसे देऊन टाक…’ तिने पैसे सांगताच त्या दुस-या इसमाने आश्‍चर्यचकित होऊन तिचे पैसे दिले व  नमस्कार करून तो बाजाराच्या दिशेने चालू लागला. त्या शिपायाचे नाव होते -दत्ताराम हवालदारे. पुढे तिघेही त्यांचे भक्त झाले व स्वामी नाम घेऊ लागलो. भास्करपंत आपण काहीच न केल्यासारखे मार्गस्थ झाले.

      या घटनेतून महान योगी भास्करपंतांची सर्वजता जगी दिसून येते तशीच (आपणास विचित्र वाटले तरी) पूर्वजन्मातील देण्याघेण्याच्या व्यवहारातून आपली कशी सोडवणूक करतात व मोक्षाचा मार्ग मोकळा करून देतात याची झलकही पहावयास मिळते.

      असे हे थोर अवलिया सद्गुरु भास्करपंत वागळे फक्त दोन/तीन सावंतवाडी-दाणोलीस सद्गुरु साटम महाराजांच्या भेटीसाठी गेले आणि एकदा उभादांडा मळ्येकर मास्तरांच्या घरी गेले तेवढेच. बाकी वेंगुर्ला शहर सोडून आपल्या 34 वर्षांच्या येथील कारकिर्दीत ते कुठेही बाहेर गेले नाहीत. स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार अत्यंत वेंगुर्ला शहरावर अत्यंत कडक परंतु प्रेमळ, असा जागता पहारा “तंतोतंत एखाद्या कोतवालासारखे देत राहिले! त्यामुळे वेंगुर्ला उतले नाही, मातले नाही, घेतलेला सुसंस्कृतपणा व हरिनामाच वसा वेंगुर्ल्याने टाकला नाही!!

      आज पंत जाऊन 96 वर्षे झाली तरीही वेंगुर्लावासीयांच्या काळजात भास्करपंत घर करून राहिले आहेत. त्यांची 97 वी पुण्यतिथी 17 ऑगष्ट 2022 रोजी (श्रावण वद्य षष्ठी) पालखीच्या महोत्सवाने व स्वामी नाम गजरात साजरी होणार आहे. हे पालखीचे 97 वे वर्ष आहे. ही घटना दक्षिण कोकणात अभूतपूर्व अशीच आहे. तरी या सोहळ्यात सर्वांनी सहभागी होऊन-प.पू.भास्करपंतांच्या पवित्र चरणी नतमस्तक व्हावे असे कळकळीने आवाहन करावेसे वाटते.

      – प्रा. सीताराम उर्फ काका गिरप

      विरार (पूर्व) 9221487239

Leave a Reply

Close Menu