निवडणुकीची हास्यजत्रा

‘‘काय मतदारांनो, करताय ना मतदान? करायलाच पाहिजे तो आपला हक्क आहे, बजावलाच पाहिजे… मतदान करण्यापूर्वी निवडणुकीची हास्यजत्रा नक्की वाचा…!‘‘

   भावी पंतप्रधान!

     पासष्ट वर्षीय आबाजी दिवाणखान्यात बसून होते. राष्ट्रीय राजकारणातील ते एक बडं प्रस्थं होतं. शेजारी त्यांची पत्नी सचिंत अवस्थेत बसली होती. त्यांचे कुटुंब मोठे असूनही एकत्रित होते. आबाजींशिवाय कुणाचे पान हलत नव्हते. त्यादिवशी घरातील सारी मंडळी दवाखान्यात गेली होती. आबाजींची नातसून बाळंत होणार होती. पाच-सहा तास झाले होते. परंतु, तिची सुटका होत नव्हती.

     ‘‘अहो, ऐकलंय का, नॉर्मल डिलेव्हरीचा हट्ट सोडा ना, पोर बघा ना, तळमळ करतेय. सिझेरिग…‘‘

     हाताच्या इशा­याने बायकोला थांबवून आबाजी म्हणाले, ‘‘कारभारीन, तो आपला नातू आहे… या आबाजीचा! त्याला बरंच काही सोसावं लागणार आहे, राजकारणात! आम्ही ४० वर्षांपासून कळ सोसतोय ना… भावी पंतप्रधान म्हणून!…‘‘

     ‘‘तुम्ही कशाची कळ सोडता, कळ लावता… भल्याभल्यांना समजत नाही…‘‘

     ‘‘अगं, इतक्या वर्षात किती पंतप्रधान आले नि गेले, शेकडो आस धरून बाद झाले पण कायम भावी पंतप्रधान म्हणून माझेच नाव सतत चर्चेत असते ना? मला कळ लावता येते म्हणून सोसताही येते…‘‘

     ‘‘ते म्हणतात ना, आम्हासि ग्रह नाही अनुकूळ। नसती उत्पन्न होते कळ । अशी तुमची अवस्था होते…‘‘

     ‘‘खरे आहे, खुर्ची मिळो अथवा न मिळो पण कायम भावी पंतप्रधान म्हणून मी अजरामर होईन…‘‘ आबाजी बोलत असताना त्यांचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर मुलाचे नाव पाहताच पत्नीकडे बघत आबा म्हणाले, ‘‘चिरंजीवाचा फोन! नक्कीच भावी राजकारणी जन्मला आहे…. बोला, चिरंजीव, राजकारणी उदयास आला का?‘‘

     ‘‘हो बाबा. त्यासाठीच फोन केला. तुम्हाला नातू झाला आहे… दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. सायंकाळपर्यंत घरी येतो…‘‘

     ‘‘या. या. आम्ही बाळ राजांच्या स्वागताची जोरदार तयारी करतो…‘‘ असे म्हणत फोन बंद करून आबाजी बायकोकडे बघत म्हणाले,

     ‘‘सौभाग्यवती, अभिनंदन! आजी झाला आहात. दोघांचीही तब्येत चांगली आहे.‘‘

     ‘‘झालं तुमच्या मनासारखं! आता जोडा त्याला राजकारणाच्या गाडीला… बरे, मी काय म्हणते, त्यालाही राजकारणाची आवड निर्माण होईलच, कारण तो रक्ताचा वारसा आहे, तेव्हा त्याचे नाव मतदार यादीत द्या टाकून! एखाद्या वर्षात ग्रामपंचायत लागली तर सरपंच बनून धुमधडाक्यात उतरेल राजकारणात!‘‘

     ‘‘काय हे अज्ञान, बाईसाहेब! बाकी आजी झाल्याबरोबर तुमचा पीजे उफाळून आला आहे…‘‘

     ‘‘पीजे नाही, आबाजी! ज्यांचा जन्मच झाला नाही, अशा शेकडो व्यक्तींची नावे आपणच मतदार यादीत टाकली आहेत ना? एकूण एक मतदान कार्डही बनवून घेतली आहेत ना? विसरलात का?‘‘

     ‘‘अगं, असे काही बोलून उगीच कळ लावू नको. चला, नातवाच्या आगमनाची तयारी करायची आहे…‘‘ असे म्हणत आबाजी तयारीला लागले…. 

नागेश शेवाळकर, पुणे  (९४२३१३९०७१)

 

Leave a Reply

Close Menu