निवडणुकीची हास्यजत्रा

  ‘‘काय मतदारांनो, करताय ना मतदान? करायलाच पाहिजे तो आपला हक्क आहे, बजावलाच पाहिजे… मतदान करण्यापूर्वी निवडणुकीची हास्यजत्रा नक्की वाचा…!‘‘

मनामनातील खासदार  

    सेवानिवृत्तीनंतर भाऊ मास्तरया नावाने ओळखले जाणारे गृहस्थ घरात एका खुर्चीवर बसून होते. आजन्म ब्रह्मचारी असल्याने घरी एकटेच राहत होते. चहापाणी, फराळ नि जेवण सारं काही स्वतःचं स्वतः करीत. विशेष म्हणजे सेवानिवृत्तीनंतर मिळालेला अडका नि अडका दान करून

टाकला होता. निव्वळ कफल्लक वृत्तीने जीवन जगत होते.

     सेवेत असल्यापासून सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असत, तो वसा निवृत्तीनंतरही टाकला नव्हता. जिथे कुठे, ज्या कुणाला मदतीची आवश्यकता आहे असे समजले तिथे स्वतः पोहोचून मदतीचा हात पुढे करीत. त्यांना मानणारी बरीच मंडळी होती.

    लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले तशी विविध पक्षांची, नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. इच्छुकांनी आपले घोडे दामटायला सुरुवात केली असली तरी एक नाव अचानकपणे समोर आले आणि मतदार संघात वेगळीच चर्चा सुरू झाली. त्या नावाला विरोध होत नसला तरीही सहानुभूती निर्माण होत होती. कुणीतरी सहजपणे म्हणाले की, यावेळी भाऊ मास्तरउभे राहिले तर इतरांच्या अनामत रकमा जप्त होतील. हाच धागा पकडून ठिकठिकाणी चर्चेचे फड रंगत होते.

     ह्या सा­यापासून स्वतः भाऊ मास्तर दूर होते, नाही म्हणायला काही व्यक्तिकडून तशी कुणकुण लागली होती. परंतु त्यांनी फारशी दखल घेतली नाही. त्या दिवशी दुपारी ते वर्तमानपत्र वाचत असताना बाहेरुन आवाज आला,

       ‘‘भाऊ मास्तर, आहेत का?‘‘

  पाठोपाठ चार-पाच लोक आत आले. त्यापैकी दोघांना ते चांगल्याप्रकारे ओळखत होते. मास्तरांपुढे ते सर्व दाटीवाटीने बसले.

    ‘‘काय म्हणता?‘‘

    ‘‘मास्तर एक काम आहे आणि तुम्हाला ते करावेच लागेल.‘‘

    ‘‘आधी सांगा तर खरं. मी कधी नाही म्हणालो का?‘‘

    ‘‘मास्तर, आमचं सर्वांचा आग्रह… विनंती आहे, की तुम्ही निवडणूक लढवावी!‘‘

    ‘‘माझं डोकं नाही फिरलं, निवडणूक लढायला? तुम्ही सर्व म्हणजे असे किती? पाच-दहा लोकांना घेऊन निवडणूक...‘‘

    ‘‘मास्तर, इथं आम्ही पाच-दहा असू पण हेच हजारो – लाखो होण्यासाठी वेळ लागणार नाही.‘‘

    ‘‘कशाच्या आधारावर मैदानात उतरू? अनामत रक्कम भरायला खडकू नाही… करोडो रुपये खर्च…‘‘

    ‘‘ते आम्ही बघू. तुम्ही फक्त हो म्हणा. बाकी आमच्यावर सोडा…‘‘

    ‘‘प्रत्येक पक्षात तिकीट मिळण्यासाठी मारामारी चालू आहे तिथे माझी डाळ काय शिजणार?‘‘

    ‘‘भाऊ मास्तर हाच उमेदवार आणि हाच पक्ष…‘‘

      ‘‘म्हणजे अपक्ष उमेदवार? नाही. मला राजकारणात उतरण्याची मुळीच इच्छा नाही…‘‘ भाऊ ठामपणे सांगत असताना बाहेरुन घोषणा ऐकू येऊ लागल्या,

    ‘‘मास्तर आगे बढो, हम तुम्हारे साथ है…‘‘

    ‘‘आमदार कैसा हो, भाऊ मास्तर जैसा हो…‘‘

    ‘‘अरे, हा काय प्रकार आहे?‘‘ बाहेर येत भाऊंनी विचारले आणि त्यांच्या लक्षात आले की, शेकडो माणसं जमली आहेत. मास्तरांना पाहताच घोषणांचा जोर वाढला. मास्तर थांबण्याचा इशारा करत असताना ८० वर्षे वयाची एक व्यक्ती दमदार पावलं टाकत येत असल्याचे पाहून भाऊ मास्तरांना आश्चर्याचा धक्का बसला. ते लगबगीने पुढे गेले. त्या व्यक्तिच्या पायाच्या दिशेने वाकत असताना त्यांना थांबवत त्या गृहस्थाने विचारले,

    ‘‘भाऊ, ओळखले का?‘‘

    ‘‘हे काय स्वामी, एक वेळ स्वतःला विसरेन पण ज्याने बोटं धरुन बाराखडी आणि आकडे गिरवून घेतले…‘‘

    ‘‘तर मग ऐक… निवडणूक लढ…‘‘

    ‘‘प…. प….. पण……

कोटींची उड्डाणे कशी घेऊ…‘‘

    ‘‘कुणी सांगितलं तुला पैसा खर्च करावा लागेल म्हणून? तरीही कामापुरता पैसा जमविण्यासाठी हा घे…‘‘ असे म्हणत भाऊंच्या मास्तरांनी एक

कटोराभाऊंच्या हातात दिला आणि त्या कटो­याने इतिहास घडविला. भाऊ मास्तरांच्या

कटोराचिन्हावर शिक्क्यांचा अक्षरशः पाऊस पडला….

नागेश शेवाळकर, पुणे (९४२३१३९०७१)

 

Leave a Reply

Close Menu