कर्नाटकातील सागरकिनाऱ्यावरील यक्षगान मराठी भाषेत

दशावतार! राबणाऱ्या माणसांची लोककला! सुंदर परंतु तितकाच रांगड्या अभिनयासह लोककलेच्या साऱ्या छटांसहित प्रकट होणारा, अत्यंत लोभसवाणा वाटावा असा लोकरंगभूमीवरील एक खेळ होय. खेडोपाडीच्या कष्टकरी, श्रमजीवी माणसांच्या संस्कृतीतून उदयाला आलेली, माणसाच्या अंगी असलेल्या शक्ती, बुध्दी अन्‌ दुर्दम्य इच्छाशक्ती यांचा पुरस्कार करणारी ही कला होय. सत्याचा जय व असत्याचा पराजय हे दशावताराचे मुख्य सूत्र! लहानथोर, गरीब-श्रीमंत, जातपात इत्यादी संकुचित विचारांना इथे थारा नाही. शास्त्री-पंडितांनी पोथ्या-पुराणातील दाखले द्यावेत, त्यातील आख्याने उलगडून दाखवावीत, आपले विचार मांडावेत आणि हे सारे दशावताराला आपल्या सादरीकरणासाठी योग्य व पोषक वाटले तर तेही स्वीकारावेत अशी ही परंपरा! शतकानुशतके चाललेला हा प्रवास होय!

      उत्स्फूर्त संवाद हेच दशावताराचे प्रमुख वैशिष्ट्य! रंगभूषाकार, वेशभूषाकार आणि आपली भूमिका रंगस्थळी सादर कशी करावी यासाठी सूचना देणारा दिग्दर्शक या कशाचीच आवश्‍यकता दशावतारी कलाकारांना नसते. तंत्राचा-नेपथ्याचा अवडंबर नसतो. रंगस्थळी मध्यभागी ठेवलेले एक बाकडे हीच काय ती दशावतारी नाटकाची प्रॉपर्टी! राजाचा महाल, लतावेलींनी बहरलेले उद्यान, इंद्राचा दरबार, युध्दभूमी इत्यादी सारे काही केवळ आपल्या संवादातून व्यक्त करीत त्याचा आभास प्रेक्षकांच्या नजरेसमोर उभा करण्याची ताकद त्यांच्याठायी असते. पायपेटी, पखवाज किंवा तबला आणि झांज (टाळ) ही संगीतासाठीची वाद्ये! सारे कसे साधे, सुटसुटीत, सहज उपलब्ध होईल असे! रामायण, महाभारत अथवा विविध पुराणांतर्गत कथानके वा घटनाशी प्रामाणिक रहात निरीक्षण, अनुकरण व बुजूर्ग कलाकारांच्या सूचना याआधारे दशावतारी कलाकार योग्य त्या तपशीलासह आपले संवाद सादर करतो. तेही उत्स्फूर्तपणे ! त्याला जोड मिळत जाते अस्सल अभिनयाची! म्हणूनच दशावतारी खेळाला साचेबंदपणा न येता त्या कलाकृती जिवंत वाटतात. त्यांचा प्रत्येक खेळ त्याअर्थी प्रयोग ठरतो. भले कुणी त्याला प्रायोगिक, समांतर इत्यादि बिरूदे न लावेना का!

      देव-दानवांची भव्य सृष्टी रंगस्थळी निर्माण करण्याची व त्यातून भाविक प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला दिव्यलोकाकडे घेऊन जाण्याची किमया जशी दशावतारात आहे तशी ती कर्नाटकातील सागर किनाऱ्यालगतच्या प्रदेशातील यक्षगानातही आहे. दशावतार नि यक्षगानाची सैध्दांतिक बैठक एकच आहे. संवादातील उत्स्फूर्तपणा, अभिनयातील रांगडेगणा, तंत्र-मंत्र-नेपथ्य इतत्यादिचा वापर न करण्याचा अट्टाहास जे दशावतारात आहे तसेच यक्षगानातही दिसून येते. दशावतारातील कलाकार स्वतःच रंगभूषा नि वेशभूषाकार असततो. तोच दिग्दर्शक नि लेखकाचीही भूमिका पार पाडतो. हे जे काही आहे ते दशावतारात नि यक्षगानात सारखेच असते.

      तर मग फरक आढळतो तरी कुठे? तो आढळतो यांच्या रंगभूषा नि वेशभूषेत! दिसून येतो त्यांच्या नृत्य व संगीतात. इंद्रधनुष्याचे सारे उत्कट व गहिरे रंग यातून साधलेली रंगभूषा नि वेशभूषा हे आहे यक्षगानाचे वैशिष्ट्य! गायन व वादन हा तर यक्षगानाचा प्राण तर नृत्य त्याचा आत्मा होय! कर्नाटकी, हिंदुस्थानी व काहीसे अपरिचित परंतु खास यक्षगान शैलीचे गायन ही त्याची खासियत. अभिनयाला पोषक असे हे अभिनेय संगीत असते.

      स्वतंत्र असे यक्षगानाच्या पठडीतील नृत्य हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय. उत्कट अभिनेय संगीत, कथानकाशी सुसंगत असे नृत्य, इंद्रधनुष्याच्या रंगाशी स्पर्धा करणारी रंगभूषा व वेशभूषा, उत्स्फूर्त संवादाला साजेशी अभिनयशैली व देहबोली असा हा यक्षगानाचा माहोल असतो.

      यक्षगानातून दशावतार का दशावतारातून यक्षगान अशासारखे प्रश्‍न इथे उद्भवतच नाहीत. प्रत्येक लोककला एखाद्या भूप्रदेशाच्या अस्मितेतून तिचा रंग-गंध लेवूनच उदयाला येत असते. तिथल्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक नि सांस्कृतिक परिस्थितीनुरूप तिचे रंग-रूप ठरत असते. या दोन मिन्न भूप्रदेशातील लोककला संपूर्णतः स्वतंत्र होत.

      अशा या यक्षगानाचा मराठी भाषेत प्रयोग करण्याचा प्रयत्न सावंतवाडीचे एक निवृत्त प्राध्यापक विजयकुमार फातर्पेकर आणि उडुपीच्या ‘यक्षसंजीव यक्षगान केंद्रा’चे प्रमुख आचार्य संजीव सुवर्णा करीत आहेत. पाचशे वर्षांपूर्वीची कन्नड कवी देवीदास याची काव्य रचना असलेले व गुरू संजीव सुवर्णा यांनी शब्दबध्द केलेल्या महाभारतातील एका अत्यंत महत्त्वाच्या कथानकावर आधारित आख्यान ‘चक्रव्यूह’ मराठी भाषेत अनुवादीत केले आहे प्रा. फातर्पेकर यांनी. गुरू संजीव सुवर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या यक्षगान केंद्राचे कन्नड भाषिक कलाकार हे आख्यान संपूर्ण मराठी भाषेत सादर करतील मे महीन्याच्या 11, 12 आणि 13 तारखेस अनुक्रमे सावंतवाडी, वेंगुर्ला व आंदुर्ले या ठीकाणी. कर्नाटकातील सागरकिनारी प्रदेशातील यक्षगान ही लोककला प्रथम त्यानिमित्ताने सादर होईल महाराष्ट्रातल्या सागर किनाऱ्यावरील आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. दोन भिन्न भाषिक प्रदेशातील लोककलांच्या संदर्भात ही एक अपूर्व पर्वणी ठरणार आहे.

Leave a Reply

Close Menu