गीता खरोखर मानसोपचार देते का?

माझ्या एका भाषणात मी म्हणालो, “सर्वात जुना नोंदवून (लिहून) ठेवलेला मानसोपचार म्हणजे भगवद्गीता आहे!“ हे मत श्रोत्यांना सहज पटल्याचे किंबहुना मी सांगण्यापूर्वी देखील त्यांना ते माहित असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील भावांवरून माझ्या लक्षात आले. पण खरा प्रश्‍न उद्भवला तो व्याख्यानाची औपचारिकता संपल्यावर मी सभागृहातून बाहेर निघताना. एक श्रोता मला बाजूला घेत म्हणाला, “भगवद्गीता हा सर्वात जुना नोंदवला गेलेला मानसोपचार आहे, हे कबूल. पण खरंच तो व्यवहारात उपयोगी पडणारा मानसोपचार आहे का? तुम्ही कधी भगवद्गीतेतील तत्त्वे घेऊन मानसोपचार दिले आहेत का?“

      त्याच्या या प्रश्‍नासाठी त्यावेळेस माझ्याकडे स्पष्ट उत्तर नव्हते. मी त्या आधी जाणीवपूर्वक भगवद्गीतेतील तत्त्वे घेऊन, फक्त त्यांचाच उपयोग करून मानसोपचार दिले नव्हते.

      खरं म्हणजे कल्चर ओरीएंटेड सायकोथेरपीमध्ये याचा अंतर्भाव होतो, हे मी माझ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकलो होतो. पण त्याचा मानसोपचार म्हणून अभ्यास मात्र मी केला नव्हता. त्या श्रोत्याच्या प्रश्‍नाने मला तसा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.

      गंमत म्हणजे गीतेचा अभ्यास मानसोपचारांच्या दृष्टीने आपण केला पाहिजे, याची तीव्र जाणीव मला त्याआधी अनुभवाला आलेल्या दुसऱ्या एका प्रसंगाने झाली होती. काही वर्षांपूर्वी मी एका कॉलेजात समुपदेशक म्हणून जात असे. तिथे अनेक विद्यार्थी त्यांच्या भावनिक समस्या घेऊन येत. कधीकधी तिथले प्राध्यापक गप्पा करायला येऊन बसत. एकदा एक प्राध्यापकबाई आल्या आणि म्हणाल्या, “डॉक्टर, आज मी तुमच्याकडे पेशन्ट म्हणून आलेय. तसे मी स्वतःच स्वतःला काऊनसेलिंग करत असते. त्यासाठी मला भगवद्गीतेचा मोठा आधार मिळतो. मला त्रास वाटला की मी गीता वाचते.“

      प्राध्यापकबार्इंच्या या सांगण्याने मला त्यांचे कुतूहल वाटले. त्यांना सध्या त्रास देणारी समस्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्यांना प्रश्‍न केला. त्यावर त्या म्हणाल्या, “या कॉलेजमध्ये जॉईन झाल्यापासून माझ्यावर अन्याय होत आला आहे. मी गणित शिकवते. मी त्यात पीएच.डी. घेतली आहे. आमच्या गणित विभागात आणखी एक प्राध्यापक आहेत. त्यांच्यापेक्षा माझे क्वालिफिकेशन जास्त आहे. म्हणजे मी त्यांच्यापेक्षा सिनीयर आहे. असे असून सुद्धा मला आठवड्याला एकोणीस लेक्चर्स घ्यावी लागतात आणि त्यांना मात्र सतराच लेक्चर्स दिली आहेत!“

      त्यांची समस्या ऐकून मला जाम हसू आले. पण मी ते दाबले. त्या जे काही समस्या म्हणून बोलत होत्या, त्याला गीतेतून त्यांना काय आधार मिळत होता हेच मला समजेना.

      मूळात त्या शिक्षक होत्या. शिकवणे हा त्यांचा स्वधर्म होता. आपले शिकवणे कसे उत्तम होईल जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचे चांगले आकलन होईल यासाठी त्यांच्या मनात चिंतन चालायला हवे होते. त्यांना विद्यार्थ्यांसोबत जास्त वेळ मिळतोय, याचा आनंद व्हायला हवा होता. शिवाय शिकवण्यात सृजनशीलतेचा आनंद असतो तो त्यांना अनुभवता यायला हवा होता. शिकवणे हे यंत्रावर कामगाराने काम करावे यासारखे एकसुरी निरस काम नसते. त्यामुळे एखाद्या कामगाराने मला जास्त वेळ काम करून घेतले जातेय असे म्हणणे आणि एका शिक्षकाने मला जास्त लेक्चर्स देण्यात आलीत असे म्हणणे, यात जमीनआस्मानाचा फरक आहे. एखादा यंत्रावर एकसुरी काम करावे लागलेल्या कामगाराने जादा वेळेचे काम हा आपल्यावर अन्याय आहे, असे म्हणणे आणि त्या अन्यायाविरुद्ध जाब विचारण्यासाठी किंवा सनदशीर मार्गाने लढण्यासाठी गीतेकडून प्रेरणा मिळवणे पटण्यासारखे होते. पण त्या बाई आपल्या स्वधर्मपासून दूर जाण्यासाठी गीतेकडून कशी प्रेरणा मिळवत होत्या हे माझ्यासाठी कोडे होते.

      त्या प्राध्यापकबार्इंच्या तक्रारीवर विचार करताना मला बाबांची आणि माझी खूप वर्षांपूर्वी झालेली चर्चा आठवली. मी नुकताच एमबीबीएसची परीक्षा पास होऊन इंटर्नशिप करू लागलो होतो. माझे एमबीबीएसचे शिक्षण कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात झालेले, पण मी इंटर्नशिपसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय निवडले होते. तिथे मी वगळता, सर्व इंटर्न गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचेच विद्यार्थी होते.

      एक दिवस मी हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर वैतागत बाबांना म्हणालो की “आज टाईमटेबल ठरवताना मला जादा ड्यूटी देण्यात आल्यात. आणि इतरांनी स्वतःसाठी कमी ड्यूटी ठेवल्यात.“

      बाबा म्हणाले, “समजा तिथे इंटर्नची संख्या कमी असती, तरीदेखील तुला जास्त ड्यूट्या आल्या असत्या ना? जादा ड्यूटी करण्यासाठी तुझी शारीरिक क्षमता आहे की नाही?“

      मी म्हणालो, “हा. इंटर्नची संख्या कमी असती तर मग मी जादा काम केलेच असते ना. पण आता हा अन्याय आहे.“

      “समजा, मी किंवा तुझी आई आजारी पडलो आणि सेवा करायची पाळी तुझ्यावर आली तर तू कोणी किती वेळ सेवा करायची यासाठी तुझ्या बहीणीशी भांडणार का?“ त्यांनी विचारले.

      “छे छे. तुम्ही आजारी पडलात तर मी तुम्हाला सोडून अजिबात बाजूला जाणार नाही. मीच तुमची सेवा करणार!“ मी म्हणालो.

      “आईवडीलांच्या सेवेसाठी तू व्यवहार बघणार नाहीस. तिथे तुला इतर कोणी वाटेकरी व्हावे की नाही याची पर्वा असणार नाही. आईवडीलांनी लवकर बरे व्हावे, एवढाच ध्यास तुला असेल. मग हीच तुझी भावना इतर पेशंटबाबत का येत नाही तुझ्या मनात?“

      “कारण तुम्ही माझे आहात, हॉस्पिटलमधील पेशंट माझे कोणी नाहीत म्हणून!“ मी पटकन बोलून गेलो.

      “हाच माया आणि दया यातील फरक आहे. तुला माझ्याविषयी किंवा तुझ्या कोणत्याही नातेवाईकाविषयी जो जिव्हाळा वाटतो, ती माया आहे. हा जिव्हाळा मी व माझे या भावनेचा परिणाम आहे. पण जे लोक तुझे कोणीही नाहीत. ज्यांचा तुझा काहीही संबंध नाही, अशा लोकांची सेवा करणे ही दया असते. अध्यात्मिक माणसाने दयावान असले पाहिजे.“

      बाबांनी हे बोलताच मला गोदावरीच्या वाळवंटात भर दुपारच्या रणरणत्या उन्हात रडत असलेले महाराचे मूल उचलून घेणारे संत एकनाथ आठवले.

      “आपले वर्तन दयामय होण्यासाठी गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सिद्धांत मनात पक्के रुजवले पाहिजेत,“ ते म्हणाले.

      विनोबांच्या गीता प्रवचनांतून हे सिद्धांत मला माहीत झाले होते. शरीर नश्‍वर आहे, आत्मा अमर आहे आणि स्वधर्म अबाध्य आहे, हे ते तीन सिद्धांत.

      “आपल्याला होणारे दुःख मायेत अडकल्यामुळे होते. मी व माझे केंद्रीत विचार केल्यामुळे होते. माझा त्याने अपमान केला, म्हणून मला राग येतो. माझे बाबा आजारी आहेत म्हणून मला टेन्शन येते. माझा नातेवाईक दोषी आहे, त्याच्याविरोधात तक्रार कशी करू, असा विचार येतो. हे मी व माझे म्हणजे नक्की कोण? कोणाच्या संदर्भात मी? देहाच्या (किंवा मनाच्या) संदर्भात की माझ्यातील जीवंतपणाच्या संदर्भात? याचे उत्तर अर्थातच मी म्हणजे माझा देह व मन असते.

      पण भगवान कृष्ण म्हणतात, शरीर (मन) हे नश्‍वर आहेत. नाहीसे होणारे आहेत. काही वर्षापूर्वी तुझा देह नव्हता, आणखी काही वर्षांनी तो नसेल. हे स्वप्नासारखेच नाही का?“

      “स्वप्नासारखे कसे? स्वप्न हे खोटे असते. तसे जीवन तर खोटे नसते ना?“ मी विचारले.

      “स्वप्नात असताना तुला ते स्वप्न आहे किंवा खोटे आहे, असे कधी वाटले होते का? पण स्वप्नात तू भीती, राग, आनंद अनुभवला असशील आणि जागे झाल्यावर कधी कधी स्वप्नात अनुभवलेल्या गोष्टींवर रेंगाळला असशील. तुझे स्वप्न काही मिनीटांचे असेल आणि तुझे जीवन साठ-सत्तर वर्षांचे असेल. मृत्यूसोबत जीवनदेखील विरून जाते, अगदी स्वप्नासारखे. तुझे शरीर बदलत असते. मनदेखील बदलत असते, बुद्धी देखील बदलत असते. पण एकच गोष्ट तुझ्यातील बदलत नाही,“ ते म्हणाले.

      “कोणती?“

      “तुझ्यातील जीवंतपणा! लहान असताना जितके जीवंत आपण होतो, तितकेच आताही आहोत. बदलणारी गोष्ट म्हणजे आपण की स्थिर राहिलेली गोष्ट म्हणजे आपण?“

      “स्थिर असलेली गोष्ट आपण!“ मी म्हणालो.

      “म्हणजेच जीवंतपणा आपण! जीवंतपणा म्हणजे जर आपण असू तर देहाला किंवा माझ्या मनाला त्रास झाला तर तो मला झालेला त्रास आहे असे वाटेल का? शरीराला वेदना होईल, पण ती माझी असणार नाही. कोणीतरी अपमान करेल, पण तो माझा असणार नाही,“ बाबा म्हणाले.

      “हे मी कितीदा तरी ऐकलेय. पण या विचाराने माझ्यात बदल झालेला नाही,“ मी म्हणालो.

      “शरीरात बदल होण्यासाठी नियमीत व्यायाम करावा लागतो. तसेच मनात बदल होण्यासाठी हे विचार मनात पक्के रूजवावे लागतील. ते रुजवण्याची प्रक्रीया चालवावी लागेल. ज्यांच्या मनात हे ज्ञान रुजते, ते कोणत्याही परिस्थितीत मनःशांती अनुभवतात,“ ते म्हणाले.

      “हे संन्यस्त लोकांना सोपे होईल. पण जे संसारात आहेत, ज्यांच्या भोवती चॅप्टर लोक आहेत, त्यांना कठीण आहे,“ मी म्हणालो.

      “संत एकनाथ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हा माणूस फक्त पुजाअर्चा, ध्यान धारणा एवढेच करत नव्हता. त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनात अस्पृश्‍यतेला आव्हान देऊन समाजाचा रोष जाणीवपूर्वक ओढवून घेतला होता. ही गोष्ट चारपाचशे वर्षापूर्वीची आहे. त्याकाळात असे धाडस करणे म्हणजे रोजच संकटांना आमंत्रण देणे. समाजाचा रोष ओढवून घेतलेल्या नाथांनी क्रोधाला जिंकले होते. एक दिवस एक माणूस त्यांच्यावर मुद्दाम थुंकत राहिला आणि ते न चिडता गोदावरीत आंघोळ करत राहिले. शेवटी थुंकणाऱ्यालाच पश्‍चाताप झाला. नाथांसारखी स्थितप्रज्ञ अवस्था कशी प्राप्त करावी हे गीता शिकवते.

      जेव्हा मी म्हणजे नश्‍वर शरीर नव्हे, मी म्हणजे न बदलणारा आत्मा (जीवंतपणा) आहे, हे पटते तेव्हा व्यवहार हा स्वधर्माचा होतो. आणि स्वधर्म पाळत राहिल्यास स्थितप्रज्ञ अवस्था येते. शरीर (व मन) ही स्वधर्म पाळण्याची यंत्रे आहेत.

      पेशंटवर उपचार करणे हा तुझा स्वधर्म आहे. तो तुला जितका अधिक बजवायला मिळेल तितके तू स्वतःला भाग्यवान मानले पाहिजेस.

      स्वधर्म पाळणे हे नेहमीच सोपे असते असे नाही. यांत्रिक पद्धतीने आपण विचार करू लागलो तर फसण्याची शक्यता असते. उदाहरण देतो. लढणे हा क्षत्रियाचा स्वधर्म आहे, एवढेच म्हणणे पुरेसे नाही. कोणाच्या बाजूने लढणे, हे तितकेच महत्त्वाचे आहे. नाहीतर दुर्योधन, दुशासन हे देखील त्यांचे स्वधर्म पालन करत होते, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे गीतेचा अर्थ उथळपणे आपण घेतला तर कोणत्याही निषिद्ध कर्माला देखील आपण स्वधर्म म्हणू शकू.“

      भगवद्गीतेचे सिद्धांत जर विचारांचा भाग बनवले, तर ते आत्यंतिक दुःख निवृत्ती, चिदानंद प्राप्ती घडवून आणू शकतात. फक्त त्यासाठी सतत व नियमीतपणे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. एरिक फ्रॉमच्या भाषेत सांगायचे तर त्यासाठी झोकून देऊन मेहनत करायला हवी. मनःशांतीच्या ध्येयापलिकडे ऐहीक जगातील दुसरे काहीच महत्त्वाचे वाटू नये!

-डॉ. रुपेश पाटकर, मो. 9623665321

Leave a Reply

Close Menu