राजश्री परुळेकर-सामंत

सिंधुदुर्ग म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला आणि भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण असणारा जिल्हा. इथल्या रूढी-परंपरांनी आणि सांस्कृतिक संचितातून या जिल्ह्याचे वेगळेपण लक्षात येणारे. अरबी समुद्राचे सानिध्य, उंच डोंगर दऱ्या, वन्यजीवांनी समृद्ध असलेले प्रदेश यामुळे भौगोलिकदृष्ट्या अनेक आपत्तींना तोंड देत असताना या जिल्ह्याने महापूर, वादळे, भूकंप, त्सुनामी, हत्ती-गवेरेडे यांचा वावर आणि कोरोना महामारी यासारख्या आपत्तींना सक्षमपणे तोंड दिलेले आहे. अशा आपत्तींना सक्षमपणे तोंड देण्यासाठी जनतेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री परुळेकर-सामंत (9834385792) यांनी कर्तव्यदक्षपणे आणि आश्‍वासक असे काम केलेले दिसून येते. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने त्यांच्या कार्याचा मुलाखतीच्या माध्यमातून घेतलेला आढावा…

परिचय/शिक्षण- राजश्री दत्तात्रय परुळेकर-सामंत, प्राथमिक शिक्षण- जि. प. शाळा, वेताळ बांबर्डे, 5वी ते 12वी – श्री शिवाजी हायस्कूल, पणदूर, बी.ए. (इंग्लिश)- संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, एम्‌.ए. (इंग्लिश)- कणकवली कॉलेज, एम.एस.डब्ल्यू- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे Post Graduate Diploma in Disaster Management, Fire Safety – मुंबई विद्यापीठ

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून आपण उत्कृष्टपणे काम करीत आहात, यासाठी आपणाला नेमकी उर्जा कशी मिळाली?

      आपले महाविद्यालयीन जीवन किती समृद्ध आहे यावर आपली पुढील वाटचाल अवलंबून असते असे मला वाटते. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब कुडाळ यांच्या माध्यमातून प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी जिज्ञासा नावाचे कुमारवयीन मुलांसाठी अभियान सुरू केले होते. त्यातूनच संवाद बना या कार्यक्रमातून शालेय मुला-मुलींना मार्गदर्शन करणारी तिन दिवसांच्या कार्यशाळेत आमचे मार्गदर्शक प्रा. श्रीकांत सावंत, डॉ. शरयू आसोलकर यांच्या प्रेरणेतून आम्ही सहभागी झालो. महाविद्यालयीन जीवनात आम्ही सामाजिक उपक्रमांसाठी झपाटलेल्याप्रमाणे काम करत होतो. अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ, आगरकर विचार चळवळ, राष्ट्रसेवादल, सानेगुरुजी विचारमाला अशा उपक्रमांतून आमचे सामाजिक विचारांना खतपाणी मिळत गेले. इतर महाविद्यालयीन युवाई मौजमस्तीत दंग असताना आम्ही मात्र नरेंद्र दाभोलकर, मेघा पाटकर, बाबा आढाव, ॲड. देवदत्त परुळेकर, श्रीकांत देसाई, डॉ. रुपेश पाटकर अशा थोर व्यक्तींच्या सहवासातून सामाजिक उपक्रम राबवत होतो. यातून समाजाला परिवर्तन करत असताना स्वतःमध्ये परिवर्तन करायला आम्ही शिकलो. किंबहुना तशी आम्हाला या थोर विचारांच्या माणसांसोबत राहिल्याने शिकवणच मिळाली.  आपण कोणाचे शोषण करायचे नाही आणि कोणाचे शोषण होऊ द्यायचे नाही हा विचार आज सामाजिक कार्य करताना दिशादर्शक ठरला.

आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करण्याअगोदर आपण जनशिक्षण मध्ये कार्यरत होता त्याविषयी…

      जनशिक्षणमध्ये मी 7 फेब्रवारी 2005 ते 30 सप्टेंबर 2012 दरम्यान कार्यरत होते. सामाजिक विचाराने भारलेली जनशिक्षण संस्थेने मला खूप काही दिले. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि उमा प्रभू यांची झपाटून काम करण्याची वृत्ती मला दिशादर्शक ठरली. उमा प्रभू मॅडम यांनी जनशिक्षण संस्थेची प्रतिनिधी म्हणून अनेक ठिकाणी काम करण्याची संधी दिली. स्वतः घडवण्यासाठी जनशिक्षण माझ्यासाठी उत्तम व्यासपीठच ठरले.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून सुरुवातीच्या काळातील अनुभव कसा होता?

      मी 11 सप्टेंबर 2012 साली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून रूजू झाले. सुरूवातीचा काळ हा अतिशय आव्हानात्मक असाच होता. सुरूवातीला सोबत स्टाफ नव्हताच. अशावेळी सगळी कामांची पूर्तता करावी लागत असे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 हा सर्वांसाठी नवा होता. जनमानसात जागरुकता नव्हती. लोकांच्या खूपच जास्त अपेक्षा होत्या. 2006 पासून या कायद्याअन्वये पदनिर्मिती सुरू झाली. सुरूवातीला प्रकल्प व्यवस्थापक म्हणून पं.बंगाल मधील बिनोधर बारी यांची निवड करण्यात आली होती. एवढा आपत्ती व्यवस्थापन विषय आपणासाठी नवखा होता. अभ्यासक्रामातही नव्हता. मी अनेक अनुभवांतून शिकत गेले. प्रत्येक सरकारी अधिकारी यांनी काम करताना आपणावर समाजाने दिलेली जबाबदारी किती मोठी आहे याची जाणीव करून घेतली की आपोआपच सर्व कामं सुव्यवस्थित होतात हे निश्‍चित.

आपत्ती व्यवस्थापन प्रमुख उद्देश काय?

      आज राज्य आणि केंद्र सरकार आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रचंड सजग झालेले आहे. शून्य जीवीत हानी हे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच कमीत कमी हानी कशी होईल यासाठी शासन कायम प्रयत्नशील आहे. शासन मनुष्यबळ, संसाधने याकडे काटेकोर लक्ष देत आहे. त्यामुळे काम करणे सुखावह होत आहे.

नागरिक आणि मिडिया संबंधी आपण काय सांगू शकाल?

      आपत्ती व्यवस्थापनात शासनासोबत नागरिकांचीही मोठी जबाबदारी असते. आपत्तीमध्ये स्वसंरक्षणासाठी त्यांनी धडे घेतले पाहिजेत. एखाद्या आपत्तीमध्ये नागरिक आधी पोचत असतात. मिडियाची सुद्धा मोठी जबाबदारी आपत्ती व्यवस्थापनात आहे. त्यामुळे त्यांनी वृत्तांकन करताना चूकीच्या पद्धतीने होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात कॉल येतो की सावंतवाडी येथे रस्त्यावर झाड पडले आहे. अशा वेळी समन्वय साधून सार्वजनिक बांधकाम यांना सूचना करून ते झाड बाजूला काढले जाते. मात्र यामध्ये कधीतरी बातम्या यायच्या की आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोचली नाही किंवा निकामी झाली. सुरूवातीच्या काळात अशा नकारात्मक बातम्या यायच्या. पण त्यावर हळूहळू काम करून आज मिडियाचे सुद्धा चांगले सहकार्य मिळत आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून राजकीय हस्तक्षेप कधी अनुभवता आला का?

      आपला हेतू शुद्ध असेल तर कोणीही काही करू शकत नाही. आपणाकडे असलेली पूर्ण माहिती मी कायमच देत आलेली असल्याने असा कधी प्रसंग आला नाही. आज सर्वच राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. अनेक राजकीय नेते, सभापती, सरपंच, राजकीय पदाधिकारी अनेक विषय घेऊन भेटत असतात. कधीकधी अपुऱ्या माहितीमुळे उद्वीग्न झालेल्या राजकीय व्यक्तींना परिपूर्ण माहिती देऊन शंका समाधान केल्यास कोणतेही वाद निर्माण होत नाहीत हा माझा स्वानुभव आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून असा एखादा प्रसंग सांगा की जो संघर्षमय होता.

      कोरोनाचा काळ अतिशय संघर्षाचा काळ होता. कोरोना हा आरोग्याशी संबंधित असला तरी गर्दी थोपविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करणे गरजेचे होते. त्यामुळे तो कायदा लागू झाल्याने जबाबदारी वाढली होती. सकाळी 8 ते रात्रौ 12 पर्यंत काम चालू असायचे आणि घरी येऊनही त्या कामाचा आढावा घ्यायचा, फोन अटेंड करा, बॉर्डरवरील स्थिती अवलोकन करा अशी कामे सतत सुरू असायची. खरोखरच ते दिवस, तो काळ सर्वांसाठी कठीण होता. आम्ही तर अगदी अग्निदिव्यातून बाहेर पडलो.

      2019 चा महापूरसुद्धा अतिशय आव्हानात्मक असा होता. एनडीआरएफच्या टीमला सुद्धा येताना हवाई मार्गाने यावे लागले. बोटी कमी पडत होत्या. तो महापूर अतिशय आव्हानात्मक होता. तोक्ते चक्रीवादळ आणि त्यात कोरोना महामारी हा पण काळ आमच्यासाठी आव्हानात्मक होता.

लोकांकडून काय अपेक्षा सांगता येतील?

      अनेक ट्रेनिंग प्रोग्राम घेताना लोकांशी थेट संबंध येत असतो. लोकांनी सजग होण्याची गरज आहे. वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक आपत्ती कधीही उद्भवू शकते. त्यामुळे जेव्हा जेव्हा कुठेही संधी मिळेल त्यावेळी लोकांनी आपत्ती व्यवस्थापन बाबत शिकून घेतले पाहिजे. आपत्तीमध्ये काय करायला पाहिजे, प्राथमिक उपचार काय करता येईल हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. प्रत्येक ग्राम स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण झाले पाहिजे. हा विषय जेव्हा तळागाळात जाईल तेव्हा आपत्तीमधून होणारे नुकसान कमी करता येईल.

      प्रशासन जर सांगत असेल की पूर येणार, घर सोडा तर लोकांनी ते पाळले पाहिजे. कारण जीव वाचला तर अनेक घरे बांधता येतील. नवीन पिढीने या विषयाशी संबंधित अधिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांनी होणारी हानी टाळण्यासाठी पुढे येऊन प्रशासनाकडे विविध प्रशिक्षणांची मागणी केली पाहिजे. तसेच जिल्ह्यातील जी तरुण मंडळं आहेत त्यांनी किमान आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यक्रम घेतले पाहिजेत अशी अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील एनजीओ कडून काय अपेक्षा आहेत?

      आपल्या जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनावर काम करणारी हाताच्या बोटावर मोजणारी मंडळे आहेत. मालवण आपत्कालीन ग्रुप, संतोष पालेकर आणि ग्रुप, बाबल आल्मेडा ग्रुप, अशी काही मंडळे विना मोबदला काम करत असतात. एनजीओ पण आपल्याकडील ज्ञान अपटेड करीत राहिले पाहिजे आणि जे एनजीओ सक्षम आहेत त्यांनी लहान मंडळांना मार्गदर्शन करुन त्यांना या प्रवाहात आणले पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या एनजीओचा भविष्यात जिल्हा स्तरावर महासंघ होण्याची आवश्‍यकता आहे.

या कार्यासाठी कुटूंबाकडून कसे सहकार्य मिळाले?

      निश्‍चितच! मला सदैव माझ्या कुटूंबाकडून सहकार्य मिळत आले आहे. माझे पती, माझ्या दोन्ही मुलांचे सहकार्य असल्यामुळे मला अत्यंत जोखमीच्या पदासाठी न्याय देता आला. माझी सासू हयात असताना मला त्यांचे सहकार्य होते. आमचे कुटुंब संवादात्मक असल्याने काम करताना कोठेही अडचण आली नाही.

मुलाखत शब्दांकन- सचिन परुळकर, मो. 9421238053

Leave a Reply

Close Menu