श्‍वेता बर्वे

 8 मार्च जागतिक महिला दिन. विविध क्षेत्रात विशेष कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांना या महिला दिनाच्या निमित्ताने सन्मानित करण्यात येते. समानतेच्या या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा सिद्ध करत आहेत. अशीच एका पेटंट मिळवण्यापासून ते सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आपल्या सभोवतालच्या समाजाला उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करुन देणाऱ्या या ध्येयवेड्या युवतीचा हा प्रवास.

      तळकट, दोडामार्ग तालुक्यातील एक खेडेगाव. नारळी-पोफळी-केळी यासारख्या विविध वनराईने समृद्ध असलेलं गाव. याच गावातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व कु. श्‍वेता श्रीनिवास बर्वे (9403756447). सुपारीच्या म्हणजेच पोफळीच्या विरीपासून चप्पल बनविताना उद्योजकतेकडे केलेली तिची वाटचाल-

      सुपारीच्या किंवा पोफळीच्या अगदी दुर्लक्षित अशा टाकावू, जळावू वस्तूपासून तू चप्पल तयार करुन त्याचं पेटंटही मिळवलंस. तुझा वेगवेगळ्या ठिकाणी सत्कारही करण्यात आला. तुझ्या या उज्ज्वल यशाबद्दल तुझं मनापासून अभिनंदन!

प्रश्‍न – सर्वप्रथम तुझा परिचय.

उत्तर – माझं नाव श्‍वेता श्रीनिवास बर्वे. रा. तळकट, ता. दोडामार्ग. माझं प्राथमिक पहिली ते चौथी पर्यंत तळकट येथील प्राथमिक शाळेत, त्यानंतरचं पाचवी ते दहावी खेमराज हायस्कूल, बांदा इथे तर अकरावी, बारावी गोव्यातील पेडणे तालुक्यातील हायर सेकंडरी स्कूलमध्ये झाली. पुढची पदवी मी एस.पी.के. कॉलेज, सावंतवाडी इथे घेतली. सध्या मी गोव्यातील एका ऑरगॅनिक फर्टीलायझर कंपनीत डीलर पार्टनर म्हणून काम करतेय. माझ्या शिक्षणाचा आणि ह्या पेटंटचा तसा काही संबंध नाही असं मी म्हणेन.

प्रश्‍न – पोफळीच्या विरीपासून चप्पल करायची ही कल्पना तुला कशी सुचली?

उत्तर – माझ्या मापाची चप्पल मला बाजारात सहजासहजी कधीच मिळत नसे ती मिळण्यात मला नेहमीच अडचण यायची. त्यामुळे पंचाईत व्हायची. आजूबाजूला पोफळीच्या बागेत पडलेल्या विऱ्या माझ्या बघण्यात होत्या, त्यामुळे मधल्या लॉकडाऊनच्या काळात मला कल्पना सूचली की या विऱ्यांची चप्पल बनवता आली तर.. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ असं म्हटलं जातं. त्याप्रमाणेच मला चप्पलची गरज होती व माझ्या साईजची चप्पल सहज मिळत नाही हेही डोक्यात कुठंतरी होतंच. मग माझी गरज भागवण्यासाठी मी चप्पल तयार करुन बघितली. घरातल्या घरात घालूनही बघितली.

प्रश्‍न – त्यासाठी हवी असलेली माहिती तू कुठून आणि कशी मिळवलीस?

उत्तर – सुरुवातीला मला जसं सूचत गेलं तशी मी ती बनवली. मदत अशी सुरुवातीला कुणाचीही घेतली नाही, किंवा घ्यावीशी वाटली नाही. माझ्या कल्पनाशक्तीच्या जोरावर मी ही विरीपासूनची चप्पल बनवली. पण आता जो माझा फायनल असा प्रोटोटाईप बनला आहे तो गुगलच्या मदतीनं असं मी म्हणेन कारण गुगलच आज सगळ्यांचा गुरु झाला आहे.

प्रश्‍न – तुला त्या विरीपासून प्लेट, द्रोण यासारख्या वस्तूंऐवजी चप्पलच का बनवावीशी वाटली, याबाबत काही सांगू शकशील?

उत्तर – खरं सांगायचं तर मला असं विरीपासून काही बनवायचं होतं असं काही टार्गेट नव्हतं किंवा हे माझं ध्येय नव्हतं. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे माझ्या साईजच्या चप्पला मिळत नाहीत हाच माझा खरं तर मुख्य प्रश्‍न होता. म्हणून मी मग माझ्या आजूबाजूच्या बागेतून पडलेल्या, दुर्लक्षित असलेल्या अशा विरीपासून मला हवी तशी चप्पलच बनवता आली तर अशी माझ्या डोक्यात कल्पना आली. स्वतःला हवी तशी चप्पल हवी तर आपणच कुठंतरी काहीतरी करायला हवं हेच मनाशी ठरवलं होतं. त्यातूनच मग विरीपासून इतर काही वस्तूंऐवजी चप्पलच तयार करायचं नक्की केलं.

प्रश्‍न – तुला ही विरीची चप्पल तयार करण्यामागे प्रेरणा कुणाची होती किंवा कुणी दिली?

उत्तर – मला स्वतःलाच आर्ट ॲन्ड क्राफ्टची खूप आवड आहे, त्यामुळे मी त्यातून काही ना काही बनवत असते. तसंच स्टोन पेंटिंगमधून, पेपर क्विलींगमधून विविध वस्तू बनविणे, कानातली स्टॉकिंगची फुलं बनविणे, भरतकाम अशा बऱ्याच गोष्टींची मुळात आवड असल्यामुळे व माझ्या गरजेतून मला प्रेरणा मिळाली. कारण माझ्या चप्पलसाठी मला बरीच दुकानं पालथी घालावी लागायची, त्यामुळे एकप्रकारचा कंटाळा आल्यामुळे प्रेरणा ही माझी स्वतःचीच होती असं मी म्हणेन.

प्रश्‍न – यासाठी तुला मार्गदर्शन, सहाय्य कुणाकुणाचं आणि कसं कसं मिळालं? याबाबत काय सांगशील?

उत्तर – अगदी सुरुवातीला मी जी चप्पल बनवली होती त्यासाठी मला कुणाचच मार्गदर्शन घ्यावं लागलं नाही, कारण ती बनवलेली चप्पल अगदीच बेसिक लेव्हलची होती म्हणाना. त्यामुळे मला तिथे मार्गदर्शन घेण्याची गरज वाटली नाही. पण जेव्हा एखादी वस्तू आपण प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये आणणार असतो तेव्हा मात्र त्यासाठी फूलप्रुफ प्लानिंग लागतं हे नाकारुन चालणार नाही. यासाठी व्यवस्थित मार्गदर्शनाची गरज असते. या सगळ्या प्रकारच्या मार्गदर्शनासाठी मला डॉ. रघुनाथ माशेलकर सरांच्या संपूर्ण टीमची खूपच मोलाची मदत झाली. सरांच्या संपूर्ण टीमच्या मदतीने आम्ही फायनल डिझाईनपर्यंत पोहोचलो किंवा ते डिझाईन फायनल करण्याची जी प्रोसेस किंवा प्रोसिजर असते ती मला त्या टीमच्या मदतीने शिकता आली. डॉ. माशेलकर सरांच्या या टीममधल्या ॲड. लीना ठाकूर मॅडम, रविंद्र भारोट सर, रविंद्र शास्त्री सर यांचं खूप मोलाचं योगदान माझ्या या यशात आहे असं मी म्हणेन.

प्रश्‍न – डॉ. रघुनाथ माशेलकर सरांसारख्या एवढ्या मोठ्या माणसापर्यंत तू कशी काय पोहोचलीस?

उत्तर – त्यामागे एक छान गोष्ट आहे. माझं इयत्ता अकरावी-बारावीचं शिक्षण गोव्यातील पेडणे तालुक्यात झालं. मी बारावीत शिकत असताना माझ्या मराठीच्या पुस्तकात डॉ. माशेलकर सरांचा ‘माझी प्रकाशवाट’ म्हणून धडा होता. तो धडा वाचून त्यावेळी मनात सहज विचार आला खरंच डॉ. माशेलकर सरांना जर भेटता आलं तर, कित्ती छान अनुभव असेल तो! आता या गोष्टीला पाच-सहा वर्ष झाली. मधल्या लॉकडाऊनच्या काळात मी ती चप्पल तयार केली. आमच्या ब्राह्मण मंडळाच्या एका कार्यक्रमात मला ही इको फ्रेंडली चप्पल बनवण्याची आयडिया सादर करण्याची संधी मिळाली. तिथेही मला शाबासकीची थाप व पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळालं, योग्य वेळी मला बऱ्याच लोकांचं मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्यामुळे मी डॉ. माशेलकर सरांजवळ पोचू शकले.

प्रश्‍न – तुला या चप्पलचं पेटंट करावं असं का वाटलं?

उत्तर – खरं सांगायचं तर मी हे सगळं जे काही केलं ते पेटंटसाठी खरं तर करतच नव्हते. जेव्हा माझ्या या आयडियामध्ये काहीतरी दम आहे असं मला जेव्हा जाणवलं, तेव्हा मी माझ्या या प्रॉडक्टमधून सभोवतालच्या लोकांसाठी काहीतरी करु शकणार आहे, त्यांना थोडं फार आर्थिक उत्पन्न वाढीसाठी हातभार लागणार आहे याचं मला खूप समाधान होतं. मग पुढे मला या पेटंटचं महत्त्व जेव्हा कळलं म्हणजे जेव्हा मेहनत घेऊन आपण एखाद्या गोष्टीचा शोध लावतो आणि त्याचं श्रेय किंवा फायदा जेव्हा दुसराच माणूस घ्यायचा प्रयत्न करतो या विचारातून मग मी याचं पेटंट घ्यायचं ठरवलं.

प्रश्‍न – तुला या चप्पलचं पेटंट मिळायला साधारण किती कालावधी लागला?

उत्तर – पोफळीच्या या विरीपासून तयार केलेल्या चप्पलचं पेटंट मिळायला साधारण तीन-चार महिन्यांचा कालावधी लागला.

प्रश्‍न – चप्पलचं हे पेटंट मिळवून देण्यासाठी तुला कुणाकुणाची मदत झाली?

उत्तर – चप्पलचं हे पेटंट मिळवून देण्यासाठी डॉ. माशेलकर सरांच्या टीम इन्फिनीटी टीममधले श्री. रविंद्र शास्त्री सर, पेटंटचं ड्राफ्टिंग करणाऱ्या लीना ठाकूर मॅडम तसंच टेक्निकल एक्सपर्टीज देणारे श्री. रविंद्र भारोटे सर व इतर स्टाफची फार मोठी मदत केली.

प्रश्‍न – जेव्हा तुला तुझ्या चप्पलचं पेटंट मिळाल्याचं समजलं, तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? त्याक्षणी तुला काय वाटलं?

उत्तर – माझ्या चप्पलचा फायनल पेटंट नंबर रामनवमीच्या दिवशी दि. 30 मार्च 2023 रोजी मिळाला. मधल्या काळात त्या टीमच्या संपर्कात मी होतेच, त्यामुळे पेटंट माझ्या नावावर होणार हे जवळजवळ कन्फर्म झालं होतं त्यामुळे मी खुश होणं साहजिकच होतं. पण ही पेटंटची गोष्ट जेव्हा सत्यात उतरली तेव्हा माझ्या बरोबरच माझ्या आईला, माझ्या भावाला खूप आनंद झाला. आम्हां सगळ्यांना झालेला हा आनंद तसा शब्दात सांगणं कठीणच आहे. पण आमचा हा आनंद आमच्यासोबत घ्यायला माझे बाबा नाहीत याची खंत मात्र मनाला लागून राहिली. आता आपल्या नावे पेटंट होणार ही खूप अभिमानाची आणि तितकीच आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी काहीतरी करु शकले, या निमित्ताने थोर माणसांची ओळख झाली, प्रत्यक्ष संवाद साधता आला हे सगळं पेटंटमुळे घडून आलं ही माझ्या आयुष्यातली कधीही न विसरता येणारी गोष्ट आहे असं मी म्हणेन.

प्रश्‍न – आता हे चप्पलचं पेटंट तू मिळवलंस. यानंतर भविष्यात तुझ्या काय योजना आहेत? किंवा अजून तू काय करायचं ठरवलं आहेस?

उत्तर – सध्यातरी मला या चप्पलचाच ब्रँड मोठा करायचा आहे. विरी हा आपल्या सभोवतालचा कच्चा माल विचारात घेऊन चप्पलचेच विविध प्रकार ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. नोकरीऐवजी या पेटंटच्या अनुषंगाने ॲग्रो प्रॉडक्टस बिझनेस मध्येच वाटचाल करण्याचं ठरवलं आहे. आपल्या परिसरात होणारं कोकम त्यापासून तयार करता येणारे सरबत, आगळ, आमसुले, त्याच्या बियांपासून कोकम बटर यासारखे अनेक प्रोजेक्ट सुरु करायचा विचार आहे. अजूनही काही पेटंट घेण्याच्या दृष्टीने विचार सुरु आहे.

प्रश्‍न – नामवंत शास्त्रज्ञ मा. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते तू सत्कार स्विकारलास, त्यानंतर तुझा मुंबईतही साठे कॉलेजमध्ये डॉक्टर बाळ फोंडके सरांच्या हस्ते तुझा सत्कार करण्यात आला. त्या सुखद क्षणांबद्दल तू काय सांगशील?

उत्तर – खरं तर डॉ. माशेलकर सर, डॉ. बाळ फोंडके सर यासारख्या नामवंत शास्त्रज्ञांबद्दल पुस्तकां- मध्ये मी वाचलं होतं, पण त्यांच्या हस्ते माझा सत्कार होईल असं मात्र कधीच वाटलं नव्हतं. खरं तर या थोर व्यक्तींना भेटता आलं, त्यांच्याशी जवळून संवाद साधता आला, इतकंच नाही तर त्यांच्या हस्ते माझा सत्कारही झाला या गोष्टींचा मला झालेला आनंद शब्दात व्यक्त करताच येणार नाही. हे सारे क्षण माझ्यासाठी, अपूर्वाईचे, माझ्या कुटुंबासाठी अभिमानास्पद व आनंददायी ठरले एवढं मात्र खरं.

प्रश्‍न- आपल्या सभोवतालच्या सुपारी बागायत दारांसाठी तुझ्या काही योजना आहेत का?

उत्तर – माझ्या या विरीपासून उत्पादन होणाऱ्या चप्पलमुळे सुपारी बागायतदारांसाठी नक्कीच फायदा होईल. आतापर्यंत उपेक्षित, दुर्लक्षित झालेल्या, केवळ जळणासाठी वापरल्या जाणाऱ्या या विरींना थोडंफार आर्थिक सहाय्य देण्याचा माझा मानस आहे. विरीच्या उपलब्धतेनुसार मी त्या खरेदी करणार असल्यामुळे बागायतदारांना आर्थिक मदत होण्यास हातभार लागणार आहे.

प्रश्‍न – तू ही नवीन झेप घेतली आहेस, यश मिळवलं आहेस त्यातून सध्याच्या युवा पिढीला तुला काय सांगावसं वाटतं? कोणता संदेश द्यावासा वाटतो?

उत्तर – आजकालच्या युवा पिढीला शहराकडे जाऊन पैसा कमवायचा आहे, किंवा आपल्याकडच्या शेती वा कृषीक्षेत्राकडे ते केवळ नाईलाजाने बघतात. त्याऐवजी त्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा, ज्ञानाचा वापर करून प्रयोग केला तर काही व्यवसाय सुरू करता येतील. त्यासाठी कष्ट, कठोर परिश्रम घेण्याची तयारीही युवा-युवतींनी ठेवली पाहिजे. आपल्याकडे ॲग्रीकल्चर प्रोसेसिंग फार कमी प्रमाणात चालतं असं मला वाटतं. त्यादृष्टीने त्याचा अभ्यास करून, प्रयत्न करून छोटी छोटी युनिट उभारली तर बेकारी कमी होऊन अर्थार्जन होण्यास नक्कीच हातभार लागेल असं मला वाटतं.

      तुझी ही उद्योजकतेकडे चाललेली वाटचाल आपल्या कोकणातील युवा-युवतींना दिशादर्शक ठरेल असा विश्‍वास व्यक्त करुन तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

मुलाखत शब्दांकन- सुनील नातू, मो. 9850338463

Leave a Reply

Close Menu