आई म्हणून झेप घेताना…

  झेप अर्थात भरारी. स्वकर्तृत्वावर घेतलेल्या ‘झेप’मध्ये मिळणारं समाधान हे काही वेगळंच असतं आणि त्याचबरोबरीने यात कुटुंबाची साथ असेल तर जणू दुग्धशर्करा योगच. आई ही भूमिका पार पाडताना ‘झेप’ घेणं हे काही सोपं नसतं पण ‘झेप’ घेण्यासाठी लागते ध्येय, चिकाटी, मेहनत, संयम यांची सांगड. हे सर्व गुण या वास्तवातही पाहायला मिळणाऱ्या स्त्रीला आपण दुर्गा म्हणतो. कोणाचंही आयुष्य साधं, सोपं, सरळ नसतं. पण जेव्हा मागे वळून बघताना हे दिव्य आपण पार कसं केलं याचं आश्‍चर्य वाटतं. माझ्याही बाबतीत असं झालं. मध्यम वर्गीय घरात, लाडात वाढलेली मी नेत्रा तेंडुलकर-पाटकर, पूर्वाश्रमीची नेत्रा दाभोलकर. आमचं मुळ घर वेंगुर्ल्यात दाभोली येथे. माझे आजोबा गजानन व वडील शशिकांत दाभोलकर. या दोघांनाही नातेवाईक व मित्रमंडळी यांना मदत करायला आवडायची. तसेच आपल्या गावातील होतकरू मुलांना मुंबईला आणून शिक्षण देणं,  त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायला मदत करणं हे सर्व मी लहान असल्यापासूनच बघत होते. त्यामुळे गरजवंताला मदत करणे हा सेवाभाव माझ्यातही नकळतपणे उतरला.

माझे वडील युनियन बँकेत अधिकारी पदावर होते व आई शिक्षिका असल्यामुळे माझ्या भावाचे व माझे बालपण तसे शिस्तीत व आनंदात गेले. अंधेरी पश्‍चिम येथे मोक्याच्या ठिकाणी मी राहात होते व अंधेरी पूर्वेला माझे परांजपे विद्यालय येथे शिक्षण झालं. जवळच पार्ला पूर्व येथील डहाणूकर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. पाककलेची आवड असल्यामुळे कॅडेल रोड येथील केटरींग कॉलेज येथे पाककलेचं शिक्षण घेतलं. पाककलेत आवड असल्यामुळे त्यातच पुढे करीयर करावं असं वाटत होतं.

      पदवी प्राप्त झाल्यावर 1988 साली तेंडोलीच्या विसापूरकर तेंडूलकरांच्या घरातील वास्तुविशारद केतन तेंडुलकर यांच्याकडून लग्नाची मागणी आल्यामुळे पाककलेत करियर न करता मी लग्न केलं. केतन तेंडुलकर मुंबईत वास्तुविशारद म्हणून रहेजामध्ये नोकरी करत होते. पण त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असल्यामुळे आम्ही पुण्यात स्थलांतर केलं. सर्व गुण्यागोविंदाने चालू असताना 1990 साली प्रेयसचा जन्म झाला. आम्ही आई-बाबा झालो. बाळ 3 महिन्याचे झालं व डॉक्टरांनी बाळाला ‘सेरेब्रल पालसी’ ही अवस्था असल्याचं सांगितलं त्यामुळे बाळाची वाढ सामान्य मुलांप्रमाणे होणार नाही. हे ऐकल्यावर आम्हांला मोठा धक्का बसला. पती, माहेर – सासरचे नातेवाईक यांनी धीर दिला. ते खंबीरपणे मागे उभे राहिल्यामुळे या धक्क्यातून सावरायला मदत झाली. ‘सेरेबरल पालसी’ बाळाला प्रगतीसाठी लागणारं सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण मुंबई व पुणे येथे सुरू केलं. सरळमार्गी आयुष्यात हे मोठं संकट अचानक आलं होतं. त्यातून उभं राहताना ऐन तरुणपणात माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला.  बाळ प्रेयस पदरात, त्यात प्रेयस हा वेगळा आहे आणि हा आजार नसून एक अवस्था आहे. त्यामुळे आता पुढे कसं हे आव्हान वाटू लागलं.

           सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मी आणि माझ्यावर कोसळलेल्या संकटांमुळे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे सामर्थ्य गजानन महाराज व कुटुंबाच्या सहकार्यामुळे मला मिळालं. माझ्या मुलाला योग्य प्रशिक्षण देण्यासाठी मी ‘रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली येथे स्पेशल एज्युकेशनचा कोर्स पूर्ण केला. मुलांना शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती व उपचार शिकवण्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही केले.

      माझी आई शशिकला ही पूर्वाश्रमीची सामंत. तिने गोवामुक्तीसंग्रामाचे दिवस असूनही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्यांच्या वडिलांच्या मदतीने फोंडा येथे कष्टकरी लोकांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली होती. आई नेहमी या संदर्भात गोष्टी सांगायची त्यापासून प्रेरणा घेऊन मीही माझ्या मुलासारख्या अन्य मुलांसाठी त्यांच्या पंखात बळ देणारी संस्था कम शाळा सुरू करायचं ठरविलं. त्यातूनच उभी राहिली ‘झेप’ ही संस्था.

      पुण्यातील पिंपरी चिंचवड या विभागात विशेष मुलांसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारी एकही संस्था त्यावेळी नसल्यामुळे मी दोन सहाय्यक शिक्षकांच्या सोबतीने सर्व प्रकारच्या विशेष मुलांसाठी सर्व प्रकारच्या थेरपी एका छताखाली देणारी संस्था सुरू केली. यासाठी मला कुडाळ देशकर गौड ब्राह्मण समाज पुणे पिंपरी चिंचवड विभाग या न्याती बांधवांचे काम करणाऱ्या संस्थेचे पुणे विभागाचे त्यावेळेचे अध्यक्ष श्री. पाटकर व कार्याध्यक्ष श्री. सुधीर सामंत यांची साथ लाभली. श्री. प्रभाकर पाटकर यांनी तर माझ्या आयुष्यात रंग भरले आणि माझ्या आयुष्यात माझा जोडीदार बनून साथ देण्यास सुरुवात केली. अशी माझी संसाराची गाडीही रुळावर आली. आमच्या ‘झेप’चे वैशिष्ट्य म्हणजे- दैनंदिन खर्च चालवण्यासाठी प्रत्येक मुलाकडून फी घेतली जाते पण तरी 20 टक्के फी न देणाऱ्या मुलांनाही आमच्या संस्थेत प्रवेश दिला जातो. त्यासाठी सीएसआर तर्फे वेगवेळ्या कंपनी कडून, रोटरी क्लब, लायन्स क्लब, यांची मदत मिळते.

      विशेष मुलांचे संगोपन व प्रशिक्षण ही जबाबदारी त्यांच्या पालकांवर आयुष्यभारासाठी असते. त्यामुळे त्यांच्या समस्यांना आदरपूर्वक मार्ग दाखवून थोड्या प्रमाणात त्यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. ही संस्था पुणे चिंचवड येथे मतिमंद, गतिमंदत्व, स्वमग्नता, अति चंचल, अध्ययन अक्षमता, अतिक्रियाशील मुलांसाठी काम करते. आज 105 मुले ‘झेप’ या संस्थेत सध्या प्रशिक्षण घेत आहेत. आईच्या ममतेने समजून घेऊन स्वावलंबी बनविण्यासाठी ‘झेप’ची टीम कार्यरत आहे.

      वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आपण ऐकतो की वेगवेगळ्या संकटाशी मुकाबला करून स्त्रिया जिद्दीने उभ्या राहतात. आपल्या कुटुंबाला खंबीरपणे साथ देतात वा आयुष्यात यशस्वी वा कर्तबगार बनतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. संकटाचे संधीत रुपांतर करून जिद्दीने पुढे जाणे हेच आयुष्य असं मला वाटतं. आत्ताच्या ह्या कॉम्पुटर व इंटरनेटच्या युगामध्ये ज्ञानाचे व माहितीचे प्रचंड भांडार आपल्या समोर खुलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण जर त्यात मेहनतपूर्वक सातत्य ठेऊन लक्ष घातल्यास कोणतंही काम आता अशक्य नाही. आपली जिज्ञासा मात्र सतत जागृत ठेवणं गरजेचं आहे.

      आयुष्यात माझा मदत करणारा स्वभाव असल्याने मलाही अनेक मदतीचे हात लाभले. संकटं आलीत पण मी न हरता मार्ग काढत राहिले. माझ्या मुलाच्या आजाराने स्वानुभवातून येणाऱ्या अडचणीना सामोरं जाण्यासाठी ‘झेप’  घेतली खरी पण आज जेव्हा आता मी अनेकांच्या आयुष्यात ‘झेप’च्या माध्यमातून संपर्कात येते, तेव्हा माझ्या कुटुंबाचे विस्तारित कुटुंब होताना माझा हा निर्णय अनेकांच्या आयुष्यात हातभार लावतोय याचं जास्त समाधान आहे. आपण केव्हाही या संस्थेला भेट देऊ शकता. आमचे छोटेसे हे कार्य पाहू शकता.

“झेप“ ला मदत करण्यासाठी खालील पत्यावर संपर्क साधावा.

Centre Name: ZEP REHABILITATION CENTRE

Address : A-6, Flat no. 19, Shantiban Society, Near PNG, Chinchwadgaon : 411033 Email ID: zeprehabcentre@gmail.com Website: www.zeprehabcentre.org

मुलाखत शब्दांकन- क्रांती गोडबोले-पाटील

मो. 9136002064

Leave a Reply

Close Menu